गृह मंत्रालय
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी नवी दिल्ली इथे सीमा सुरक्षा दलाचे(बीएसएफ) मोबाइल अॅप ‘प्रहारी’ आणि 13 मॅन्युअलच्या सुधारित आवृत्तीचे केले अनावरण
Posted On:
29 DEC 2022 11:29PM by PIB Mumbai
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज नवी दिल्ली इथे सीमा सुरक्षा दलाच्या (बीएएसएफ) “प्रहारी’ या मोबाइल अॅपचे आणि मॅन्युअलचे (माहिती पुस्तिका) अनावरण केले. केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय, केंद्रीय गृहसचिव, बीएसएफचे महासंचालक, केंद्रशासित प्रदेशांचे मुख्य सचिव आणि गृह मंत्रालय, केंद्रशासित प्रदेश आणि बीएसएफचे अनेक वरिष्ठ अधिकारीही यावेळी उपस्थित होते.
आपल्या भाषणात केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री म्हणाले की बीएसएफचे ‘प्रहारी’ अॅप हे सक्रीय प्रशासनाचे उत्तम उदाहरण आहे. आता जवानांना त्यांच्या मोबाईलवर वैयक्तिक माहिती आणि निवास व्यवस्था, आयुष्मान-सीएपीएफ आणि रजांशी संबंधित माहिती मिळू शकते. मग तो जीपीएफ असो, बायो डेटा असो किंवा “केंद्रीय सार्वजनिक तक्रार निवारण आणि देखरेख प्रणाली” (CP-GRAMS) वर तक्रार निवारण असो किंवा विविध कल्याणकारी योजनांची माहिती असो, आता जवानांना ही सर्व माहिती अॅपद्वारे मिळू शकते आणि हे अॅप त्यांना गृह मंत्रालयाच्या पोर्टलशी देखील जोडेल. याबरोबरच, त्यांनी बीएएसएफ चे महासंचालक पंकज कुमार आणि त्यांच्या संपूर्ण पथकाचे, 13 मॅन्युअल्समधील प्रलंबित सुधारणा आणि अपडेट (अद्ययावतीकरण) केल्याबद्दल अभिनंदन केले, ज्यामुळे कार्यपद्धती, प्रशासन आणि प्रशिक्षणाची समज वाढेल आणि कामाचा वेग वाढेल. यामुळे बीएसएफच्या सर्व श्रेणीतील जवान आणि अधिकाऱ्यांचे काम सुलभ होईल, याची आपल्याला खात्री असल्याचे शाह म्हणाले. ते म्हणाले की, या नवीन उपक्रमांमुळे बीएसएफच्या कामात सुलभता आणि सहजता येईल.
गृहमंत्री म्हणाले की, सीमा सुरक्षा दल देशाच्या सर्वात कठीण सीमा भागाचे रक्षण करते. अटलजींनी ‘वन बॉर्डर वन फोर्स’ ही संकल्पना मांडल्यानंतर पाकिस्तान आणि बांगलादेशला लागून असलेल्या आपल्या सीमेची जबाबदारी बीएसएफकडे आली आहे, आणि बीएसएफचे शूर सैनिक अत्यंत दक्षतेने, ताकदीने आणि तत्परतेने तसेच सातत्यपूर्ण प्रयत्नांनी या सीमेचे रक्षण करत आहेत. ते म्हणाले की, देशाच्या सीमा खांब किंवा कुंपण घालून सुरक्षित होत नाहीत, तर त्या सीमेवर उभ्या असलेल्या जवानांचे शौर्य, देशप्रेम आणि सतर्कतेनेच होते. देशाचे गृहमंत्री या नात्याने आपण बीएसएफच्या सर्व जवानांच्या शौर्याचे, दक्षतेचे आणि सतर्कतेचे कौतुक करत असल्याचे शाह यावेळी म्हणाले.
अमित शहा म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच व्हायब्रंट व्हिलेज कार्यक्रम सुरू केला आहे. सीमा सुरक्षा दलांनी व्हायब्रंट व्हिलेज कार्यक्रमाच्या माध्यमातून, गावातील पर्यटन वाढवण्याचे, गावांना संपूर्ण सुविधांनी परिपूर्ण आणि स्वयंपूर्ण करण्याचे प्रयत्न करावेत असे आवाहन त्यांनी केले. शहा म्हणाले की, सीमावर्ती गावांमधील लोकसंख्या वाढल्यावरच सीमेची सुरक्षा सुनिश्चित करता येईल. सीमेवरील जवानांच्या तैनातीबरोबरच गावात राहणारे देशभक्त नागरिकच आपल्या गावाला कायमस्वरूपी सुरक्षा देऊ शकतात, त्यामुळे सीमेचे रक्षण करणाऱ्या सर्व दलांनी त्यांच्या या प्रयत्नांना बळकटी द्यायला हवी.
