संरक्षण मंत्रालय
एनसीसी प्रजासत्ताक दिन शिबिराला चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ यांनी प्रथमच दिली भेट
युवकांच्या सक्षमीकरणात एनसीसीच्या भूमिकेचे जनरल अनिल चौहान यांनी केले कौतुक
Posted On:
17 JAN 2023 3:07PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 जानेवारी 2023
चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान, पीव्हीएसएम, युवायएसएम, एव्हीएसएम एसएम, व्हीएसएम यांनी 17 जानेवारी 2023 रोजी नवी दिल्लीतील दिल्ली कॅंट येथे एनसीसी प्रजासत्ताक दिन शिबिर 2023 ला भेट दिली. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ यांनी एनसीसी प्रजासत्ताक दिन शिबिराला भेट देण्याची ही पहिलीच वेळ आहे.
लष्कर, नौदल आणि हवाई दल या तिन्ही शाखांच्या तुकडीने त्यांना यावेळी मानवंदना दिली. त्यानंतर एनसीसी छात्रसैनिकांनी उत्कृष्ट वाद्यवृंद संचलन सादर केले. एनसीसी छात्रसैनिकांनी तयार केलेल्या, विविध सामाजिक जनजागृतीपर संकल्पना आणि सांस्कृतिक उपक्रमांचे चित्रण असलेल्या ‘ध्वज क्षेत्रालाही’ चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ यांनी भेट दिली. छात्रसैनिकांनी आपापल्या राज्य संचालनालयाच्या संकल्पनेबद्दल त्यांना सविस्तर माहिती दिली.
एनसीसीच्या नुकत्याच नुतनीकरण केलेल्या "हॉल ऑफ फेम'लाही चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ यांनी भेट दिली. यात एनसीसीच्या तिन्ही शाखांच्या माजी विद्यार्थ्यांची छायाचित्रे, प्रारुपे, प्रेरक तसेच इतर दृश्यचित्रफितींचा समृद्ध, अभिमानास्पद संग्रह आहे.
चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान आणि इतर मान्यवर पाहुण्यांनी नंतर एनसीसी सभागृहात छात्रसैनिकांनी सादर केलेला नेत्रदीपक ‘सांस्कृतिक कार्यक्रम’ पाहिला.
एनसीसी ही एका छोट्याशा सुरुवातीपासून आता 17 लाख छात्रसैनिकांची स्वयंसेवी संस्था बनली आहे. “या देशातील तरुणांमध्ये शिस्त, नेतृत्व आणि सौहार्द हे गुण रुजवण्यात तिचे मोलाचे योगदान आहे,” अशा शब्दात जनरल अनिल चौहान यांनी संघटनेचे महत्व अधोरेखित केले.
समुद्रतट, सागरी किनाऱ्यांची स्वच्छता करणे, प्लास्टिक आणि इतर कचऱ्यावर पुन्हा प्रक्रीया करणे तसेच निर्मळ समुद्र किनारे, प्लास्टिक प्रदूषणाचे धोके याबद्दल जनजागृती करणे या उद्देशाने सुरु केलेल्या "पुनीत सागर अभियानाचा" उल्लेख करत, त्यांनी सामाजिक कार्यातील एनसीसीचे उल्लेखनीय योगदान अधोरेखित केले.
“ही मोहिम लोकचळवळ झाली आहे. आजपर्यंत सुमारे 13.5 लाख एनसीसी छात्रसैनिक या अभियानात सहभागी झाले असून त्यांनी जवळपास 208 टन प्लास्टिक कचरा गोळा केला आहे. त्यापैकी 167 टन पुनर्प्रक्रीयेसाठी पाठवला आहे”,असे जनरल चौहान म्हणाले.
चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान यांनी, 75 वर्षांच्या निस्वार्थी राष्ट्रसेवेबद्दल एनसीसीचे कौतुक केले. विविध क्रीडा स्पर्धांमधे केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दलही एनसीसी छात्रसैनिकांची त्यांनी प्रशंसा केली.
* * *
S.Kakade/V.Ghode/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1891781)
Visitor Counter : 214