पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांच्या हस्ते कर्नाटकात हुबळी इथे 26 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्‌घाटन


“आपल्या युवाशक्तीची ‘आपण करू शकतो’ही भावना सर्वांसाठी प्रेरणादायी ठरते आहे”

“अमृतकाळात आपल्या देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी आपण आपली कर्तव्ये समजून ती पूर्ण करण्यावर भर द्यायला हवा”

“युवा शक्ती ही देशाच्या प्रवाहाला गती देणारी ऊर्जा आहे, देशबांधणीसाठी पुढची 25 वर्षे अत्यंत महत्वाची आहेत”

“युवा असणे म्हणजे, आपल्या प्रयत्नांमधे गतिशील असणे, युवा असणे म्हणजे व्यापक दृष्टिकोन असणे. युवा असणे म्हणजे व्यवहाराचे भान असणे”

“हे शतक भारताचे शतक आहे, असा विचार आज जागतिक स्तरावर रुजतो आहे. हे शतक तुमचे शतक आहे, हे शतक भारताच्या युवकांचे शतक आहे”

“युवकांच्या आशाआकांक्षा पूर्ण करण्यासाठी , आपण जगात सकारात्मक उलथापालथी घडवणे आणि विकसित देशांच्याही पुढे जाणे अतिशय आवश्यक आहे”

“स्वामी विवेकानंद यांचे दोन संदेश - संस्था आणि नवोन्मेष सर्व युवकांच्या आयुष्याचा भाग असले पाहिजेत”

“आज आपल्या देशाचे उद्दिष्ट आहे- विकसित भारत, सशक्त भारत”

Posted On: 12 JAN 2023 8:56PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 12 जानेवारी 2023

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज कर्नाटकात हुबळी इथं 26 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचं उद्घाटन झालं. स्वामी विवेकानंदाची जयंती म्हणून त्यांचे आदर्श, त्यांची शिकवण आणि देश उभारणीत त्यांचे योगदान याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी 12 जानेवारी हा दिवस देशभर राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त आयोजित संमेलनाची संकल्पना, ‘विकसित युवा-विकसित भारत’ अशी असून, देशाच्या सर्व भागातील विविधांगी संस्कृती एका मंचावर आणून ‘एक भारत-श्रेष्ठ भारत’ हे तत्व अधिक बळकट करण्याचा या  महोत्सवाचा उद्देश आहे.

यावेळी उपस्थित युवकांशी संवाद साधतांना,पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, की कर्नाटकातील हुबळी हा भाग आपली विशिष्ट संस्कृती, परंपरा आणि ज्ञान यासाठी ओळखला जातो, इथल्या नामवंत लेखकांना ज्ञानपीठ पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. या प्रदेशाने देशाला, पंडित कुमार गंधर्व, पंडित बसवराज राजगुरू, पंडित मल्लिकार्जुन मंसूर, भारतरत्न पंडित भीमसेन जोशी आणि पंडिता गंगूबाई हंगल यांच्यासारखे महान गायक-संगीतकारही दिले आहेत, असेसांगत पंतप्रधानांनी या सर्व कलाकारांना अभिवादन केले.

2023 मधल्या राष्ट्रीय युवा दिनाचे महत्त्व सांगताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, एकीकडे आपण राष्ट्रीय युवा महोत्सव साजरा करतो आहोत, तर दुसरीकडे, देशात स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचाही उत्साह आहे. त्यामुळे स्वामी विवेकानंदांचाच संदेश उद्धृत करत, उठा, जागृत व्हा आणि आपले लक्ष्य साध्य होईपर्यंत थांबू नका असे आवाहन युवकांना केले. भारतीय युवकांचा हा जीवनमंत्र असून, या अमृत काळात आपण आपली कर्तव्ये जाणून घेत, ती पूर्ण करण्यावर भर द्यायलाच हवा, असे पंतप्रधान म्हणाले.  या कार्यात, भारतातील तरुणांना स्वामी विवेकानंद जी यांच्याकडून मिळालेली प्रेरणा पंतप्रधानांनी अधोरेखित केली. आज त्यांच्या जयंतीनिमित्त मी स्वामी विवेकानंदजींच्या चरणी नतमस्तक होतो, अशा शब्दांत त्यांनी स्वामीजींना अभिवादन केले. अलीकडेच निधन झालेल्या श्री सिद्धेश्वर स्वामींनाही पंतप्रधानांनी श्रद्धांजली वाहिली.

