वस्त्रोद्योग मंत्रालय
वर्ष अखेर आढावा 2022- वस्त्रोद्योग विभाग
Posted On:
26 DEC 2022 10:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 डिसेंबर 2022
प्रॉडक्शन लिंकड् इनसेंटीव्ह (PLI) योजनेंतर्गत आतापर्यंत सुमारे 1536 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे.
विशेष फायबर आणि तांत्रिक वस्त्रासाठी राष्ट्रीय तांत्रिक वस्त्रोद्योग अभियान (NTTM) अंतर्गत 232 कोटी रुपये मूल्याचे 74 संशोधन प्रस्ताव मंजूर करण्यात आले.
सुधारित तंत्रज्ञान उन्नयन फंड योजना (ATUFS) आणि विशेष मोहिमेंतर्गत 3159 प्रकरणांमध्ये 621.41 कोटी रुपयांचे अनुदान देण्यात आले.
पीएम मित्र योजनेअंतर्गत प्रस्ताव प्राप्त करण्यापासून ते प्रॉडक्शन लिंकड् इनसेंटीव्ह योजनेअंतर्गत गुंतवणुकीपर्यंत, वस्त्रोद्योग मंत्रालयासाठी हे एक महत्त्वाचे वर्ष होते. मंत्रालयाने हातमाग क्षेत्राला आर्थिक मदत दिली आणि अनेक हस्तकला प्रदर्शने आयोजित केली.
वर्ष 2022 मधील मंत्रालयाचे काही प्रमुख उपक्रम आणि उपलब्धी पुढीलप्रमाणे आहेत:
पीएलआय योजना
कापड उद्योगाला नवा आकार आणि नवी उंची गाठता यावी आणि स्पर्धात्मक बनता यावे तसेच देशातील मानवनिर्मित धाग्यांपासून (MMF) बनवलेले कपडे, मानवनिर्मित धाग्यांपासून (MMF) तयार कापड, आणि तांत्रिक वस्त्रांच्या उत्पादनांच्या उत्पादनास प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने उत्पादन लिंक्ड इन्सेंटिव्ह (PLI) योजनेअंतर्गत 10,683 कोटी रुपये मंजूर केले आहेत. प्रॉडक्शन लिंकड् इनसेंटीव्ह योजनेअंतर्गत वस्त्रोद्योगासाठी 01.01.2022 ते 28.02.2022 पर्यंत वेब पोर्टलद्वारे एकूण 67 अर्ज प्राप्त झाले आहेत. वस्त्रोद्योग सचिवांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने योजनेअंतर्गत 64 अर्जदारांची निवड केली आहे. 56 अर्जदारांनी नवीन कंपनी स्थापनेसाठी अनिवार्य निकष पूर्ण केले आहेत आणि त्यांना मंजूरी पत्रे जारी करण्यात आली आहेत. आतापर्यंत सुमारे 1536 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे.
पीएम मित्र
2027-28 पर्यंत 4445 कोटी रुपये किमतीच्या, प्लग अँड प्ले सुविधेसह जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी 7 (सात) पीएम मेगा इंटिग्रेटेड टेक्सटाईल रीजन अँड अपेरल (पीएम मित्रा) पार्कच्या स्थापनेला सरकारने मंजुरी दिली होती. योजनेच्या संदर्भात मार्गदर्शक तत्त्वे प्रकाशित करण्यात आली आहेत आणि प्रस्ताव आमंत्रित करण्यासाठी राज्य सरकारांशी अनेकवेळा संवाद साधण्यात आला आहे. या संवादाला मिळालेल्या प्रतिसादात 13 राज्यांमधून 18 प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. प्रस्तावांवर चर्चा करण्यासाठी 04.05.2022 रोजी राज्य सरकारे आणि उद्योग संघटनांच्या वरिष्ठ अधिकार्यांसह राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. स्थानिक फायदे समजून घेण्यासाठी प्रस्तावित पीएम मित्र पार्क ठिकाणांचे मूल्यांकन गती शक्ती पोर्टलद्वारे करण्यात आले. स्थळांच्या निवडीसाठी सध्या चॅलेंज मॅट्रिक्सद्वारे तपशीलवार छाननी सुरू आहे.
