शिक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

परीक्षा पे चर्चा -2023 चे 27 जानेवारी 2023 रोजी आयोजन - धर्मेंद्र प्रधान


परीक्षा पे चर्चा -2022 साठी झालेल्या सुमारे 15.7 लाखांच्या तुलनेत 38.80 लाख सहभागींनी परीक्षा पे चर्चा 2023 साठी केली नोंदणी

150 हून अधिक देशांतील विद्यार्थी, 51 देशांतील शिक्षक आणि 50 देशांतील पालकांची परीक्षा पे चर्चा 2023 साठी नोंदणी

Posted On: 03 JAN 2023 9:20PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 3 जानेवारी 2023

 

शालेय विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांच्याशी पंतप्रधानांचा संवादात्मक  कार्यक्रम असलेल्या "परीक्षा पे चर्चा 2023" या कार्यक्रमाचे  6 वे पर्व  27 जानेवारी 2023 रोजी नवी दिल्लीतील तालकटोरा इनडोअर स्टेडियम  येथे आयोजित करण्यात आले आहे, केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज ही घोषणा केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या  परीक्षा पे चर्चा या अनोख्या  संवादात्मक कार्यक्रमामध्ये ,देशभरातील आणि परदेशातील विद्यार्थी, पालक, शिक्षक पंतप्रधानांशी परीक्षा आणि शाळेनंतरच्या जीवनाशी संबंधित चिंतांवर चर्चा करण्यासाठी संवाद साधतात. परीक्षा हा जीवनातील उत्सव म्हणून साजरा करण्याच्या दृष्टीने  हा कार्यक्रम तणावावर मात करण्यासाठी मदत करण्याचा प्रयत्न करतो. शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागातर्फे गेल्या पाच वर्षांपासून या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले आहे.

परीक्षा पे चर्चा 2023 साठी, राज्य शिक्षण मंडळे, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ.(सीबीएसई ) , केंद्रीय विद्यालय संघटन (केव्हीएस), नवोदय विद्यालय योजना (एनव्हीएस )आणि इतर मंडळांमधून विद्यार्थी, शिक्षक आणि पालक मोठ्या संख्येने उत्साहाने सहभागी झाले आहेत. 2022 च्या तुलनेत यावर्षी नोंदणी दुपटीने वाढली आहे.  परीक्षा पे चर्चा-2022 साठी झालेल्या सुमारे 15.7 लाखांच्या  नोंदणीच्या तुलनेत परीक्षा पे चर्चा 2023 साठी सुमारे 38.80 लाख सहभागींनी (विद्यार्थी- 31.24 लाख, शिक्षक - 5.60 लाख, पालक - 1.95 लाख) नोंदणी केली आहे. 150 हून अधिक देशांतील विद्यार्थी, 51 देशांतील शिक्षक आणि 50 देशांतील पालकांनीही परीक्षा पे चर्चा-2023 साठी नोंदणी केली आहे.---- केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाने वेळोवेळी निर्धारित केलेल्या कोविड-19 प्रतिबंधक नियमांचे पालन करत हा कार्यक्रम, 2022 प्रमाणेच टाऊनहॉल मधल्या कार्यक्रमाच्या स्वरूपात व्हावा, असे प्रस्तावित करण्यात आले आहे. 25 नोव्हेंबर ते 30 डिसेंबर 2022 या कालावधीत, निवडक सहभागी स्पर्धकांची (इयत्ता नववी ते बारावी दरम्यानचे शालेय विद्यार्थी आणि पालक) विविध विषयांवरील ऑनलाईन सृजनशील लेखन स्पर्धा https://innovateindia.mygov.in/ppc-2023/ या पोर्टलवर घेण्यात आली. यासाठी निवडण्यात आलेल्या संकल्पना खालीलप्रमाणे होत्या :

विद्यार्थ्यांच्या लेखनस्पर्धेसाठी संकल्पना/विषय

  1. आपले स्वातंत्र्यसैनिक  (हमारी आज़ादी के नायक)
  2. आपली संस्कृती आपला अभिमान (हमारी संस्कृति हमारा गर्व)
  3. माझे आवडते प्रेरणादायी पुस्तक (मेरी प्रिय किताब)
  4. पुढच्या पिढ्यांसाठी पर्यावरणाचे रक्षण (आने वाली पीढ़ियोंके लिए पर्यावरण सुरक्षा)
  5. माझे आयुष्य, माझे आरोग्य (अच्छा स्वास्थ्य क्यों ज़रूरी है?)
  6. माझे स्टार्टअप चे स्वप्न (मेरा स्टार्टअप का सपना)
  7. एसटीईएम शिक्षण/ अमर्याद शिक्षण (सीमाओं केबिना शिक्षा)
  8. शालेय शिक्षणात खेळ आणि स्पर्धांचा उपयोग (विद्यालय में सीखनेके लिए खिलौने और खेल)


शिक्षकांसाठीच्या संकल्पना/विषय

  1. आपला वारसा (हमारी धरोहर)
  2. शिक्षणासाठी अनुकूल वातावरण (सीखने के लिए समर्थ वातावरण)
  3. कौशल्यासाठीचे शिक्षण (कौशल के लिए शिक्षा)
  4. अभ्यासक्रमाचा भार कमी आणि परीक्षांची भीती नाही (पाठयक्रम का कम भार और परीक्षा का कोई भय नहीं)
  5. भविष्यातील शैक्षणिक आव्हाने (भविष्य में शिक्षा की चुनौतियाँ)


पालकांसाठी संकल्पना/विषय

  1. माझे मूल, माझे शिक्षक (मेरा बच्चा, मेरा अध्यापक)
  2. प्रौढ शिक्षण- प्रत्येकाला साक्षर बनवूया (प्रौढ़ शिक्षा- सभीको साक्षर बनायें)
  3. एकत्र शिकूया आणि पुढे जाऊया (सीखना और एकसाथ बढ़ना)

माय गोव्ह वरच्या या सृजनशील लेखन स्पर्धेच्या माध्यमातून निवडण्यात आलेल्या 2050 सहभागी स्पर्धकांना विशेष ‘परीक्षा पे चर्चा किट’ बक्षीस देण्यात येईल. या किट मध्ये, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिलेले ‘एक्झाम वॉरीयर्स’ हे हिन्दी आणि इंग्रजी भाषेतील पुस्तक असेल आणि एक प्रमाणपत्र असेल. तसेच, सहभागी स्पर्धकांच्या काही प्रश्नांची एनसीईआरटी ने निवड केली असून ते प्रश्न पीपीसी-2023 मध्ये समाविष्ट केले जाऊ शकतील.

 

* * *

S.Patil/S.Chavan/R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1888445) Visitor Counter : 305