राष्ट्रपती कार्यालय

लष्करी अभियांत्रिकी सेवेच्या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट

Posted On: 05 JAN 2023 3:15PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 5 जानेवारी 2023

 

लष्करी अभियांत्रिकी सेवेच्या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांनी आज राष्ट्रपती भवन इथं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली.

लष्करी अभियांत्रिकी सेवेच्या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांशी संवाद साधतांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या की, तुम्ही अशावेळी या सेवेत रुजू होत आहात, जेव्हा, भारताने नुकताच अमृत काळात प्रवेश केला आहे आणि भारताकडे जी-20 चे अध्यक्षपदही आहे. हा असा काळ आहे, जेव्हा जग भारताकडे नव संशोधन आणि समस्यांचे निराकरण करण्यासाठी आशेने बघत आहे. लष्करी अभियांत्रिकी सेवेचे अधिकारी म्हणून, संरक्षण दलाच्या तिन्ही शाखा, लष्कर, हवाई दल, नौदलासह, तटरक्षक दल आणि इतर संस्थांना खऱ्या अर्थाने अभियांत्रिकी क्षेत्रातील पाठबळ पुरवण्यात, या अधिकाऱ्यांची भूमिका महत्वाची ठरेल, असे राष्ट्रपती म्हणाल्या. हे अधिकारी, सैन्यदलांना ज्या समर्पित अभियांत्रिकी सेवा पुरवतील, त्यामुळे, लष्करी दलांच्या एकूण कामगिरीत सुधारणा होईलच; त्याशिवाय काही तातडीच्या परिस्थितीसाठी  ही दले सज्ज राहू शकतील, असे त्यांनी सांगितले.

बांधकाम क्षेत्रातील युवा अधिकारी या नात्याने, एमईएसच्या अधिकाऱ्यांचे पहिले कर्तव्य, पर्यावरण संरक्षण हेही असेल, असे त्या पुढे म्हणाल्या. त्याचदृष्टीने, आपण शाश्वत विकासासाठी अक्षय ऊर्जा साधनांचा अधिकाधिक वापर करण्याकडे वळले पाहिजे. देशात, अनेक सौर फोटोव्होटाईक प्रकल्प पूर्ण करत, एमईएस देशातील कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण कमी करण्यात महत्वाचे योगदान देत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. नागरिकांचे धोकादायक रसायनांपासून संरक्षण होऊ शकेल, अशा तऱ्हेचे बांधकाम साहित्य निर्माण करण्यासाठी संशोधन करावे, असा सल्ला त्यांनी या अधिकाऱ्यांना दिला. मानवाच्या आसपास, नैसर्गिक गोष्टी अधिक असल्या तर,संपूर्ण समाजासाठीच ते कल्याणकारी असते, असे त्यांनी पुढे सांगितले.

बांधकाम क्षेत्र, हे सतत बदलत असणारे गतिमान क्षेत्र असून त्यातील तंत्रज्ञान खूप वेगाने बदलते आहे. हे क्षेत्र देशाची आर्थिक प्रगती आणि विकासात मोठे योगदान देत असते. आज प्रकल्प व्यवस्थापनासाठी आधुनिक साधनांचा वापर करुन, पायाभूत सुविधा विकसित करत, एमईएसचे अधिकारी आपले महत्वाचे योगदान देऊ शकतात, असेही त्या म्हणाल्या.  हे क्षेत्र देशाच्या अर्थव्यवस्थेच्या विकासात महत्वाची भूमिका बजावू शकतात. त्यासाठी मशीन लर्निंग आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यासारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा भविष्यातील प्रकल्पासाठी वापर करावा, असा सल्ला त्यांनी दिला. यामुळे, बांधकांसाठी अत्याधुनिक रचना उपलब्ध होतील आणि कामासाठी लागणारा वेळही वाचेल, असे राष्ट्रपती म्हणाल्या.                                            

राष्ट्रपतींचे संपूर्ण भाषण ऐकण्यासाठी इथे क्लिक करा.

 

  

 

 

 

 

N.Chitale/R.Aghor/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1888866) Visitor Counter : 181