नॅशनल टेक्निकल टेक्सटाईल मिशन (NTTM)
NTTM अंतर्गत, विशेष फायबर आणि तांत्रिक वस्त्राच्या श्रेणीमध्ये 232 कोटी रुपये मूल्याचे 74 संशोधन प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. तांत्रिक वस्त्रोद्योगाच्या बाजारपेठेचा विकास आणि प्रोत्साहन यासाठी 4 प्रमुख परिषदांचे आयोजन करण्यात आले आहे. (i) 12/03/22 रोजी CII सोबत दिल्ली येथे आंतरराष्ट्रीय परिषद, (ii) 23/08/2022 रोजी इम्फाळ येथे भारतीय उद्योग परिसंघासोबत (ICC) जिओटेक आणि ऍग्रोटेक संबंधित परिषद, (iii) 16/11/2022 रोजी दिल्ली येथे संरक्षणात्मक वस्त्रांवर राष्ट्रीय परिषद आणि (iv) चेन्नई येथे 25-26 नोव्हेंबर 2022 रोजी CII आणि तामिळनाडू सरकारसह झालेली आंतरराष्ट्रीय परिषद. तांत्रिक वस्त्रोद्योग क्षेत्रात 31 नवीन HSN कोड विकसित करण्यात आले आहेत. कृत्रिम रेऑन वस्त्र निर्यात प्रोत्साहन परिषदेला (SRTEPC) तांत्रिक कापड निर्यात प्रोत्साहन परिषदेची भूमिका सोपवण्यात आली आहे.
सुधारित तंत्रज्ञान उन्नयन फंड योजना (ATUFS)
उद्योगाने 2443 अनुदान प्रकरणांमध्ये 10,218 कोटी रुपये गुंतवणुकीची पुष्टी केली. सुधारित तंत्रज्ञान उन्नयन फंड योजनेअंतर्गत 3159 प्रकरणांमध्ये एकूण 621.41 कोटी रुपये अनुदान जारी करण्यात आले आणि अनुशेष प्रकरणे निकाली काढण्यासाठी मोठ्या क्लस्टर्सवर विशेष मोहिमा आयोजित करण्यात आल्या.
समर्थ योजना
एकूण 73,919 व्यक्तींना (अनुसूचित जाती: 18,194, अनुसूचित जमाती: 8,877 आणि महिला: 64,352) प्रशिक्षण देण्यात आले असून त्यापैकी 38,823 व्यक्तींना, वस्त्रोद्योग क्षेत्रातील क्षमता वाढविण्यासाठीची योजना- समर्थ- अंतर्गत नियुक्ती देण्यात आली आहे.
राष्ट्रीय फॅशन तंत्रज्ञान संस्था (NIFT)
शैक्षणिक सत्र 2022-23 साठी दमण येथे संस्थेचा नवीन परिसर कार्यान्वित करण्यात आला. शिवाय भोपाळ आणि श्रीनगर येथील संस्थेच्या परिसरात नवीन इमारती देखील बांधण्यात येत आहेत.
रेशीम क्षेत्र
एकूण कच्चे रेशीम उत्पादन 28,106 मेट्रिक टन होते. रेशीम क्षेत्राशी संबंधित 44 संशोधन आणि विकास प्रकल्प सुरू करण्यात आले तर विविध उपक्रमांमध्ये 9,777 व्यक्तींना प्रशिक्षण देऊन 23 प्रकल्प पूर्ण करण्यात आले.
ज्यूट सेक्टर
JUTE-ICARE (सुधारित लागवड आणि प्रगत रीटिंग क्रिया) योजना: 1,89,483 हेक्टरवर 170 ताग उगवणार्या ब्लॉक्समुळे, 4,20,309 ताग शेतकर्यांना फायदा झाला आहे. मार्केट डेव्हलपमेंट अँड प्रमोशन स्कीम (MDPS) मुळे निर्यात कार्यप्रदर्शन सुधारले आहे. निर्यात कार्यप्रदर्शन गेल्या वर्षीच्या तुलनेत 38% ने वाढले असून सध्या 3786 कोटी रुपये मूल्याची निर्यात झाली आहे. निर्यात केलेल्या ज्यूट डायव्हर्सिफाइड उत्पादनांचे मूल्य गेल्या वर्षीच्या तुलनेत 46% वाढीसह 1744 कोटी रुपये इतके आहे. सुमारे 9.80 हजार कोटी रुपये किमतीच्या सुमारे 26.87 लाख तागाच्या पिशव्यांच्या गाठींची मागणी नोंदवण्यात आली आहे.
