पंतप्रधान कार्यालय

दिल्लीत करिअप्पा मैदानावर झालेल्या एनसीसी पीएम रॅलीत पंतप्रधानांनी केले मार्गदर्शन


“तुम्ही अमृत पिढीचे प्रतिनिधी आहात, तुमची पिढी विकसित आणि आत्मनिर्भर भारत घडवणार आहे”

“जेव्हा स्वप्ने संकल्प बनतात आणि आयुष्य त्यासाठी समर्पित केले जाते, अशावेळी यश निश्चित असते. आज भारतातील युवाशक्तीसाठी नव्या अपार संधीचा काळ आहे.”

“भारताची वेळ आता आली आहे”

“युवा शक्ती ही भारताच्या विकासाच्या प्रवासाचे ऊर्जावान इंजिन आहे.”

“जेव्हा कोणताही देश, युवाशक्तीची ऊर्जा आणि चैतन्याने रसरसलेला असतो, तेव्हा त्या  देशाचे प्राधान्य कायम तिथली युवाशक्ती हेच असते.”

‘हा काळ, मोठ्या संधींचा काळ आहे, विशेषतः देशाच्या कन्यांना संरक्षण दले आणि इतर संस्थांमध्ये मोठ्या संधी उपलब्ध

Posted On: 28 JAN 2023 7:50PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीत करिअप्पा पथसंचलन मैदानावर झालेल्या एनसीसी म्हणजेच राष्ट्रीय छात्र सेनेच्या वार्षिक पीएम रॅलीत मार्गदर्शन केले. यावर्षी, एनसीसी आपला 75 वा स्थापना दिन साजरा करत आहे. यावेळी, पंतप्रधानांच्या हस्ते, या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आजच्या दिवसाचे विशेष कव्हर आणि खास या दिनाचे औचित्य साधून तयार करण्यात आलेल्या 75 रुपयांच्या विशेष नाण्याचे प्रकाशनही करण्यात आले.

यावेळी कन्याकुमारी ते दिल्ली हा प्रवास करणाऱ्या एकता दौडची ज्योत पंतप्रधानांना सुपूर्द करण्यात आली, आणि करिअप्पा मैदानावर त्यांनी ही ज्योत प्रज्वलित केली. ही रॅली यावेळी दिवस आणि रात्र अशा दोन्ही वेळी तसेच  रात्री, एक भारत, श्रेष्ठ भारत या संकल्पनेवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम अशा स्वरूपात आयोजित करण्यात आली.  वसुधैव कुटुंबकमया भारताच्या खऱ्या तत्वानुसार, 19 देशातील 196 अधिकारी आणि छात्रसैनिक  यांनाही या कार्यक्रमात आमंत्रित करण्यात आले होते.

सभेत मार्गदर्शन करताना, पंतप्रधान म्हणाले, भारत आणि राष्ट्रीय छात्र सेना दोघेही या वर्षी आपला 75 वा वर्धापन दिन साजरा करत आहेत. राष्ट्रीय छात्र सेनेचे नेतृत्व करून आणि त्यात सहभागी होऊन राष्ट्र उभारणीत ज्यांनी योगदान दिले, त्यांची पंतप्रधानांनी विशेष प्रशंसा केली. छात्र सेनेचे कॅडेट म्हणून आणि तरुण म्हणून देखील ते देशाच्या अमृत पिढीचेप्रतिनिधित्व करत आहेत आणि येत्या 25 वर्षांत देशाला नव्या उंचीवर घेऊन जातील आणि विकसित आणि आत्मनिर्भर भारत बनवतील. कन्याकुमारी ते दिल्ली एकता ज्योत दौड मध्ये सहभागी झालेल्या छात्रसैनिकांचे  त्यांनी अभिनंदन केले . या दौडीत कन्याकुमारी ते दिल्ली हे अंतर रोज 50 किमी वेगाने दौड करून 60 दिवसांत पूर्ण करण्यात आले. पंतप्रधान म्हणाले ही ज्योत आणि या संध्याकाळचा सांस्कृतिक जल्लोष यामुळे एक भारत श्रेष्ठ भारतही भावना अधिकच बळकट झाली आहे.