स्वामी विवेकानंदांचे कर्नाटकच्या भूमीशी असलेले नाते मोदींनी अधोरेखित केले. स्वामी विवेकानंदांनी कर्नाटकला अनेकदा भेट दिली आणि त्यांच्या शिकागोला जाण्यास मदत करणाऱ्यांत म्हैसूरच्या महाराजांची महत्वाची भूमिका होती. स्वामीजींचे भारत भ्रमण हे राष्ट्राच्या वैचारिक एकतेचे उदाहरण आहे आणि ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या विचाराचेही ते  शाश्वत उदाहरण आहे, असे मोदी म्हणाले.

स्वामी विवेकांदांचे उद्गार उद्धृत करत नरेंद्र मोदी म्हणाले, भविष्य आणि राष्ट्राचा विकास तेव्हाच साध्य होतो जेव्हा आपल्याकडे युवा शक्ती असेल. कर्नाटकच्या भूमीने देशाला अनेक रत्ने दिली आहेत, ज्यांनी राष्ट्राप्रती कर्तव्याला सर्वोच्च प्राधन्य दिले आणि कमी वयात असामान्य उंचीवर पोचले, असे मोदी म्हणाले. पंतप्रधानांनी चित्तूरच्या महाराणी चिन्नम्मा आणि संगोली रायन्ना यांचे उदाहरण दिले, ज्यांच्या धैर्यापुढे ब्रिटीश साम्राज्य देखील झुकले होते. त्यांनी नारायण महादेव डोणी यांचा देखील उल्लेख केला, ज्यांनी वयाच्या 14 व्या वर्षी देशासाठी प्राण दिले. सियाचीनमध्ये - 55० तापमानात देखील टिकून राहणाऱ्या लान्स नायक हनुमंतप्पा कोप्पड यांचे देखील स्मरण केले. देशाच्या बहुमुखी प्रतिभा असलेल्या युवकांविषयी बोलताना मोदी म्हणाले, भारतीय तरुण प्रत्येक क्षेत्रात मोठी भरारी घेत आहेत.

बदलत्या काळात बदलती राष्ट्रीय ध्येये यांची आठवण करून देत पंतप्रधान मोदी म्हणाले, 21 व्या शतकातला हा काळ अतिशय महत्वाचा आहे, कारण आज भारत अफाट लोकसंख्या असलेला तरुण देश आहे. भारताच्या या प्रवासात युवा शक्ती महत्वाची ठरणार आहे. असे पंतप्रधान म्हणाले. पुढची 25 वर्षे राष्ट्र निर्माणाच्या दृष्टीने महत्वाची आहेत. युवा शक्तीची स्वप्ने आणि आकांक्षा भारताची भविष्यातली दिशा आणि उद्दिष्ट ठरविणार आहेत, आणि युवा शक्तीचा उत्साह देशाचा मार्ग ठरवणार आहे. या युवाशक्तीचा वापर करून घेण्यासाठी आपण विचारांनी आणि आपल्या प्रयत्नांनी तरुण असायला पाहिजे! तरुण असणे म्हणजे अभिनव प्रयत्न करत राहणे. तरुण असणे म्हणजे व्यावहारिक भान असणे. आज जग आपल्याकडे समस्यांवरील  उपायांच्या अपेक्षेने बघत असेल, तर त्याचे कारण आहे आपल्या ‘अमृत’ पिढीचे समर्पणअसे मोदी यावेळी म्हणाले.

आज भारत पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे आणि आमचे ध्येय आहे पहिल्या तीन मध्ये स्थान मिळवणे. कृषी आणि क्रीडा क्षेत्रात निर्माण होत असलेल्या संधींचा पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला आणि या क्रांतीचे श्रेय युवा शक्तीला दिले.

देशाच्या इतिहासात सध्याच्या  क्षणांच्या महत्त्वावर भर  देताना पंतप्रधानांनी अर्थकारण, शिक्षण, क्रीडा आणि स्टार्टअप या क्षेत्रात मजबूत पाया रचला गेल्याचे सांगितले. 

