युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
महाराष्ट्राची रीदमिक जिमनॅस्ट संयुक्ता काळेची स्पर्धा स्वतःसोबतच
Posted On:
29 JAN 2023 6:17PM by PIB Mumbai
महाराष्ट्राची जिमनॅस्ट संयुक्ता काळेने, पंचकुला इथे झालेल्या चौथ्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत रीदमिक जिमनॅस्टीकमध्ये पाच सुवर्णपदके जिंकली. संयुक्ता आता पुन्हा एकदा खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेत सहभागी होत आहे. जेव्हा, ती ग्वाल्हेरच्या लक्ष्मीबाई राष्ट्रीय शारीरिक शिक्षण संस्थेत -जिथे ही जिमनॅस्टीक स्पर्धा होत आहे- त्यासाठी पाऊल ठेवेल, त्या क्षणापासून स्वतःची कामगिरी उत्तम दर्जाची ठेवण्यासाठी, किंवा त्याहीपेक्षा अधिक सरस कामगिरी करण्यासाठी, तिचा स्वतःशीच संघर्ष सुरू राहणार आहे.पंचकुला मध्ये तिने जे यश मिळवले ते तात्पुरते नव्हते, त्यात सातत्य आहे, हे सिद्ध करणारी कामगिरी करण्याचे तिचे लक्ष्य असेल.
संयुक्ता एका मध्यमवर्गीय कुटुंबातली असून तिने पाचव्या वर्षी जिमनॅस्टीकच्या मैदानावर पाऊल ठेवले. पंचकुला इथे झालेल्या स्पर्धेत, संयुक्ताने वैयक्तिक उपकरणे - हूप, बॉल, क्लब आणि रिबन यात चार सुवर्णपदके जिंकली होती. तसेच एक एकूण कामगिरीचे सुवर्णपदकही जिंकले. संयुक्ताने या स्पर्धेत एकूण पाच सुवर्णपदके पटकावत नेत्रदीपक कामगिरी केली. त्यानंतर गुजरातमध्ये झालेल्या राष्ट्रीय खेळांमध्ये तिने वैयक्तिक अष्टपैलू खेळाडूचे सुवर्णपदक आणि याच महिन्यात बेंगळुरू येथे झालेल्या 25 व्या राष्ट्रीय स्पर्धेत तिने दोन सुवर्ण आणि तीन रौप्य पदके जिंकली. आता, मध्यप्रदेशांत होणाऱ्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये भाग घेण्यास ती सज्ज झाली आहे.
मध्यप्रदेशांतील खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा 2022 साठी तिची तयारी आणि कामगिरी याविषयी बोलतांना संयुक्ता म्हणाली, - “मी खूप चांगली तयारी केली आहे. महाराष्ट्रातून आम्ही जे सगळे जिमनॅस्ट ह्या स्पर्धेत सहभागी होणार आहोत, ते सगळेच खूप परिश्रम करत आहेत. माझ्या लहानपणापासूनच्या प्रशिक्षक, मानसी सुर्वे आणि पूजा सुर्वे, यांच्या देखरेखीखाली मी फिनिक्स अकॅडेमी इथे माझे प्रशिक्षण घेत आहे. मी दररोज सहा तास सराव करते. आणि माझे कुटुंब, माझ्या क्रीडाविषयक गरजांची काळजी घेतात. ग्वाल्हेरमधील माझी कामगिरी खूप महत्त्वाची ठरेल कारण त्यामुळे मला आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक मान्यता मिळेल. या वर्षी मी माझ्याच अकादमीच्या कीमाया कार्लेशी स्पर्धा करत आहे पण तसे पाहिले तर माझी खरी लढत माझ्याशी आहे.”
आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्टिक्स फेडरेशन (FIG) ने संयुक्ताच्या कामगिरीची दखल घेतली असून या संघटनेने जगभरातील सर्वोच्च जिम्नॅस्ट्सच्या यादीत तिचा समावेश केला आहे. हे तिच्यासाठी खूप महत्वाचे आहे आणि तिच्या मेहनतीची आणि समर्पित कष्टाची दखल घेणारेही आहे. खेलो इंडिया युवा स्पर्धा, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आणि राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा याव्यतिरिक्त संयुक्ताने अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे.
