रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

रस्ते सुरक्षा सुधारण्याच्या अनुषंगाने अभियांत्रिकी उपाययोजना  वाढविण्यासाठी  भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा  प्रशिक्षणावर भर

Posted On: 16 JAN 2023 4:17PM by PIB Mumbai

 

देशात 11 ते 17 जानेवारी 2023 दरम्यानच्या रस्ता सुरक्षा सप्ताहअंतर्गत, रस्ता सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करण्यावर भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण  भर देत आहे.

रस्ता सुरक्षेत सुधारणा करण्यासाठी अभियांत्रिकी उपाययोजना वाढविण्याच्या अनुषंगानेप्राधिकरण भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अभियंत्यांना रस्ता सुरक्षा परीक्षणासाठी  प्रशिक्षण देण्यावर मोठ्या प्रमाणात  भर देत आहे.

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने  त्यांच्या अभियंत्यांना 15 दिवसांचे रस्ते सुरक्षा  परीक्षण प्रशिक्षण अनिवार्य केले आहे. अभियंत्यांना व्यवस्थापक  आणि उप महाव्यवस्थापक  या पदावर बढती देण्यासाठी प्रशिक्षण पूर्ण करणे हा प्रमुख निकष ठेवण्यात  आला आहे. 2022-23 या वर्षात  भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या सुमारे 240 अभियंत्यांना आयआयटी दिल्ली, केंद्रीय रस्ते संशोधन संस्था  आणि भारतीय महामार्ग अभियंते अकादमी येथे प्रशिक्षण देण्यात आले आहे.

याशिवाय, महामार्ग सुरक्षित करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्याला भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण प्राधान्य देत आहे. रस्ते अपघातांच्या घटनांचे व्यवस्थापन करण्यासाठी आणि महामार्गावरील वेग मर्यादा तसेच अन्य  नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी, राष्ट्रीय महामार्गांवर आणि द्रुतगती मार्गांवर अत्याधुनिक वाहतूक व्यवस्थापन प्रणाली (एटीएमएस) लागू केली जात आहे. जवळपास 3,000 किमी  राष्ट्रीय महामार्गांसाठी अत्याधुनिक वाहतूक व्यवस्थापन प्रणाली (एटीएमएस) कार्यान्वित करण्यात आली आहे. दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गासारख्या अंमलबजावणी अंतर्गत असलेल्या प्रकल्पांवर देखील एटीएमएस स्थापित केली जात आहेत. महामार्गावरील सुरक्षा समस्या ओळखण्याच्या दृष्टीनेड्रोनच्या माध्यमातून घेतलेल्या चित्रफिती  आणि नेटवर्क सर्वेक्षण संवाहक माहितीचे विश्लेषण करण्यासाठी, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने जीआयएस  तंत्रज्ञानाचा लाभ घेण्याबाबत देखील लक्ष केंद्रित केले आहे.

'सर्वांसाठी सुरक्षित रस्ते' या उद्देशाचा प्रसार करण्यासाठी 11 ते 17 जानेवारी 2023 या कालावधीत रस्ता सुरक्षा सप्ताहपाळला जात आहे. या सप्ताहादरम्यान, सामान्य लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि सर्व हितसंबंधितांना रस्ता सुरक्षेसंदर्भात योगदान देण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी देशभरात विविध उपक्रम आयोजित केले जात आहेत. यामध्ये रस्ते अपघातांची कारणे आणि अपघात  टाळण्यासाठी उपाययोजनांशी संबंधित विविध जनजागृती मोहिमांचा समावेश आहे.

***

N.Chitale/S.Chavan/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1891624) Visitor Counter : 661