पंतप्रधान कार्यालय
मेघालयमध्ये शिलाँग येथे विविध विकास कामांच्या शुभारंभ प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
Posted On:
18 DEC 2022 10:19PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 डिसेंबर 2022
मेघालयचे राज्यपाल ब्रिगेडियर बीडी मिश्रा, मेघालयचे मुख्यमंत्री संगमा, माझे केंद्रीय मंत्रिमंडळ सहकारी अमित भाई शाह, सर्बानंद सोनोवाल, किरेन रिजिजू, जी किशन रेड्डी, बीएल वर्मा, मणिपूर, मिझोराम, आसाम, अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा आणि सिक्कीमचे मुख्यमंत्री आणि मेघालयच्या माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो!
खुबलेइ शिबोन! (खासी आणि जयंतिया मध्ये नमस्ते) नमेंग अमा! (गारो मध्ये नमस्ते) मेघालय, निसर्ग आणि संस्कृतीने समृद्ध प्रदेश आहे. ही समृद्धी आपल्या स्वागत-सत्कारामधूनही झळकते. आज पुन्हा एकदा मेघालय च्या विकासाच्या उत्सवात सहभागी होण्याचं भाग्य मला लाभलं आहे. मेघालयच्या माझ्या सर्व बंधू-भगिनींचं, कनेक्टिव्हिटी, शिक्षण, कौशल्य आणि रोजगाराच्या डझनभर योजनांसाठी खूप-खूप अभिनंदन.
बंधुनो आणि भगिनींनो,
आज फुटबॉल विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना होत असताना मी इथे फुटबॉलच्या मैदानात फुटबॉलप्रेमींमध्ये आहे, हा योगायोगच आहे. तिथे फुटबॉल ची स्पर्धा सुरु आहे, आणि आपण फुटबॉल मैदानात विकासाची स्पर्धा करत आहोत. मला जाणीव आहे की, सामना कतार मध्ये होत आहे, पण उत्साह आणि आशेची इथेही कमतरता नाही. आणि मित्रांनो, जेव्हा मी फुटबॉल मैदानात आहे आणि सगळीकडे फुटबॉल फीवर आहे, तर आपण फुटबॉलच्या भाषेतच का बोलू नये, आपण फुटबॉलचं उदाहरणच देऊन बोलूया. आपल्याला सर्वांना माहीत आहे की फुटबॉल मध्ये जर कोणी खिलाडु वृत्ती विरोधात जाऊन कुठलीही कृती करतं, तर त्याला रेड कार्ड दाखवून सामन्यामधून बाहेर काढलं जातं. अशाच प्रकारे गेल्या 8 वर्षांत आम्ही नॉर्थ ईस्ट, ईशान्य भारताच्या विकासाशी संबंधित अनेक अडथळ्यांना रेड कार्ड दाखवलं आहे. भ्रष्टाचार, भेदभाव, भाऊ-बंदकी, हिंसा, प्रकल्प रेंगाळत ठेवणं-त्याची दिशाभूल करणं, व्होट बँकेचं राजकारण, हे सर्व दूर करण्यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करत आहोत. मात्र, आपल्याला माहीत आहे, देशालाही माहीत आहे, या वाईट गोष्टींची, रोगांची मुळे खूप खोलवर रुजली आहेत. यासाठीच आपल्या सर्वांना एकत्र येऊन त्याला दूर करायचंच आहे. विकास कामांना गती देण्याचे आणि अधिक प्रभावशाली बनवण्याचे फायदेही आपल्याला दिसू लागले आहेत. इतकंच नाही तर आज केंद्र सरकार खेळाबाबत नवीन दृष्टिकोन घेऊन पुढे जात आहे. त्याचा फायदा ईशान्य भारताला, इथल्या माझ्या जवानांना, आपल्या मुला-मुलींना झाला आहे. देशातलं पाहिलं क्रीडा-विद्यापीठ ईशान्य भारतात आहे. आज ईशान्य प्रदेशात बहु उद्देशीय सभागृह, फुटबॉल मैदान, ऍथलेटिक्स ट्रॅक, यासारख्या 90 प्रकल्पांवर काम सुरु आहे. आज शिलाँगमधून मी असं म्हणू शकतो की, कतारमध्ये सुरू असलेल्या खेळावर आपली नजर असली, मैदानात परदेशी संघ असले, तरी माझा माझ्या देशाच्या युवा शक्तीवर विश्वास आहे. म्हणूनच मी आत्मविश्वासाने सांगू शकतो, की तो दिवस दूर नाही, जेव्हा आपण भारतात अशाच स्पर्धा आयोजित करू आणि तिरंगा झेंड्यासाठी जल्लोष करू.