सीमा सुरक्षा बला- (बीएसएफ) -मागे मोठा इतिहास असून या बलाने अनेक शौर्य पुरस्कार मिळवले आहे. त्यामध्ये एक महावीर चक्र, चार कीर्ती चक्र, 13 वीर चक्र आणि 13 शौर्य चक्रांचा समावेश आहे, असे केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री म्हणाले. बीएसएफने अनेक युद्धांत असे शौर्य गाजवले आहे की प्रत्येक युद्धावर एक पुस्तक लिहिता येईल. गेल्या तीन वर्षांत 26,000 किलो अंमली पदार्थ आणि 2,500 शस्त्रास्त्रे व दारूगोळा बीएसएफच्या माध्यमातून जप्त करण्यात आला. अँटि-ड्रोन तंत्रज्ञानाचा सीमारेषेवरील वापर अद्याप प्रायोगिक टप्प्यात असला तरी तो जवळपास यशस्वी ठरला आहे, हे बीएसएफचे मोठे यश आहे. गेल्या सहा महिन्यांत बीएसएफने पश्चिमेकडील सीमा भागात 22 ड्रोनवर मारा करून ते पाडले आहेत. तसेच, अंमली पदार्थांचा प्रसार करण्यासाठी व दहशतवाद पसरवण्यासाठी शस्त्रे घेऊन येणाऱ्या ड्रोनच्या विरोधात या तंत्रज्ञानाच्या वापरात बीएसएफला यश येत आहे. नोएडा इथे ‘बीएसएफ ड्रोन/यूएव्ही (मानवरहित हवाई वाहन) आणि सायबर फॉरेन्सिक प्रयोगशाळा’ स्थापन करण्यात आली असून सीमा भागात पकडलेल्या ड्रोनचा तपास तिथे केला जातो, अशी माहिती केंद्रीय गृह मंत्र्यांनी यावेळी दिली.
भौगोलिकदृष्ट्या अवघड प्रदेशात, दुर्गम असलेल्या सीमारेषेच्या काही भागांमध्ये कुंपण घालणे शक्य झालेले नाही. अशा भागांवर लक्ष ठेवण्यासाठी बीएसएफनेच इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञानाधारे गस्त घालण्यासाठी यंत्रणा निर्माण केली आहे; तिचा खर्च कमी, मात्र परिणामकारकता खूप जास्त आहे. त्यामुळे बीएसएफला अशा भागांत सीमारेषेवर सातत्याने लक्ष ठेवणे शक्य झाले आहे. दुर्गम भागात 140 किमी लांबीचे कुंपण आणि 400 किमी लांबीचे रस्ते बांधून झाले आहेत. त्याच बरोबर, सीमा भागात 120 पेक्षा जास्त चौक्या उभारल्या आहेत, असे गृह मंत्र्यांनी सांगितले. बीएसएफचे जवान सीमा भागात कठीण परिस्थितीत, प्रसंगी न्यूनतम तापमानात, पहारा करून देशाचे रक्षण करण्यास कटिबद्ध राहिले आहेत तसेच, केंद्र सरकार जवानांच्या कुटुंबियांची काळजी घेण्याबाबत कटिबद्ध आहे, असे ते म्हणाले.
सीमारेषेलगतच्या प्रदेशाच्या विकासासाठी सरकार कार्यरत आहे. त्या हेतूने या भागात नऊ एकात्मिक चौक्या उभारण्यात आल्या असून आणखी 14 चौक्यांचे बांधकाम सुरू आहे, असे केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री म्हणाले. भारत सरकार आणि राज्य सरकारांच्या सर्व कल्याणकारी कार्यक्रमांची सीमा भागात 100% अंमलबजावणी होणे गरजेचे असल्याचे त्यांनी बीएसएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितले. सीमा भागातील गावे सोडून जाण्यास इच्छुक जनतेला ‘प्रधान मंत्री आयुष्मान भारत योजने’चा लाभ मिळवून दिल्यास व त्या बरोबरीने त्यांच्यासाठी गॅस, वीज पुरवठा, पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिल्यास त्यांना गावे सोडून जावेसे वाटणार नाही, सरकार त्यांची काळजी घेत असल्याची भावना त्यांच्यात निर्माण होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला आत्मनिर्भरतेकडे नेण्यासाठी सुरू केलेल्या विविध उपक्रमांची अंमलबजावणी सीमाभागांमध्ये प्राधान्याने होणे गरजेचे आहे व त्यात सुरक्षा दलांची विशेषतः बीएसएफची भूमिका महत्त्वाची आहे, असे ते म्हणाले.
***
S.Kane/R.Agashe/R.Bedekar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1887593)
Visitor Counter : 253