आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

जगभरात कोविड-19 रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ लक्षात घेऊन डॉ. मनसुख मांडविया यांनी कोविड-19 स्थितीचा आणि स्थितीवर देखरेख, प्रतिबंध आणि व्यवस्थापनासाठी सार्वजनिक आरोग्य प्रणालीच्या सज्जतेचा घेतला आढावा


कोविड अद्याप संपलेला नाही. पूर्णपणे दक्ष राहण्याचे आणि परिस्थितीवर लक्ष ठेवण्याचे निर्देश मी सर्व संबंधितांना दिले आहेत. मी नागरिकांना देखील कोविड प्रतिबंधक लसी घेण्याचे आवाहन करतो- डॉ. मांडविया

नव्या उत्परिवर्तकाचा माग काढता यावा यासाठी मी सर्व राज्ये/ केंद्रशासित प्रदेश यांना कोविड-19 पॉझिटिव्ह रुग्णांचे नमुने इन्साकॉगकडे पाठवण्याचा सल्ला देत आहे- डॉ. मांडविया

Posted On: 21 DEC 2022 5:10PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 21 डिसेंबर 2022

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉक्टर मनसुख मांडविया यांनी काही देशांमध्ये कोविड-19 रुग्णांच्या संख्येत नुकत्याच झालेल्या वाढीचे गांभीर्य लक्षात घेऊन भारतातील कोविड-19 परिस्थितीचा आणि स्थितीवर देखरेख, प्रतिबंध आणि व्यवस्थापनासाठी सार्वजनिक आरोग्य प्रणालीच्या सज्जतेचा  एका उच्चस्तरीय बैठकीत आढावा घेतला.  या बैठकीला केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती प्रवीण पवार, नीती आयोगाचे आरोग्य सदस्य डॉक्टर व्ही के पॉल आणि इतर वरिष्ठ अधिकारी तसेच सार्वजनिक आरोग्य तज्ञ उपस्थित होते.  यावेळी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना जगभरातल्या कोविड-19 परिस्थितीची आणि स्थानिक पातळीवर दिसत असलेल्या चित्राची माहिती देण्यात आली. चीन, जपान, दक्षिण कोरिया, फ्रान्स आणि अमेरिका यांसारख्या काही देशांमध्ये कोविड-19 रुग्णांच्या संख्येत झालेल्या वाढीने निर्माण झालेल्या आव्हानाला अधोरेखित करत केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी आपल्या सज्जतेचे आणि नव्या आणि उदयाला येणाऱ्या कोविड-19 परिवर्तकाच्या विरोधात, विशेषतः आगामी काळात येऊ घातलेल्या उत्सवाच्या तोंडावर  सज्ज राहण्याचे आणि दक्ष राहण्याचे महत्त्व नमूद केले. कोविड-19 अद्याप संपलेला नाही याकडे लक्ष वेधत आणि या इशाऱ्याचा पुनरुच्चार करत त्यांनी सर्व अधिकाऱ्यांना पूर्णपणे दक्ष राहण्याचे आणि परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले. लोकांनी कोविड 19 प्रतिबंधासाठी आवश्यक असलेल्या वर्तनाचा अंगिकार करावा आणि कोविड प्रतिबंधक लस घ्यावी असे आवाहन त्यांनी केले.

देशामध्ये जर कोणतेही नवे उत्परिवर्तक पसरत असतील तर त्यांचा वेळेत शोध घेण्यासाठी, पॉझिटिव्ह रुग्णांच्या नमुन्याची संपूर्ण जनुकीय क्रमवारी इंडियन सार्स कोव्ह-2 जिनोमिक्स कन्सोर्टियम( इन्साकॉग) च्या जाळ्याच्या मदतीने निश्चित करण्यासाठी देखरेख प्रणाली बळकट करण्याचे निर्देश डॉ. मनसुख मांडविया यांनी दिले. यामुळे योग्य प्रकारच्या सार्वजनिक आरोग्य उपाययोजना हाती घेता येतील. कोणताही नवा उत्परिवर्तक असल्यास कोविड-19 च्या सर्व पॉझिटिव्ह रुग्णाचे नमुने जनुकीय क्रमनिर्धारणासाठी दररोज इन्साकॉग जिनोम सिक्वेन्सिंग लॅबोरेटरीज(आयजीएसएल) कडे पाठवावेत अशी विनंती राज्ये/केंद्रशासित प्रदेश यांना करण्यात आली आहे.

यावेळी एका सादरीकरणाद्वारे केंद्रीय आरोग्य मंत्र्यांना भारतात 19 डिसेंबर 2022ला संपलेल्या आठवड्यात दैनंदिन रुग्णाच्या संख्येत नियमित गतीने घट होत असल्याची आणि ही संख्या दिवसाला सरासरी 158 पर्यंत खाली आल्याची माहिती देण्यात आली. 

मात्र, गेल्या 6 आठवड्यांपासून जागतिक दैनंदिन सरासरीमध्ये निरंतर वाढीची नोंद  झाली असून 19 डिसेंबर ला संपलेल्या आठवड्यात दररोज सरासरी 5.9 लाखांपर्यंत नव्या रुग्णांची नोंद होत आहे.

BF.7 हा नवा आणि अतिशय जास्त संसर्गकारक असलेला ओमायक्रॉनचा उत्परिवर्तक चीनमंध्ये खूप जास्त प्रमाणात झालेल्या संसर्गवाढीला कारणीभूत असल्याचे मानले जात आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने  यापूर्वीच जून 2022 मध्ये कोविड-19 संदर्भात सुधारित देखरेख धोरणासाठी परिचालनात्मक मार्गदर्शक नियमावली जारी केली आहे. यामध्ये वेळेवर निदान, विलगीकरण, चाचणी आणि संशयित आणि आजाराची पुष्टी केलेल्या रुग्णाचे योग्य व्यवस्थापन यांचा समावेश आहे. या सर्वांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी दिले.

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण, प्रधान वैज्ञानिक सल्लागार प्रो. अजय कुमार सूद, जैवतंत्रज्ञान विभागाचे सचिव डॉ. आर एस गोखले, आयुष सचिव राजेश कोटेचा, आरोग्य संशोधन विभागाचे सचिव डॉ. राजीव बहल, डीजीएचएस डॉ. अतुल गोयल, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव लव अग्रवाल, कोविड कार्यगटाचे अध्यक्ष डॉ. एन के अरोरा, राष्ट्रीय लसीकरण तांत्रिक सल्लागार समूह(एनटीएजीआय) या बैठकीला उपस्थित होते.

 

 

 

  

 

 

 

 

R.Aghor/S.Patil/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 1885459) Visitor Counter : 400