तुमच्या टेक ऑफसाठी धावपट्टी तयार आहे! आज जगभरात भारत आणि तरुणांप्रती मोठा आशावाद आहे. हा आशावाद तुमच्याबद्दल आहे. हा आशावाद तुमच्यामुळेच आहे आणि हा आशावाद तुमच्यासाठी आहे! आजचे शतक हे भारताचे शतक आहे असा आवाज जागतिक पातळीवर उठत आहे. हे तुमचे शतक आहे, भारताच्या तरुणांचे शतक आहे! हा एक ऐतिहासिक काळ आहे – जेव्हा आशावाद आणि संधी एकत्र येत आहेत, असे पंतप्रधान पुढे म्हणाले.

पंतप्रधानांनी देशाचे सामर्थ्य अबाधित ठेवण्यासाठी महिला शक्तीच्या भूमिकेवर भर दिला आणि वानगीदाखल सशस्त्र दल, अंतराळ तंत्रज्ञान, अंतराळ आणि क्रीडा क्षेत्रात महिला चमकत असल्याचे सांगितले.

21 व्या शतकाला भारताचे शतक बनवण्यासाठी भविष्यवादी विचार आणि दृष्टिकोनाच्या महत्त्वावरही त्यांनी भर दिला. तरुणांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आपण सकारात्मक उलथापालथी घडवून प्रगत राष्ट्रांच्याही पुढे जाणे अत्यावश्यक आहे, असे ते म्हणाले. अत्याधुनिक क्षेत्रांचा उल्लेख करून पंतप्रधान म्हणाले की, ज्या नोकऱ्या अस्तित्वातही नाहीत त्या भविष्यात आपल्या तरुणांसाठी मुख्य प्रवाहातील व्यवसाय असतील, त्यामुळे आपल्या तरुणांनी भविष्यातील कौशल्यांसाठी तयारी करणे महत्त्वाचे आहे. नवीन शैक्षणिक धोरणाद्वारे उदयास येत असलेल्या व्यावहारिक आणि भविष्यवादी शिक्षण पद्धतीचा पंतप्रधानांनी उल्लेख केला.

आजच्या या झपाट्याने बदलणाऱ्या जगात स्वामी विवेकानंदांचे दोन संदेश प्रत्येक तरुणाच्या जीवनाचा भाग असायला हवेत. ते दोन संदेश आहेत- संस्था आणि नवोन्मेष ! जेव्हा आपण आपल्या कल्पनेचा विस्तार करतो आणि सांघिक भावनेने कार्य करतो तेव्हा एक संस्था तयार होते, असे पंतप्रधानांनी पुढे स्पष्ट केले आणि आजच्या प्रत्येक तरुणाला सांघिक यशाच्या रूपात वैयक्तिक यश वृद्धीचे आवाहन केले. ही सांघिक भावना विकसित भारताला ‘टीम इंडिया’ म्हणून पुढे नेईल, असे पंतप्रधान म्हणाले.

स्वामी विवेकानंदांच्या नावीन्यपूर्ण कल्पनेवर प्रकाश टाकताना पंतप्रधानांनी टिपणी केली की, प्रत्येक कामाला उपहास, निषेध आणि स्वीकार या तीन टप्प्यांतून जावे लागते. डिजिटल पेमेंट, स्वच्छ भारत अभियान, जन धन योजना आणि स्वदेशी बनवलेल्या कोविड लसी या गोष्टी जेव्हा पहिल्यांदा सादर केल्या गेल्या तेव्हा त्यांची खिल्ली उडवली गेली  हे उदाहरण पंतप्रधानांनी दिले. आज भारत डिजिटल पेमेंटमध्ये जागतिक आघाडीवर आहे, जन धन खाती ही आपल्या अर्थव्यवस्थेची मोठी ताकद बनली आहे आणि लसींच्या क्षेत्रात भारताच्या यशाची जगभरात चर्चा होत आहे, असे त्यांनी पुढे स्पष्ट केले. पंतप्रधान म्हणाले  तुमच्याकडे काही नवीन कल्पना असेल तर लक्षात ठेवा की तुमची खिल्ली उडवली जाऊ शकते किंवा विरोध केला जाऊ शकतो. पण जर तुमचा तुमच्या कल्पनेवर विश्वास असेल तर त्यावर ठाम रहा. त्यावर विश्वास ठेवा.