बंधुनो आणि भगिनींनो,
विकास हा केवळ अर्थसंकल्प, निविदा, पायाभरणी, उद्घाटन एवढ्या औपचारिकते पुरता मर्यादित नसतो. हे तर 2014 सालापूर्वीही होत असे. फिती कापणारे येत होते, नेते पुष्पहारही घालून घेत होते, झिंदाबादच्या घोषणाही देत होते. तर मग आज काय बदललं आहे? आज जो बदल घडून आला आहे, तो आमच्या हेतूमधला आहे. आमच्या संकल्पांमधला आहे, आमच्या प्राधान्य क्रमांमधला आहे, आमच्या कार्य संस्कृतीमधला आहे, प्रक्रियेत आणि निकालातही बदल झाला आहे. आमचा संकल्प हा आधुनिक पायाभूत सुविधा, आधुनिक संपर्क-सक्षमता (कनेक्टीविटी) इथपासून ते विकसित भारताच्या निर्मितीपर्यंतचा आहे. उद्दिष्ट, भारतातलं प्रत्येक क्षेत्र, प्रत्येक वर्गाला वेगवान विकासाच्या मिशनला जोडण्याचं आहे. सबका प्रयास द्वारे, भारताच्या विकासाचं आहे. प्राधान्य, अभाव दूर करण्याला आहे, दरी कमी करण्याला आहे, क्षमता विकासाला आहे, युवा वर्गाला अधिक संधी देण्याला आहे. कार्यसंकृतीमधला बदल म्हणजे, प्रत्येक प्रकल्प, प्रत्येक कार्यक्रम निर्धारित वेळेपूर्वी पूर्ण व्हायला हवा.
मित्रहो,
जेव्हा आम्ही केंद्रसरकारचे प्राधान्यक्रम बदलले, तेव्हा त्याचे सकारात्मक परिणाम संपूर्ण देशात दिसून येत आहेत. या वर्षी देशात 7 लाख कोटी रुपये, हा आकडा मेघालयच्या बंधू-भगिनींनो लक्षात ठेवा, नॉर्थ ईस्ट च्या माझ्या बंधू-भगिनींनो लक्षात ठेवा. केवळ पायाभूत सुविधांसाठी केंद्रसरकार 7 लाख कोटी रुपये खर्च करत आहे. 8 वर्षांपूर्वी हाच खर्च 2 लाख कोटी रुपयांहूनही कमी होता. म्हणजेच, स्वातंत्र्याच्या 7 दशकांनंतरही केवळ 2 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आणि गेल्या 8 वर्षांत आम्ही ही क्षमता जवळजवळ 4 पट वाढवली आहे. आज पायाभूत सुविधांवरून अनेक राज्यांमध्ये स्पर्धा सुरु आहे. विकासाची स्पर्धा सुरु आहे. देशात हा जो बदल घडून आला आहे, आज त्याचा सर्वात मोठा लाभार्थी सुद्धा माझा ईशान्य भारत आहे. शिलाँग सह ईशान्येच्या सर्व राजधान्या रेल्वे सेवेने जोडल्या जाव्यात, यासाठी वेगाने काम सुरु आहे. वर्ष 2014 पूर्वी जिथे दर आठवड्याला केवळ 900 विमान फेऱ्या शक्य होत्या, आज त्याची संख्या जवळजवळ एक हजार नऊशे पर्यंत पोहोचली आहे. कधी काळी 900 होती, आता 1900 असेल. आज मेघालय मध्ये उडान योजने अंतर्गत 16 मार्गांवर विमान सेवा सुरु झाली आहे. यामुळे मेघालय वासियांना स्वस्त विमान सेवेचा लाभ मिळत आहे. हवाई मार्गा द्वारे अधिक चांगले जोडले गेल्याचा फायदा मेघालय आणि ईशान्य भारताच्या शेतकऱ्यांना देखील होत आहे. केंद्रसरकारच्या कृषी उडान योजनेमुळे इथली फळं-भाज्या देशातल्या आणि परदेशातल्या बाजारात सहज पोहोचत आहेत.
