आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री, डॉ. मनसुख मांडविया यांनी जैविक गुणवत्ता विषयक राष्ट्रीय शिखर परिषदेचे दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून केले उद्घाटन
एनआयबी केवळ परीक्षण आणि मूल्यमापनावरच लक्ष केंद्रित करत नाही तर चांगल्या उत्पादन पद्धतींना चालना देण्यासाठी, निरीक्षण आणि प्रतिकूल घटनांचा अहवाल देण्यातही महत्त्वाची भूमिका बजावते: डॉ भारती प्रवीण पवार
Posted On:
27 JAN 2023 3:44PM by PIB Mumbai
"केवळ दर्जेदार जैविक उत्पादने आरोग्य व्यवस्थेपर्यंत पोहोचावीत, त्या माध्यमातून सर्वांसाठी दर्जेदार आरोग्य आणि निरामयता सुनिश्चित करण्याच्या माननीय पंतप्रधानांच्या ध्येयाला बळकटी मिळेल, हे सुनिश्चित करण्यात राष्ट्रीय जीवशास्त्र संस्था महत्वाची भूमिका बजावत आहे" असे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री, डॉ. मनसुख मांडविया यांनी म्हटले आहे. ते आज येथे राष्ट्रीय जीवशास्त्र संस्थेतर्फे (एनआयबी) आयोजित जैविक गुणवत्ताविषयक राष्ट्रीय शिखर परिषदेत दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून बोलत होते.
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ भारती प्रवीण पवार, आणि नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ व्ही के पॉल यांनी देखील व्हिडिओ संदेशाद्वारे शिखर परिषदेला संबोधित केले.
“पारंपरिक रासायनिक औषधांसोबत जैविक औषधे ही उपचार पद्धतीचा पर्याय म्हणून उदयास आले आहेत. कोविड-19 महामारीमुळे गेल्या काही वर्षांतील वैद्यकीय आणीबाणीत जैविक औषध आणि निदान पद्धती उद्योग केवळ आपल्या देशाच्याच नव्हे तर जागतिक स्तरावरही सार्वजनिक आरोग्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी धोरणात्मक संपदा असल्याचे सिद्ध झाले आहे, त्यामुळे वैश्विक बंधुत्व अर्थात "वसुधैव कुटुंबकम”, म्हणजेच “संपूर्ण जग एक कुटुंब आहे”, या सार्वकालिक विधानाला अर्थ प्राप्त झाला आहे“ असे डॉ. मांडविया यांनी नमूद केले.
या क्षेत्रातल्या अनेक भागधारकांना एकाच व्यासपीठावर आणल्याबद्दल मनसुख मांडविया यांनी राष्ट्रीय जीव शास्त्र संस्थेचे अभिनंदन केले. "या शिखर परिषदेतून भारतात सध्या प्रचलित, आश्वासीत गुणवत्ता पध्दतींमधल्या दरीचे विश्लेषण करण्यासाठीचा आधार मिळू शकेल असे ते म्हणाले. जैववैद्यक क्षेत्रात प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज ओळखून राष्ट्रीय कौशल्य विकास कार्यक्रमासाठी पुढाकार घेतल्याबद्दल त्यांनी राष्ट्रीय जीव शास्त्र संस्थेचे कौतुक केले.
जैविक घटकांच्या गुणवत्तेचे संपूर्ण आणि निःपक्षपाती मूल्यमापन करण्याच्यादृष्टीने एनआयबी पूर्णतः सुसज्ज असल्याचे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार यांनी सांगितले. त्या म्हणाल्या की, "एनआयबी केवळ चाचणी आणि मूल्यांकनाचेच काम करत नाही, तर त्यासोबतच उत्पादनाच्या चांगल्या पद्धतींना प्रोत्साहन देणे, प्रतिकूल घटनांचे अभ्यासपूर्ण निरीक्षण करून अहवाल देणे आणि जैविक घटकांची गुणवत्ता आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी, त्यासंबंधीत इतर नियामक यंत्रणा आणि उद्योग क्षेत्रातील भागीदारांसोबत जोडून घेण्यातही महत्त्वाची भूमिका बजावते असं पवार म्हणाल्या.
या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते कॉफी टेबल बुकचे प्रकाशनही करण्यात आले.
आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण, आरोग्य मंत्रालयाचे विशेष सचिव एस गोपालकृष्णन, आरोग्य मंत्रालयाचे सहाय्यक सचिव आणि आर्थिक सल्लागार डॉ. जयदीप कुमार मिश्रा, आरोग्य मंत्रालयाचे सह सचिव राजीव वाधवान, राष्ट्रीय जीवशास्त्र संस्थेचे संचालक डॉ. अनुप अन्वीकर, राष्ट्रीय जीवशास्त्र संस्थेचे उपसंचालक डॉ. हरीश चंदर (गुणवत्ता नियंत्रण), यांच्यासह केंद्र सरकारचे वरिष्ठ अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते. पारंपरीक आरोग्य शास्त्र आणि तंत्रज्ञान संस्थेचे / टीएचएसटीआयचे कार्यकारी संचालक डॉ. प्रमोदकुमार गर्ग आणि एम्स भोपाळचे अध्यक्ष प्रा. वाय. के. गुप्ता हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.
***
S.Bedekar/V.Ghode/T.Pawar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1894118)
Visitor Counter : 268