विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या नागपूर येथे 108व्या भारतीय विज्ञान काँग्रेसचे उद्घाटन होणार असून या काँग्रेसमध्ये महिलांसह समाजाच्या सर्व घटकांच्या समावेशक सहभागातून शाश्वत विकासावर लक्ष केंद्रित केले जाणार
“महिला सक्षमीकरणासह शाश्वत विकासासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान” ही कल्पना या वर्षीच्या विज्ञान काँग्रेसची मध्यवर्ती कल्पना म्हणून अत्यंत विचारपूर्वक निश्चित करण्यात आली आहे
“मुलांचे विज्ञान काँग्रेस” हा यावर्षीच्या भारतीय विज्ञान काँग्रेसमधील वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम आहे
या संमेलनाच्या समारोप सत्रात अवकाश, संरक्षण, माहिती तंत्रज्ञान आणि वैद्यकीय विज्ञानासह अनेक वैविध्यपूर्ण क्षेत्रांतील नोबेल पुरस्कार विजेते, आघाडीचे भारतीय तसेच परदेशी संशोधक, विषय तज्ञ आणि तंत्रज्ञ सहभागी होणार आहेत.
भारतीय विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्राने समाजाप्रति मोठ्या प्रमाणात दिलेले महत्त्वपूर्ण योगदान दर्शवणारे “प्राईड ऑफ इंडिया” हे भव्य प्रदर्शन या संमेलनातील मुख्य आकर्षण असणार आहे
Posted On:
02 JAN 2023 5:30PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या नागपूर येथे 108व्या भारतीय विज्ञान काँग्रेसचे उद्घाटन होणार असून या काँग्रेसमध्ये महिलांसह समाजाच्या सर्व घटकांच्या समावेशक सहभागातून शाश्वत विकासावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे.
संमेलनपूर्व वार्ताहर परिषदेत, समाज माध्यम प्रतिनिधींना माहिती देताना, केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान तसेच भू-विज्ञान मंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ.जितेंद्र सिंह म्हणाले की, “महिला सक्षमीकरणासह शाश्वत विकासासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान” ही कल्पना या वर्षीच्या विज्ञान काँग्रेसची मध्यवर्ती कल्पना म्हणून अत्यंत विचारपूर्वक निश्चित करण्यात आली आहे. या काँग्रेसमध्ये समग्र विकास, अर्थव्यवस्थांचे पुनरावलोकन आणि शाश्वत ध्येयांवर चर्चा घडवून आणतानाच, विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात महिलांच्या विकासामध्ये येऊ शकणाऱ्या अडथळ्यांवर उपाययोजना सुचवण्याचे देखील प्रयत्न करण्यात येतील अशी माहिती त्यांनी दिली.
केंद्रीय मंत्री म्हणाले की, लहान मुलांना त्यांची वैज्ञानिक आवड आणि ज्ञान वापरण्याच्या तसेच शास्त्रीय प्रयोगांच्या माध्यमातून त्यांची सर्जकता प्रत्यक्षात साकार करण्याच्या उद्देशाने यावर्षीच्या भारतीय विज्ञान काँग्रेसमध्ये “मुलांचे विज्ञान काँग्रेस” हा वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या वर्षीच्या विज्ञान काँग्रेसमध्ये “आदिवासी विज्ञान काँग्रेस” या नावाचा आणखी एक उपक्रम राबवण्यात येणार आहे याकडे डॉ.जितेंद्र सिंह यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले. या उपक्रमातून आदिवासी महिलांच्या सक्षमीकरणाचे दर्शन घडवण्याचा प्रयत्न केला जाईल तसेच यातून स्वदेशी उच्चार पद्धतीमध्ये उपलब्ध ज्ञान प्रणाली आणि पद्धती प्रदर्शित करण्यासाठी मंच उपलब्ध होईल.