मित्रहो,
आज ज्या प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी झाली आहे, त्यामुळे मेघालयची कनेक्टिविटी आणखी मजबूत होणार आहे. गेल्या 8 वर्षांमध्ये मेघालय मधल्या राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामासाठी 5 हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले. मेघालयमध्ये प्रधानमंत्री सडक योजने अंतर्गत गेल्या 8 वर्षात बांधण्यात आलेल्या ग्रामीण भागातल्या रस्त्यांची संख्या त्यापूर्वीच्या 20 वर्षांच्या तुलनेत सातपट अधिक आहे.
बंधुनो आणि भगिनींनो,
ईशान्य भारतातल्या युवा शक्तीसाठी डिजिटल कनेक्टिविटीमुळे नवीन संधी निर्माण केल्या जात आहेत.
डिजिटल कनेक्टीव्हिटीमुळे केवळ संवाद, संपर्क इतकाच लाभ मिळतो असे नव्हे तर यामुळे पर्यटनापासून ते तंत्रज्ञानापर्यंत,शिक्षणापासून ते आरोग्यापर्यंत प्रत्येक क्षेत्रात सुविधा आणि संधी या दोन्हीमध्ये वाढ होते.त्याच बरोबर जगामध्ये झपाट्याने उदयाला येणाऱ्या डिजिटल अर्थव्यवस्थेचे सामर्थ्यही यामुळे वृद्धींगत होते. 2014 च्या तुलनेत ईशान्येकडील राज्यांमध्ये ऑप्टीकल फायबरच्या व्याप्तीमध्ये सुमारे चौपट वाढ झाली आहे. मेघालयमध्ये ही वाढ पाचपट आहे. ईशान्येच्या कानाकोपऱ्यापर्यंत मोबाईल कनेक्टीव्हिटी पोहोचावी यासाठी 6 हजार मोबाईल टॉवर उभारण्यात येत आहेत. यासाठी 5 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करण्यात येत आहे. मेघालयमध्ये अनेक 4 जी टॉवर्सचे लोकार्पण या प्रयत्नांना अधिक वेग देईल. या पायाभूत सुविधा इथल्या युवकांना नव्या संधी उपलब्ध करून देतील.मेघालयमध्ये आयआयएमचे लोकार्पण आणि टेक्नोलॉजी पार्कची पायाभरणी शिक्षण आणि रोजगाराच्या संधीमध्ये निश्चितच वाढ करेल. ईशान्येकडच्या आदिवासी क्षेत्रांमध्ये दीडशेहून अधिक एकलव्य आदर्श शाळा उभारण्यात येत आहेत त्यापैकी 39 शाळा मेघालयमध्ये आहेत. दुसरीकडे आयआयएम सारख्या व्यावसायिक शिक्षण संस्थांमुळे युवकांना व्यावसायिक शिक्षणाचाही लाभ इथे मिळणार आहे.
