आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. मनसुख मांडवीया यांची सफदरजंग रुग्णालयाला भेट, कोविड-19 व्यवस्थापनासाठी रुग्णालय पायाभूत सुविधांच्या सज्जतेच्या मॉक ड्रिलचाही घेतला आढावा
Posted On:
27 DEC 2022 3:33PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 डिसेंबर 2022
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडवीया यांनी आज नवी दिल्लीत सफदरजंग रुग्णालयात कोविड-19 च्या व्यवस्थापनासाठी रुग्णालय सज्जतेविषयक मॉक ड्रिलचा आढावा घेतला.
'कोविडची सद्यस्थिती आणि कोविडचे व्यवस्थापन- प्रतिबंध याबद्दल राज्याराज्यात सुरु असलेल्या तयारीचा आरोग्यमंत्र्यांसह आपण नुकताच आढावा घेतला आहे" असं मांडवीया यावेळी म्हणाले. आज देशभरातल्या रुग्णालयात, कोविड व्यवस्थापन सज्जतेचा आढावा घेण्यासाठी मॉक ड्रिल्स घेतल्या जात आहेत. या मॉक ड्रिल्स साठी रुग्णालयांच्या पायाभूत सुविधा आणि तयारी महत्वाची आहे. त्यासाठीच सरकार तसेच खाजगी रुग्णालये मॉक ड्रिल्स घेत आहेत. आणि राज्य सरकारे त्यावर देखरेख ठेवून आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
यावेळी मांडवीया यांनी विविध विभागांच्या प्रमुखांशी आणि सफदरजंग रुग्णालय आणि वर्धमान मेडिकल कॉलेजच्या कर्मचारी वृंदांशी अनौपचारिक संवादही साधला. विविध विभागांचे प्रमुख, डॉक्टर्स, परिचारिका, सुरक्षा विभागांचे प्रमुख आणि सफाई विभागाचे कर्मचारी यांच्यासोबत मांडवीया यांनी जवळपास एक तास संवाद साधला आणि त्यांनी केलेल्या विविध सूचना लक्षपूर्वक ऐकल्या. रुग्णालय व्यवस्थापन दर्जा, उपचार पद्धती, संसर्ग आणि नियंत्रणविषयक उपाययोजना, स्वच्छता प्रक्रिया आणि रुग्ण केंद्री उच्च दर्जाच्या आरोग्य सुविधा, अशा विविध विषयांवर यावेळी सर्वानी सूचना दिल्या.
कोविड महामारीच्या काळात चोवीस तास सेवा देण्याच्या कामाचा अनुभव देखील त्यांनी सांगितला. विभागप्रमुखांनी दर आठवड्याला त्यांच्या चमूला भेटावे, सर्व विभागांची प्रत्यक्ष भेट घ्यावी आणि उत्तम काम होईल यासाठी सर्वांच्या कामगिरीचे वेळोवेळी मूल्यांकन करावे, असा सल्ला डॉ मांडवीया यांनी दिला. कोविड काळात, डॉक्टरांनी केलेल्या कामाची त्यांंनी प्रशंसाही केली.
कोविडबाबत निष्काळजीपणा बाळगू नये आणि कोविड-19 प्रतिबंधक वर्तनाचे पालन करावे असं आवाहनही त्यांनी केलं. सर्वांनी सतर्क राहवे, सत्यता पडताळल्या शिवाय माहिती सामायिक करु नये आणि उच्च पातळीवरील सज्जता सुनिश्चित करावी यावर त्यांनी भर दिला. जगभरात कोविड-19 रुग्णसंख्या वाढत आहे. भारतातही वाढ होऊ शकते. म्हणून कोविड-19 प्रतिबंधक पायाभूत सुविधा अर्थात आवश्यक उपकरणे, प्रक्रीया आणि मनुष्यबळ सज्ज ठेवण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
* * *
S.Kane/V.Ghode/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1886866)
Visitor Counter : 261