युवकांना सोबत घेऊन देशात अनेक नवनवीन प्रयत्न आणि प्रयोग केले जात असल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली. स्पर्धात्मक आणि सहकारी संघराज्यवादाविषयी पंतप्रधान म्हणाले की, राष्ट्रीय युवा महोत्सवात देशातील विविध राज्यांतील युवक विविध स्पर्धांमध्ये भाग घेत आहेत. कोण जिंकेल याने काही फरक पडत नसतो कारण सरतेशेवटी भारतच विजयी होणार असतो, असे ते पुढे म्हणाले. भारतातले युवक केवळ एकमेकांशी फक्त स्पर्धा करणार नाहीत तर सहकार्यही करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. स्पर्धा आणि सहकार्याच्या या भावनेबद्दल अधिक बोलताना पंतप्रधानांनी देशाच्या यशावर आपले यश मोजले गेले पाहिजे  हा विचार रुजवण्याच्या गरजेवर भर दिला.

आज देशाचे ध्येय आहे - विकसित भारत, सशक्त भारत! आणि विकसित भारताचे हे स्वप्न पूर्ण होईपर्यंत आपण थांबू शकत नाही देशातील प्रत्येक तरुण हे स्वप्न साकार करेल आणि देशाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेईल, असा विश्वास पंतप्रधानांनी भाषणाचा समारोप करताना व्यक्त केला.

यावेळी कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, केंद्रीय मंत्री अनुराग सिंह ठाकूरनिसिथ प्रामाणिक आणि कर्नाटकातील इतर मंत्री उपस्थित होते.

पार्श्वभूमी

प्रतिभावान तरुणांना राष्ट्रीय स्तरावर आपली प्रतिभा दाखवण्याची संधी मिळावी आणि त्यांना राष्ट्र उभारणीसाठी प्रवृत्त करण्यासाठी दरवर्षी राष्ट्रीय युवा महोत्सव आयोजित केला जातो. हा महोत्सव देशाच्या सर्व भागांतील विविध संस्कृतींना एका समान व्यासपीठावर आणतो आणि सहभागींना एक भारत, श्रेष्ठ भारत या भावनेने एकत्र आणते. कर्नाटकातील हुबळी-धारवाड येथे 12 ते 16 जानेवारी या कालावधीत 'विक्षित युवा - विकसित भारत' या विषयावर हा महोत्सव होत आहे. या महोत्सवात युवक शिखरपरिषद होईल त्यात जी 20 आणि वाय 20 परिषदेतून समोर आलेल्या कामाचे भविष्य, उद्योग, नवोपक्रम आणि 21 व्या शतकातील कौशल्ये; हवामान बदल आणि आपत्ती जोखीम कमी करणे; शांतता निर्माण आणि सलोखा; लोकशाही आणि शासनामध्ये सामायिक भविष्यातील तरुण; आणि आरोग्य आणि कल्याण या पाच संकल्पनांवर पूर्ण चर्चा होईल. या शिखर परिषदेत साठहून अधिक नामवंत तज्ज्ञांचा सहभाग असेल. अनेक स्पर्धात्मक आणि बिगर स्पर्धात्मक कार्यक्रमही आयोजित केले जातील. स्पर्धात्मक कार्यक्रमांमध्ये लोकनृत्य आणि गाणी यांचा समावेश असेल आणि स्थानिक पारंपरिक संस्कृतींना चालना देण्यासाठी ते आयोजित केले जातील. गैर-स्पर्धात्मक कार्यक्रमांमध्ये सुमारे 10 लाख लोकांना योगासने करण्यासाठी एकत्रित आणण्याचे उद्दिष्ट असलेल्या योगाथॉनचा समावेश असेल. राष्ट्रीय स्तरावरील कलाकारांकडून आठ देशी खेळ आणि मार्शल आर्ट्स देखील या कार्यक्रमात सादर केले जातील. इतर आकर्षणांमध्ये खाद्य महोत्सव , युवा कलाकार शिबीर साहसी क्रीडा उपक्रम आणि विशेष नो युवर आर्मी, नेव्ही आणि एअर फोर्स कॅम्प यांचा समावेश आहे.

 

 

 

 

S.Kane/Radhika/ Prajna/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1890849) Visitor Counter : 253