बंधू-भगिनीनो,
ईशान्येकडील राज्यांच्या विकासासाठी भाजपाचे, एनडीएचे सरकार सातत्याने काम करत आहे.या वर्षातच 3 नव्या योजना सुरु करण्यात आल्या ज्या फक्त ईशान्येसाठी आहेत किंवा या भागाला त्याचा सर्वाधिक लाभ होणार आहे.पर्वतमाला योजनेअंतर्गत रोपवेचे जाळे निर्माण करण्यात येत आहे. यामुळे ईशान्येकडील प्रसिद्ध पर्यटन स्थळी सुविधा वाढतील आणि पर्यटनाचाही विकास होईल.पीएम डीव्हाईन योजना तर ईशान्येकडच्या विकासाला नवी गती देईल. या योजनेमुळे ईशान्येकडील भागासाठी मोठे विकास प्रकल्प अधिक सुलभतेने मंजूर होऊ शकतील. महिला आणि युवावर्गासाठी उपजीविकेची साधने इथे विकसित होतील.येत्या 3-4 वर्षासाठी पीएम डिव्हाईन योजनेअंतर्गत 6 हजार कोटी रुपये निर्धारित करण्यात आले आहेत.
बंधू- भगिनीनो,
दीर्घ काळ ज्या पक्षांची सरकारे राहिली त्यांचा ईशान्येसाठीचा दृष्टीकोन हा डिव्हाइड म्हणजे भेदभाव कारक होता आणि आम्ही डिव्हाईन म्हणजेच उदात्त उद्देश घेऊन आलो आहोत. वेगवेगळे समुदाय असोत किंवा वेगवेगळी क्षेत्रे, प्रत्येक प्रकारचा भेद-भाव आम्ही दूर करत आहोत. ईशान्येकडील भागात आम्ही विवादांचे नव्हे तर विकासाचे कॉरीडॉर निर्माण करत आहोत,त्यावर भर देत आहोत. गेल्या आठ वर्षात अनेक संघटनांनी हिंसेच्या मार्गाचा त्याग करत शाश्वत शांततेच्या मार्गाची कास धरली आहे. ईशान्येमध्ये ॲफ्स्पाची गरजच भासू नये यासाठी राज्य सरकारांसमवेत सातत्याने समन्वय साधत परिस्थितीत सुधारणा करण्यात येत आहे.इतकेच नव्हे तर राज्यांमध्ये सीमेबाबत दशकांपासून जे वाद सुरु होते तेही सोडवण्यात येत आहेत.
मित्रहो,
आमच्यासाठी ईशान्य, आपला सीमाभाग म्हणजे अखेरचे टोक नव्हे तर सुरक्षा आणि समृद्धीचे प्रवेशद्वार आहे.देशाची सुरक्षाही इथूनच सुनिश्चित होते आणि दुसऱ्या देशांशी व्यापार- उदीमही इथूनच होतो. म्हणूनच आणखी एक महत्वाची योजना आहे जिचा लाभ ईशान्येकडील राज्यांना होणार आहे. ही योजना आहे व्हायब्रंट बॉर्डर व्हिलेज. या योजनेअंतर्गत सीमावर्ती गावांमध्ये उत्तम सुविधा विकसित केल्या जातील. सीमावर्ती भागात विकास झाला,कनेक्टीव्हिटी वाढली तर शत्रूला त्याचा फायदा होईल असा विचार देशात फार काळापासून करण्यात येत होता. मी तर कल्पनाही करू शकत नाही की असा विचार केला जाऊ शकतो का ? आधीच्या सरकारच्या या दृष्टिकोनामुळे ईशान्येसहित देशाच्या सर्व सीमावर्ती भागात उत्तम कनेक्टीव्हिटी निर्माण होऊ शकली नाही. मात्र आज सीमा भागात धडाडीने नवे रस्ते,नवे बोगदे,नवे पूल, नवे रेल्वे मार्ग, विमानांसाठी नव्या धावपट्ट्या, जे जे आवश्यक आहे ते उभारण्याचे काम वेगाने सुरु आहे. एकेकाळी उजाड असणारी सीमाभागातली घरे आता पुन्हा गजबजावी यासाठी सरकार कार्यरत आहे. शहरांसाठी जो वेग आवश्यक आहे तोच वेग आम्पल्या सीमाभागातही आवश्यक आहे. यामुळे इथे पर्यटनालाही चालना मिळेल आणि जे लोक गाव सोडून गेले आहेत ते लोकही परतू लागतील.
