पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय
जागतिक पातळीवर हवामान बदलाचे परिणाम कमी करण्याच्या बाबतीत भारत आघाडीवर असून देशाच्या उर्जा स्थित्यंतर कार्यक्रमासंदर्भात वेगाने प्रगती : ऑटो एक्स्पो 2023 मध्ये केंद्रीय मंत्री हरदीप एस.पुरी यांचे प्रतिपादन
Posted On:
13 JAN 2023 4:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 जानेवारी 2023
“जागतिक पातळीवर हवामान बदलाचे परिणाम कमी करण्याच्या बाबतीत भारत आघाडीवर असून देशाच्या उर्जा स्थित्यंतर कार्यक्रमासंदर्भात वेगाने प्रगती करत आहे. आज होत असलेला कार्यक्रम म्हणजे पर्यावरण रक्षणासाठी घेतलेली शपथ पूर्ण करण्यासाठी तसेच उर्जेची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी आपला देश किती प्रमाणात नवोन्मेषाचा स्वीकार करतो आहे याचा निदर्शक आहे,” केंद्रीय मंत्री हरदीप एस.पुरी म्हणाले.
ऑटो एक्स्पो-2023 या वाहन उद्योगाशी संबंधित प्रदर्शनात बोलताना केंद्रीय पेट्रोलियम तसेच नैसर्गिक वायू मंत्री म्हणाले की, वाहन उद्योगाच्या दृष्टीने आजचा कार्यकम म्हणजे आपले तंत्रज्ञान, क्षमता आणि येत्या काळात सुरक्षित, अधिक प्रदूषणरहित, सर्वदूर पोहोचू शकणाऱ्या तसेच सामायिक प्रवासाची संकल्पना यांचे विस्तारित अभिरूप आहे.या प्रदर्शनाला भेट देणाऱ्यांसाठी, हा दर दिवशी विस्तारत जाणाऱ्या आणि आपल्या सर्व गरजांसाठी उत्तम उत्तर ठरेल अशा वाहतूक विषयक परिसंस्थेचा अनुभव असेल. “हे प्रदर्शन, देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांसाठी तसेच इतर संबंधितांसाठी मंच देखील पुरवेल,” ते म्हणाले.
एसीएमए अर्थात भारतीय वाहनविषयक घटक उत्पादक संघटना, सीआयआय अर्थात भारतीय उद्योग महासंघ तसेच एसआयएएम अर्थात भारतीय वाहन उत्पादक सहकारी संघ यांनी संयुक्तपणे “गतिशीलतेच्या जगातला शोध ” या संकल्पनेवर आधारलेले ऑटो एक्स्पो-2023 हे वाहन उद्योगाशी संबंधित प्रदर्शन आयोजित केले आहे.
या प्रदर्शनात 100 हून अधिक कंपन्या सहभागी होतील तसेच 30 हजारहून अधिक लोकांची उपस्थिती लाभेल अशी अपेक्षा आहे. “प्रवाही तसेच गुंतवणूकदार स्नेही वातावरण तसेच कुशल मनुष्यबळाच्या पाठींब्यासह जागतिक आर्थिक विकासाचे इंजिन तसेच जागतिक पातळीवरील वाहनांच्या वापराला चालना देणारा देश अशा दोन्ही बाबतीत भारताची क्षमता दाखविण्याची अपूर्व संधी या प्रदर्शनाच्या निमित्ताने मिळणार आहे,” केंद्रीय मंत्री हरदीप एस.पुरी म्हणाले.
भाषणात शेवटी केंद्रीय मंत्री म्हणाले की बेंगलुरू येथील बेंगलुरू आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र येथे 6 ते 8 फेब्रुवारी 2023 या कालावधीत भरणाऱ्या इंडिया एनर्जी वीक (आयईडब्ल्यू) या कार्यक्रमात उर्जा क्षेत्रातील सर्व भागधारकांनी सहभागी व्हावे असे निमंत्रण त्यांनी दिले. आयईडब्ल्यूचा हा पहिला कार्यक्रम “विकास, सहकारी संबंध आणि स्थित्यंतर” या संकल्पनेवर आधारलेला आहे आणि यामध्ये विविध देशांचे 30 हून अधिक उर्जामंत्री, जागतिक पातळीवरील कंपन्यांचे 50 हून अधिक प्रमुख, 650 प्रदर्शक आणि 30हजाराहून अधिक लोक उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे.
* * *
N.Chitale/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1891006)
Visitor Counter : 172