या वर्षी प्रथमच प्रजासत्ताक दिनाचे संचलन कर्तव्य पथावर झाले आणि यात राष्ट्रीय छात्र सेनेचे कॅडेट्स सहभागी झाले, असे पंतप्रधानांनी नमूद केले. राष्ट्रीय छात्र सेनेच्या कॅडेट्सनी राष्ट्रीय युद्ध स्मारक, पोलीस स्मारक, लाल किल्ल्यात असलेले नेताजी सुभाष चंद्र बोस संग्रहालय, पंतप्रधान संग्रहालय, सरदार पटेल संग्रहालय आणि बी आर आंबेडकर संग्रहालयाला भेट द्यावी अशी सूचना पंतप्रधानांनी केली, जेणेकरून त्यांना आयुष्यात पुढे जाण्यास प्रेरणा आणि उत्साह मिळेल.

पंतप्रधानांनी युवा वर्गाची केंद्रितता म्हणजे देश चालवणारी प्रमुख ऊर्जा असल्यावर भर दिला. ज्यावेळी स्वप्नांचे रुपांतर संकल्पात होते आणि त्यासाठी जीवन समर्पित केले जाते तेव्हा यशाची हमी मिळते. भारताच्या युवा वर्गाला नव्या संधी देणारा हा काळ आहे. भारताची काही तरी बनण्याची वेळ आता आली आहे याचे दाखले सर्वत्र दिसत आहेत. संपूर्ण जग भारताकडे पाहात आहे आणि हे सर्व भारताच्या युवा वर्गामुळे घडत आहे, पंतप्रधान म्हणाले. आगामी जी20 अध्यक्षतेसाठी युवा वर्गाच्या उत्साहाबद्दल पंतप्रधानांनी अभिमान व्यक्त केला.

ज्यावेळी युवा वर्गाची ऊर्जा आणि उत्साह देशात ओसंडून वाहत असते  त्यावेळी त्या देशाचे प्राधान्य नेहमीच युवा वर्गाला असेल., असे पंतप्रधानांनी युवा वर्गाला त्यांची स्वप्ने साकार करण्यासाठी एक मंच उपलब्ध करून देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचा उल्लेख करत सांगितले. देशाच्या युवा वर्गासाठी विविध क्षेत्रे खुली केली जात आहेत. मग ती डिजिटल क्रांती असो, स्टार्ट अप क्रांती किंवा नवोन्मेष क्रांती असो, असे नमूद करत पंतप्रधानांनी या सर्वांचे सर्वात मोठा लाभार्थी भारतातील युवा वर्ग आहे ही बाब अधोरेखित केली. असॉल्ट रायफल्स आणि बुलेटप्रुफ जॅकेट्स देखील भारतात आयात केली जात होती याकडे निर्देश करत पंतप्रधानांनी संरक्षण क्षेत्रातील सुधारणांवर प्रकाश टाकला आणि आज भारत शेकडो संरक्षण उपकरणांचे उत्पादन करत आहे अशी माहिती दिली. सीमावर्ती भागात अतिशय वेगाने होत असलेल्या पायाभूत सुविधांच्या बांधकामाचे देखील त्यांनी उदाहरण दिले आणि यामुळे भारतातील युवा वर्गासाठी संधी आणि शक्यतांचे एक नवे विश्व खुले होईल, असे सांगितले.

भारताच्या अंतराळ क्षेत्रात अतिशय झपाट्याने होणारी प्रगती म्हणजे युवा वर्गाच्या क्षमतांवर दाखवलेल्या विश्वासाच्या सकारात्मक परिणामांचे उदाहरण असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. अंतराळ क्षेत्राचे दरवाजे युवा गुणवत्तेसाठी खुले केल्यावर पहिल्या खाजगी उपग्रहाच्या प्रक्षेपणासारखे उल्लेखनीय परिणाम दिसून आले. त्याच प्रकारे गेमिंग आणि ऍनिमेशन क्षेत्र भारतातील युवा गुणवत्तेसाठी संधींचा विस्तार करत आहे. ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर मनोरंजन, लॉजिस्टिक्स पासून कृषी अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये विस्तारत आहे. संरक्षण दले आणि संस्थांमध्ये सहभागी होण्याच्या युवा वर्गाच्या आकांक्षांबद्दल बोलताना पंतप्रधान म्हणाले की हा काळ अनेक संधींचा विशेषतः देशाच्या सुकन्यांसाठी संधी निर्माण करणारा आहे. पोलिस आणि निमलष्करी दलांमध्ये गेल्या 8 वर्षात महिलांची संख्या दुप्पट झाली आहे. 