मित्रहो,
गेल्या वर्षी मला व्हॅटीकन सिटीला भेट देण्याची संधी मिळाली, तिथे परमपूज्य पोप यांची मी भेट घेतली.त्यांना मी भारत भेटीचे निमंत्रणही दिले आहे. या भेटीचा माझ्यावर खोलवर प्रभाव पडला. आज संपूर्ण मानव जगताला भेडसावणाऱ्या समस्यांवर आम्ही चर्चा केली. एकतेची भावना आणि सुसंवाद यामुळे सर्वांचे कल्याण साधले जाईल यासाठी एकजुटीने प्रयत्न करण्यावर सहमती झाली. हाच भाव आपल्याला दृढ करायचा आहे.
मित्रहो,
शांतता आणि विकास यावर भर देणाऱ्या राजकारणाचा सर्वात जास्त फायदा आपल्या आदिवासी समाजाला झाला आहे. आदिवासी समाजाची परंपरा,भाषा, वेष, संस्कृती जपत आदिवासी क्षेत्रांचा विकास करण्याला सरकारचे प्राधान्य आहे. म्हणूनच बांबू कापण्यावरची बंदी आम्ही हटवली.यामुळे बांबूशी निगडीत आदिवासी उत्पादनांच्या निर्मितीसाठी बळ मिळेल. जंगलातून प्राप्त होणाऱ्या उत्पादनांच्या मूल्य वर्धनासाठी ईशान्येमध्ये साडेआठशे वनधन केंद्र स्थापन करण्यात आली आहेत. याच्याशी अनेक बचत गट जोडले गेले आहेत ज्यामध्ये आपल्या माता-भगिनी काम करत आहेत. इतकेच नव्हे तर घर, पाणी,वीज, गॅस यासारख्या सामाजिक पायाभूत सुविधांचा लाभही ईशान्य भागाला सर्वात जास्त झाला आहे. मागील वर्षांमध्ये मेघालयमध्ये 2 लाख घरांपर्यंत प्रथमच वीज पोहोचली आहे. गरिबांसाठी सुमारे 70 हजार घरांना मंजुरी देण्यात आली आहे. सुमारे तीन लाख कुटुंबाना प्रथमच नळाद्वारे पाणीपुरवठा सुविधा मिळाली आहे. अशा सुविधांचे सर्वात मोठे लाभार्थी आपले आदिवासी बंधू- भगिनी आहेत.
मित्रहो,
ईशान्येमध्ये विकासाचा हा ओघ असाच सुरु राहावा यासाठी आपले आशीर्वाद म्हणजे आमच्यासाठी उर्जा आहे. काही दिवसातच नाताळ हा सण येत आहे.आज ईशान्येकडील राज्यात आलो आहे तेव्हा या भूमीवरून सर्व देशवासियांना, ईशान्येमधल्या माझ्या बंधू- भगिनींना नाताळच्या येणाऱ्या सणाच्या खूप-खूप शुभेच्छा देतो.आपणा सर्वांचे खूप-खूप अभिनंदन. खुबलेई शिबोन ! (खासी आणि जयंतिया मध्ये धन्यवाद ) मितेला ! ( गारो भाषेमध्ये धन्यवाद )
S.Kane/Rajashree/Nilima/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1884774)
Visitor Counter : 209
Read this release in:
Kannada
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam