जलशक्ती मंत्रालय
जल व्हिजन@2047 वर विचारमंथन करण्यासाठी राज्यांतील मंत्र्यांच्या पहिल्या वार्षिक अखिल भारतीय जल परिषदेचे उद्यापासून आयोजन
Posted On:
04 JAN 2023 5:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 जानेवारी 2023
2047 पर्यंत भारताला एक विकसित राष्ट्र बनवण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेला अनुसरून सरकार कृती आराखडा आणि व्हिजन डॉक्युमेंट ऑफ इंडिया@2047 तयार करण्यावर विचार करत आहे. इंडिया @2047 योजनेचा भाग म्हणून जल सुरक्षेची आव्हाने हाताळताना पंतप्रधानांनी राजकीय इच्छाशक्ती, सार्वजनिक वित्तपुरवठा, भागीदारी, लोकसहभाग आणि शाश्वततेसाठी अनुनय या 5 मंत्रांची घोषणा केली आहे. पुढील महत्त्वाच्या वर्षांमध्ये भारत ज्या उंचीवर पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे ती उंची गाठण्यासाठी जल क्षेत्र लक्षणीय भूमिका बजावेल. कृती आराखडा पुढे नेण्यासाठी, जलशक्ती मंत्रालय 5 आणि 6 जानेवारी 2023 रोजी मध्य प्रदेशातील भोपाळ येथे "वॉटर व्हिजन@2047" या संकल्पनेसह राज्यातील मंत्र्यांची पहिली अखिल भारतीय वार्षिक जलपरिषद आयोजित करत आहे.
इंडिया@2047 आणि 5 मंत्रांच्या व्हिजनसाठी राज्यांच्या विविध जल भागधारकांकडून माहिती गोळा करणे हे या दोन दिवसीय परिषदेचे प्राथमिक उद्दिष्ट आहे. पाणी हा राज्यांचा विषय असल्यामुळे राज्यांसोबत प्रतिबद्धता आणि भागीदारी सुधारणे तसेच जलशक्ती मंत्रालयाच्या योजना आणि उपक्रमांची देवाणघेवाण करणे हा या परिषदेचा हेतू आहे.
केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत, जलशक्ती आणि अन्न प्रक्रिया उद्योग राज्यमंत्री प्रल्हाद सिंग पटेल, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान हे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या परिषदेत जल प्रशासन या विषयावरील एका महत्त्वपूर्ण सत्राच्या अध्यक्षस्थानी असतील. जलसंपदा, सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभाग (पीएचइडी) आणि सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील पाटबंधारे राज्यमंत्र्यांना व़ॉटर व्हिजन@2047 ची रूपरेषा तयार करण्यासाठी आणि देशाच्या पाण्याच्या समस्या सोडवण्यासाठी नियोजनासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.
कृषी उत्पादन आयुक्तांसह सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील जलसंपदा, सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभाग आणि सिंचन विभागाचे वरिष्ठ सचिव देखील या परिषदेला उपस्थित राहणार आहेत. जल क्षेत्रासंदर्भात तरुण नवोदित/स्टार्टअप कंपन्यांनी मांडलेल्या नवकल्पनांचे एक प्रदर्शनही या परिषदेत भरवले जाणार आहे.
* * *
S.Patil/P.Jambhekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1888600)
Visitor Counter : 297