विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
‘2023 सायन्स व्हिजन’(2023 साठी निश्चित केलेले वैज्ञानिक उपक्रम) बद्दल केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी नवी दिल्ली इथे प्रसारमाध्यमांना दिली माहिती
विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष, 2047 मध्ये भारतीय स्वातंत्र्याच्या शतकमहोत्सवाचे शिलेदार असतील-मंत्र्यांचं प्रतिपादन
या अमृत काळात भारताला संशोधन आणि नवनिर्मितीचं जागतिक केंद्र बनवायचं असेल तर विज्ञान आणि तंत्रज्ञानाशी संबंधित संशोधन स्थानिक पातळीवर पोहोचलं पाहिजे: डॉ जितेंद्र सिंह
प्रविष्टि तिथि:
01 JAN 2023 5:48PM by PIB Mumbai
नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी माध्यमांशी संवाद साधताना, केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) विज्ञान आणि तंत्रज्ञान; राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) पृथ्वी विज्ञान; राज्यमंत्री पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रारी, निवृत्ती वेतन, अणुऊर्जा आणि अंतराळ, डॉ जितेंद्र सिंह यांनी आज सांगितलं की, 2023 सायन्स व्हिजन, म्हणजेच 2023 सालासाठी भारतानं निश्चित केलेले वैज्ञानिक उपक्रम, 2047 साली (स्वातंत्र्याच्या शतक महोत्सवात) दिसणारा भारत घडवतील.
डॉ जितेंद्र सिंह पुढे म्हणाले की, 2023 हे वर्ष, 2047 साली भारत स्वातंत्र्याची शंभर वर्ष पूर्ण करण्यापूर्वीच्या शेवटच्या 25 वर्षांपैकी किंवा स्वातंत्र्यप्राप्तीच्या शतकपूर्तीच्या शेवटच्या एक चतुर्थांश कालखंडापैकी पहिलं वर्ष आहे आणि शतकपूर्ती होत असताना देशासाठी पाहिलेल्या स्वप्नांची पूर्तता कशाप्रकारे होत राहील हे समजण्याचं वर्ष आहे.
हे एक असं वर्ष देखील आहे, जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत G20 समुहाचा यजमान म्हणून आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर स्वतःचं महत्त्व पुनर्स्थापित करू पाहतोय, तसच असं एक दखलपात्र राष्ट्र म्हणून स्थान निर्माण करू पाहतोय ज्याच्या एका प्रस्तावावर संपूर्ण जग आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष साजरं करत आहे, असं मंत्री म्हणाले.

डॉ जितेंद्र सिंह म्हणाले, “ज्यांच्याकडे नाविन्यपूर्ण कल्पना आणि चाकोरी बाहेरील उद्दिष्टं आहेत आणि ती साध्य करण्याचा दृढनिश्चय आणि धैर्य सुद्धा आहे, त्यांचा भविष्यकाळ उज्वल आहे". केवळ चाकोरी बाहेर जाऊन विचार करणारेच नाहीत, तर 130 कोटी भारतीयांना साहसी निर्णय घेण्यासाठी प्रेरीत करणारे पंतप्रधान आपल्याला लाभले आहेत असं जितेंद्र सिंह यांनी ठासून सांगितलं.
विज्ञान आणि तंत्रज्ञानाशी संबंधित विभागांनी 2023 या वर्षासाठी त्यांची लक्ष्यं आणि महत्त्वाची कार्यक्षेत्रं आधीच निश्चित केली आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्तक्षेपामुळे खाजगी क्षेत्रासाठी अंतराळ क्षेत्र खुलं केल्यानंतर, भारतीय अंतराळ संशोधन संस्था ISRO शी आज अल्पावधीतच 100 हून अधिक स्टार्टअप्स संलग्न झाले आहेत. हे सर्व सुरु असताना त्याच वेळी, त्यांचं लक्ष वैज्ञानिक शोध मोहिमा, तंत्रज्ञान प्रात्यक्षिक सादरीकरण मोहिमा आणि "गगनयान" या चंद्राच्या पृष्ठभागावर भारतीयाला उतरवणाऱ्या मानवी अंतराळ उड्डाण कार्यक्रमावर सुद्धा आहे.
विद्यमान आणि भविष्यात उद्भवू शकणाऱ्या आजारांसाठी लसींचा विकास आणि विद्यमान लसींमध्ये गुणात्मक बदल घडवून आणणं यात गुंतवणूक करून कोविड-19 लसीकरण मोहिमेत मिळणाऱ्या यशात, बायोटेक्नॉलॉजी अर्थात जैवतंत्रज्ञान विभाग (DBT) यापुढेही सातत्य राखेल. महत्त्वाचं म्हणजे, आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्षात, भरड धान्य आणि वनस्पती विषाणूंच्या पॅथो-जीनोमिक्स म्हणजेच सूक्ष्मजीव शोधतंत्रज्ञानावरही प्रामुख्यानं मोहीमा सुरू केल्या जातील.
स्वच्छ ऊर्जा उपक्रमाचा भाग म्हणून स्वदेशी हरीत हायड्रोजन क्षेत्रात या आधीच बराच मोठा पल्ला गाठलेला असल्यामुळे, 2023 मध्ये वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (CSIR), हरित हायड्रोजनवर देखील लक्ष केंद्रित करेल.

पृथ्वी विज्ञान मंत्रालय (MoES), येत्या काळात भारताच्या अर्थव्यवस्थेत मोलाची भर घालू शकणाऱ्या डीप सी मिशन म्हणजेच खोल समुद्रातील उपक्रम आणि त्यासाठी आवश्यक तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करेल. 2023 या वर्षात, ब्लू इकॉनॉमी म्हणजेच सागरी अर्थव्यवस्थेमध्ये आणखी प्रगती होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात दोनदा, प्रथम 2021 मध्ये आणि नंतर पुन्हा 2022 मध्ये, डीप ओशन मिशनचा उल्लेख केला, हे त्यामुळेच महत्त्वाचं ठरतं.
अणुऊर्जा विभाग (DAE), भारताच्या निवडणूक व्यवस्थापनातील योगदान म्हणून, भारताच्या निवडणूक आयोगासाठी सुमारे 21 लाख उपकरणं देईल. यामध्ये बॅलेट युनिट्स (BU) म्हणजेच मतदान यंत्र, कंट्रोल युनिट्स (CU) म्हणजेच नियामक यंत्र आणि व्होटर व्हेरिफायेबल पेपर ऑडिट ट्रेल (VVPAT) अर्थात मतदान केल्याची पोचपावती देणारी यंत्र यांचा समावेश आहे. ECIL अर्थात इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, येत्या सप्टेंबर ते ऑक्टोबर पर्यंत या उपकरणांची पूर्तता करेल.
***
S.Patil/A.Save/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1887888)
आगंतुक पटल : 412