कापूस क्षेत्र
कापूस लागवड क्षेत्र 5% ने वाढून 125.02 लाख हेक्टर झाले आहे, जे गतवर्षी 119.10 लाख हेक्टर होते. भारतीय कापसासाठी कस्तुरी कॉटन इंडिया नावाचा ब्रँड लॉन्च करण्यात आला आहे. कापसाच्या यांत्रिक कापणीला प्रोत्साहन देण्यासाठी, कापसाची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि मजुरीचा खर्च कमी करण्यासाठी हा ब्रँड उपयोगी ठरेल. याशिवाय, हातात पकडण्याच्या 75, 000 कापूस वेचणी मशीनचे वाटप केले जात आहे.
लोकर क्षेत्र
प्रकल्प पशु/ मेंढीपालन विभाग, लेहने पश्मीना लोकर खरेदी करण्यासाठी तसेच लेहमधील भटक्या लोकांच्या राहणीमानात सुधारणा करण्याच्या उद्देशाने 400 पोर्टेबल तंबूंचे वितरण यासाठी सुमारे 2 कोटी रुपयांचा फिरता निधी मंजूर केला आहे. पश्मिना शेळ्यांच्या सुरक्षिततेसाठी 300 प्रीडेटर प्रूफ कोरलचे बांधकाम तसेच उत्तराखंडमध्ये 50 मेंढ्यांची कातरणी यंत्रे खरेदी करण्याच्या प्रकल्पासाठी हा निधी वापरला जाणार आहे.
हातमाग क्षेत्र
91 हातमाग क्लस्टर्सना 76.60 कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे. HSS अंतर्गत 1,109 विणकरांना सुधारित हातमाग आणि उपकरणे प्रदान केली. राष्ट्रीय हातमाग विकास कार्यक्रमाच्या हातमाग क्लस्टर्स अंतर्गत 2,107 हातमाग कामगारांना कौशल्य उन्नती प्रशिक्षण देण्यात आले. 141 विपणन कार्यक्रमांसाठी 18.49 कोटी रुपयांची मदत जारी करण्यात आली आहे. याशिवाय व्यापक हातमाग क्लस्टर विकास योजनेअंतर्गत मेगा हातमाग क्लस्टर्सना मंजूर केलेल्या विविध उपक्रमांसाठी 10.40 कोटी रुपयांची मदतही जारी करण्यात आली आहे. परिवहन अनुदान घटकांतर्गत 102.05 लाख किलो सुताचा पुरवठा करण्यात आला, कमी किमतीच्या अनुदान घटकांतर्गत 73.79 लाख किलो सुताचा पुरवठा करण्यात आला आणि कच्चा माल पुरवठा योजना (RMSS) अंतर्गत एकूण 175.84 लाख किलो सूत पुरवठा करण्यात आला.
हस्तकला क्षेत्र
एकूण 272 विपणन कार्यक्रम आयोजित केले गेले, ज्याचा फायदा 19,330 कारागिरांना झाला. 30 लाख कारागिरांना पहचान कार्ड जारी करण्यात आले आणि ते सार्वजनिक डोमेनवर अपलोडही करण्यात आले. 52 कारागीर उत्पादक कंपन्या स्थापन करण्यात आल्या आणि त्यांना पाठिंबा देण्यात आला. 418 प्रशिक्षण कार्यक्रम आणि डिझाईन कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या ज्यांचा 12,480 कारागिरांना फायदा झाला. 13,579 कारागिरांना आधुनिक टूलकिटचे वाटप करण्यात आले. 108 कारागिरांना 2017, 2018 आणि 2019 या वर्षांसाठी शिल्प गुरू आणि राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आले.
* * *
S.Thakur/S.Mukhedkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1886833)
Visitor Counter : 229