संयुक्ताच्या प्रशिक्षक मानसी सुर्वे यांनीही तिच्या कामगिरीवर प्रकाश टाकला. संयुक्ताने तिच्या करिअरमध्ये आतापर्यंत एकूण 130 पदके जिंकली आहेत, त्यापैकी 119 सुवर्णपदके आहेत, असे मानसी यांनी सांगितले. 2019 साली, संयुक्ता, थायलंड इथे झालेल्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत सातव्या स्थानावर येत तिने भारतासाठी इतिहास घडवला होता. भारत त्याआधी कधीच पहिल्या आठ जणांच्या यादीत स्थान मिळवू शकला नव्हता. त्यानंतर ती फ्रान्समधील वर्ल्ड स्कूल गेम्स आणि 2022 साली थायलंडमधील आशियाई चॅम्पियनशिपमध्ये खेळायला गेली. तिथे तिला तीन ऐवजी दोन उपकरणे (apparatus) देण्यात आली. त्यातही तिने अव्वल स्थान पटकावले.”
पंचकुलातील जिम्नॅस्टिक्स मैदानावर आपल्या उत्कृष्ट कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेणारी संयुक्ता पुन्हा एकदा तिच्या कामगिरीची पुनरावृत्ती करण्यासाठी सज्ज झाली आहे. खेलो इंडिया युवा स्पर्धेत भाग घेतल्यानंतर तिचे आयुष्य कसे बदलले असे विचारले असता संयुक्ता म्हणाली, “खेलो इंडिया मध्ये सहभाग घेतल्यानंतर मला खूप ठिकाणी संधी मिळाली. तो स्पर्धांचा काळ होता, त्यामुळे मी अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतला. माझ्या आयुष्यात खेळ आणि अभ्यास या शिवाय इतर काहीही नाही. त्यामुळे, मी यावर सतत लक्ष केंद्रित करत असते. आणि आज मी पुन्हा एकदा खेलो इंडिया स्पर्धेसाठी सज्ज झाले आहे.”
यावेळी मध्यप्रदेशात ग्वाल्हेर इथे होणाऱ्या, खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये महाराष्ट्रातील विविध क्रीडाप्रकारातील, 450 अॅथलिट सहभागी होणार आहेत. महाराष्ट्रातील प्रमुख खेळाडूमध्ये वेदांत माधवन (जलतरण), शारदा चोपडे (जुडो), आकांक्षा व्यवहारे (भारोत्तोलन; 40 किलो गट), भूमिका मोहिते आणि निकिता कामलकर (भारोत्तोलन; 55 किलो गट), बिशाल चांगमई (तिरंदाजी), विश्वनाथ सुरेश (मुष्टीयुद्ध 40 किलो गट), उस्मान अन्सारी (मुष्टीयुद्ध 55 किलो गट) आणि देविका घोरपडे (मुष्टियुद्ध 52 किलो गट) यांचा समावेश आहे.
मध्यप्रदेशात पहिल्यांदाच आयोजित होत असलेल्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये देशभरातील 5000 हून अधिक खेळाडू सहभागी होतील. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान भोपाळ इथं उद्या म्हणजेच, 30 जानेवारी रोजी या स्पर्धेचे औपचारिक उद्घाटन करतील. ही स्पर्धा राज्यातल्या भोपाळ, इंदूर, ग्वाल्हेर, जबलपूर, उज्जैन, बालाघाट, मंडला, खरगोन (महेश्वर) अशा आठ शहरांमध्ये आयोजित केली जाईल. तर ट्रॅक सायकलिंग स्पर्धा दिल्लीत होणार आहे. यंदा 27 खेळांमधील स्पर्धा असतील. तसेच पहिल्यांदाच खेलो इंडिया मध्ये वॉटर स्पोर्ट्स देखील समाविष्ट करण्यात आले आहेत.
***
N.Chitale/R.Aghor/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1894496)
Visitor Counter : 213