सीमेवर तैनातीसाठी तिन्ही सशस्त्र दलांतील महिलांचा मार्ग मोकळा झाला आहे. नौदलात खलाशी म्हणून झालेल्या महिलांच्या पहिल्या भर्तीचा यावेळी त्यांनी  उल्लेख केला. सशस्त्र दलात महिलांनी लढाऊ योगदान देण्यास  सुरुवात केली  आहे. महिला कॅडेट्सच्या पहिल्या तुकडीने एनडीए, पुणे येथे प्रशिक्षण सुरू केले आहे, अशी माहिती पंतप्रधानांनी दिली. सैनिकी शाळा प्रथमच मुलींसाठी खुल्या झाल्यामुळे 1500 मुलींना या  शाळांमध्ये प्रवेश घेतला आहे. एनसीसीमध्ये देखील गेल्या दशकात महिलांच्या सहभागामध्ये सातत्याने वाढ झाली आहे, असे त्यांनी सांगितले.

देशाच्या सीमावर्ती आणि किनारी भागातून एक लाखाहून अधिक छात्रसैनिकांची  नोंदणी झाली आहे, अशी माहिती पंतप्रधानांनी युवा शक्तीचे सामर्थ्य अधोऱरेखित करत दिली आणि देशाच्या विकासासाठी इतक्या मोठ्या संख्येने तरुण एकत्र आले तर कोणतेही उद्दिष्ट अपराजित राहणार नाही, असा विश्वास व्यक्त केला. छात्रसैनिक वैयक्तिकरित्या आणि एक संस्था म्हणून राष्ट्राच्या विकासात आपली भूमिका व्यापक करतील असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.स्वातंत्र्यलढ्याच्या काळात अनेक शूरवीरांनी देशासाठी बलिदानाचा मार्ग पत्करला होता मात्र आज देशासाठी जगण्याची इच्छाशक्तीच देशाला नव्या उंचीवर घेऊन जाते, असे निरीक्षण त्यांनी नोंदवले.

मतभेद पसरवण्याच्या आणि लोकांमध्ये दुही निर्माण करण्याच्या प्रयत्नांना पंतप्रधानांनी कडक शब्दात इशारा दिला. असे प्रयत्न करूनही भारतातील लोकांमध्ये कधीच मतभेद निर्माण होणार नाहीत, असे सांगत ते म्हणाले की,  ‘माँ के दूध में कभी दरार  नहीं हो सकती म्हणजेच आईचे दूध कधीच फाटू  शकत नाही. यावर एकतेचा मंत्र हाच अंतिम उतारा आहे. एकतेचा मंत्र ही एक प्रतिज्ञा आहे तसेच भारताची शक्ती आहे.भारताला वैभव प्राप्त करण्याचा हा एकमेव मार्ग आहे, यावर पंतप्रधानांनी  जोर दिला.

हा केवळ भारताचा अमृत काळ नाही तर भारतातील तरुणांचा अमृत काळ आहे आणि जेव्हा देश आपल्या स्वातंत्र्याची 100 वर्षे साजरी करत असेल, तेव्हा तरुणच यशाच्या शिखरावर असतील, असे पंतप्रधानांनी आपल्या भाषणाचा समारोप करताना सांगितले. आपण कोणतीही संधी गमावता कामा नये आणि भारताला नवीन उंचीवर नेण्याच्या संकल्पानुसार सतत वाटचाल करायची आहे,असे सांगत मोदी यांनी भाषणाचा समारोप केला. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंहएनसीसीचे महासंचालक लेफ्टनंट जनरल गुरबीरपाल सिंह, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ लेफ्टनंट जनरल अनिल चौहान, लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे, नौदल प्रमुख, अॅडमिरल आर हरी  कुमार, हवाई दल प्रमुख आणि यावेळी संरक्षण सचिव गिरिधर अरमाने उपस्थित होते.

 

***

S.Kakade/R.Aghor/S.Patil/S.Chavan/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1894401) Visitor Counter : 193