संरक्षण मंत्रालय
राष्ट्रीय छात्र सेनेच्या प्रजासत्ताक दिन शिबिर - 2023 ला दिल्ली छावणी येथे प्रारंभ, शिबिरात 2,155 छात्रसैनिकांचा सहभाग, यामध्ये 710 मुलींचा समावेश
Posted On:
02 JAN 2023 12:45PM by PIB Mumbai
एनसीसी म्हणजेच राष्ट्रीय छात्र सेनेच्या प्रजासत्ताक दिन शिबिर - 2023 ला 02 जानेवारी 2023 रोजी करिअप्पा परेड ग्राउंड, दिल्ली छावणी येथे प्रारंभ झाला. जवळपास महिनाभर चालणाऱ्या या शिबिरात 28 राज्ये आणि आठ केंद्रशासित प्रदेशांमधून निवडलेले एकूण 2,155 छात्रसैनिक सहभागी झाले असून त्यात 710 मुलींचा समावेश आहे. या शिबिराचा समारोप 28 जानेवारीला पंतप्रधानांच्या रॅलीने होईल. यामध्ये जम्मू आणि काश्मीर मधील 114 कॅडेट आणि ईशान्य विभागातील 120 कॅडेट्सचाही समावेश आहे.
या शिबिरात सहभागी झालेले छात्रसैनिक, सांस्कृतिक स्पर्धा आणि राष्ट्रीय एकात्मता जागृतीपर कार्यक्रम अशा विविध कार्यक्रमात भाग घेतील. भारताचे उपराष्ट्रपती, संरक्षण मंत्री, संरक्षण राज्य मंत्री, दिल्लीचे मुख्यमंत्री, संरक्षण कर्मचारी आणि सेवा प्रमुखांसह अनेक मान्यवरही या शिबिराला भेट देतील.
लेफ्टनंट जनरल गुरबीरपाल सिंग यांनी यावेळी बोलताना छात्रसैनिकांना शिबिरात मनापासून सहभागी व्हायला आणि शिबिरातल्या प्रत्येक उपक्रमाचा जास्तीत जास्त लाभ उठवायला सांगितले. युवा वर्गाच्या नवनवीन आशा आकांक्षा आणि समाजाच्या अपेक्षा लक्षात घेऊन प्रशिक्षणाचा कार्यक्रम अधिक समावेशी केला आहे, असे त्यांनी सांगितले.
छात्रसैनिकांचे व्यक्तिमत्व विकास, नेतृत्वगुण आणि ‘सॉफ्ट स्किल्स’ यात सुधारणा करून त्यांना भविष्यासाठी सज्ज करण्यावर या शिबिराचा भर आहे, असे ते म्हणाले. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने राष्ट्रीय राजधानीत होणाऱ्या महत्त्वाच्या कार्यक्रमांद्वारे आपल्या देशाची समृद्ध परंपरा आणि संस्कृतीची मूल्ये यांचे दर्शन घडवणे हे प्रजासत्ताक दिन शिबिराचे उद्दिष्ट आहे. याशिवाय, छात्रसैनिकांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास आणि त्यांची मूल्यधारणा मजबूत करणे हे यामागील उद्दिष्टआहे.
***
सुवर्णा बेडेकर/भक्ती सोनटक्के/सी यादव
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1888024)
Visitor Counter : 262