संमेलनाच्या समारोप सत्रात अवकाश, संरक्षण, माहिती तंत्रज्ञान आणि वैद्यकीय विज्ञानासह अनेक वैविध्यपूर्ण क्षेत्रांतील नोबेल पुरस्कार विजेते, आघाडीचे भारतीय तसेच परदेशी संधोधक, विषय तज्ञ आणि तंत्रज्ञ सहभागी होणार आहेत अशी माहिती केंद्रीय मंत्री डॉ.सिंह यांनी दिली. या काँग्रेसमध्ये आयोजित तंत्रज्ञान विषयक सत्रांमध्ये कृषी आणि वन विज्ञान, पशुपालन, प्राणीशास्त्र, तसेच मस्त्य विज्ञान क्षेत्र, मानववंशशास्त्र आणि वर्तणूकशास्त्र, रसायनशास्त्र, पृथ्वी प्रणाली विज्ञान, अभियांत्रिकी शास्त्र, पर्यावरण शास्त्र, माहिती तसेच दूरसंचारविज्ञान आणि तंत्रज्ञान, भौतिक विज्ञान, गणितशास्त्र, वैद्यकीय विज्ञान, नवीन जीवशास्त्र, शरीर विज्ञान आणि वनस्पती विज्ञान या क्षेत्रांमध्ये झालेल्या चाकोरीबाहेरील आणि व्यावहारिक संशोधनांची माहिती मिळेल असे त्यांनी पुढे सांगितले.
या संमेलनातील मुख्य आकर्षण असणारे “प्राईड ऑफ इंडिया” हे भव्य प्रदर्शन सरकार तसेच देशभरातील कॉर्पोरेट क्षेत्र, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, शैक्षणिक संस्था आणि संशोधन विकास संस्था, संशोधक आणि उद्योजक यांचे या क्षेत्रातील सामर्थ्य आणि यशस्वी कामगिरी यांचे दर्शन घडवेल याचा देखील केंद्रीय मंत्री डॉ.जितेंद्र सिंह यांनी उल्लेख केला. या क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी, मोठ्या प्रमाणात सफल कार्ये तसेच भारतीय विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्राने समाजाप्रती मोठ्या प्रमाणात दिलेले महत्त्वपूर्ण योगदान यांचे दर्शन या प्रदर्शनातून घडणार आहे.
या 14 विभागांखेरीज, या काँग्रेसमध्ये, महिलांचे विज्ञान काँग्रेस, शेतकऱ्यांचे विज्ञान काँग्रेस, मुलांचे विज्ञान काँग्रेस, आदिवासीविषयक बैठक, विज्ञान तसेच समाज आणि वैज्ञानिक संपर्ककर्त्यांचे काँग्रेस असे इतर उपक्रम देखील आयोजित केले जातील.
या विज्ञान संमेलनाच्या उद्घाटनपर सत्रामध्ये, राज्यपाल आणि महाराष्ट्रातील सार्वजनिक विद्यापीठांचे कुलपती भगतसिंग कोश्यारी, केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शतकमहोत्सवी सोहोळ्याच्या सल्लागार समितीचे अध्यक्ष नितीन गडकरी, केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान तसेच भू-विज्ञान मंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ.जितेंद्र सिंह तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुभाष आर.चौधरी तसेच कोलकाता येथील भारतीय विज्ञान काँग्रेस संघटनेच्या महाध्यक्ष डॉ.विजय लक्ष्मी सक्सेना यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती असेल.
ऑलिम्पिक ज्योतीच्या धर्तीवर प्रज्वलित करण्यात आलेली विज्ञान ज्योत हा उपक्रम समाजामध्ये, विशेषतः युवकांमध्ये शास्त्रीय भावनेची जोपासना करण्याप्रति समर्पित आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परिसरात स्थापन करण्यात आलेली ही ज्योत 108 व्या भारतीय विज्ञान काँग्रेसच्या समारोपापर्यंत तेवत राहील.
***
S.Patil/S.Chitnis/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1888077)
Visitor Counter : 335