आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
जी 20 इंडिया आरोग्य ट्रॅक
पहिल्या आरोग्य कार्य गटाच्या बैठकीदरम्यान वैद्यकीय मूल्य पर्यटन या विषयावर आयोजित परिसंवादात मूल्य आधारित आरोग्य सेवेच्या माध्यमातून एकात्मिक आरोग्य सेवा सार्वत्रिक आरोग्य संरक्षण कसे मिळवू शकते यावर भर
वैद्यकीय मूल्य पर्यटन हा आरोग्यसेवा प्रणालीतील असुरक्षितता आणि असमानता दूर करण्यासाठी आदर्श आरोग्य सेवेसाठी आवश्यक घटक आहे: वैद्य राजेश कोटेचा
Posted On:
20 JAN 2023 3:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 जानेवारी 2023
"आरोग्य सेवा प्रणालीत असलेली असुरक्षितता आणि असमानता दूर करण्यासाठी आदर्शवादी आरोग्यसेवेत वैद्यकीय मूल्य पर्यटन हा एक आवश्यक घटक आहे.", असे आयुष मंत्रालयाचे सचिव वैद्य राजेश कोटेचा यांनी आज केरळमधील तिरुवनंतपुरम येथे आज सांगितले. भारताच्या जी 20 अध्यक्षपदाच्या पहिल्या आरोग्य कार्यगटाच्या बैठकीत तिसऱ्या दिवशी वैद्यकीय मूल्य पर्यटन या विषयावरच्या परिसंवादात मुख्य भाषण देताना ते बोलत होते. नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ. व्ही के पॉल आणि केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण हे यावेळी उपस्थित होते.
साथीच्या रोगाचे गंभीर परिणाम वैद्य राजेश कोटेचा यांनी नमूद केले. आरोग्याचा देशाच्या आर्थिक सुरक्षेवर मोठा प्रभाव पडतो त्यामुळे आधुनिक औषधांसोबतच पारंपरिक औषध पद्धतींचा समावेश करण्यासाठी आपल्या आरोग्य सेवा प्रणालींना बळकट करण्याची नितांत गरज आहे, असे ते म्हणाले. त्यांनी एकात्मिक आरोग्यसेवेचे महत्त्व अधोरेखित केले. " रुग्ण-केंद्रित दृष्टिकोनावर भर देऊन एकात्मिक आरोग्य सेवा, आरोग्य समस्यांवर सर्वांगीण उपाययोजना, उपचार करण्याचा प्रयत्न करते. मूल्य-आधारित आरोग्य सेवेद्वारे सार्वत्रिक आरोग्य संरक्षण प्राप्त करणे हे यामागचे उद्दिष्ट आहे.”
‘एक जग, एक आरोग्य’ या घोषवाक्याला अनुसरून ज्ञानाची देवाणघेवाण करण्यासाठी तसेच सर्वांना सहज मिळू शकेल अशा किफायतशीर आणि दर्जेदार आरोग्यसेवेसाठी बहुपक्षीय सहयोग आवश्यक आहे, यावर वैद्य राजेश कोटेचा यांनी भर दिला. सध्याच्या आरोग्यसेवा व्यवस्थेतील अस्थिरता आणि तफावत दूर करण्याकरता संपूर्ण विश्वाला एकात्मिक आरोग्य सेवेवर आधारित वैद्यकीय मूल्य पर्यटनाद्वारे जोडणे लाभदायक ठरेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी परिसंवादातील सदस्यांनी केलेल्या तपशीलवार चर्चांमध्ये पारंपरिक आरोग्य सेवा पद्धती आणि व्याधी बरी करण्याची या सेवांची क्षमता, प्रोत्साहनात्मक आणि प्रतिबंधात्मक उपाय यांविषयी माहिती दिली गेली. आधुनिक औषधशास्त्र आणि पारंपरिक उपचार पद्धती यांचा मेळ घातल्यास केवळ व्याधीवर उपचारांसाठीच नव्हे तर संपूर्ण शरीर निरोगी राहण्यासाठी ते अत्यंत प्रभावी ठरेल, यावर सर्वांची सहमती झाली.
एकात्मिक आरोग्य सेवा ही काळाची गरज असून आरोग्य क्षेत्रातला तो एक अत्यंत प्रभावी, उच्च मूल्य आणि झपाट्यानं वाढण्याची क्षमता असलेला घटक आहे, असे उपस्थित प्रतिनिधींनी सांगितले. वैश्विक स्तरावर आरोग्यविषयक संरक्षण पुरवण्यासाठी एकात्मिक आरोग्य सेवा एक योग्य माध्यम आहे, याद्वारे जगभरातील मूल्य-आधारित आरोग्य सेवांमध्ये सर्वाना समान अधिकार मिळेल, असे मत त्यांनी व्यक्त केले. या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात वैद्यकीय प्रवास पर्यटनाला गती देण्यासाठी ज्ञान आणि संसाधनांचा एकत्रितपणे उपयोग करून घेण्यासाठी पॅनेलच्या सदस्यांनी औत्सुक्य दाखवले.
या कार्यक्रमाला आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव लव अग्रवाल, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे सहसचिव विशाल चौहान, यांच्यासह केंद्र सरकारचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. G20 सदस्य देश आणि विशेष निमंत्रित देशांचे प्रतिनिधीही या कार्यक्रमाला उपस्थित होते.
R.Aghor/Prajna/Bhakti/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1892445)
Visitor Counter : 280