वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
भारताच्या माल निर्यातीत एप्रिल ते ऑक्टोबर 2021-22 या काळाच्या तुलनेत एप्रिल ते ऑक्टोबर, 2022-23 या काळात 12.6% इतकी सकारात्मक वाढ
भारताच्या सेवा निर्यातीत एप्रिल ते ऑक्टोबर 2021-22 या काळाच्या तुलनेत एप्रिल ते ऑक्टोबर, 2022-23 या काळात 31.43%ची सकारात्मक वाढ
भारतीय रुपयाच्या आंतरराष्ट्रीयीकरणाला गती मिळावी या उद्देशाने रुपयाच्या व्यापाराला चालना देण्याकरता केंद्रसरकारने केल्या अनेक सक्रिय धोरणात्मक सुधारणा
भारत-संयुक्त अरब अमिरात व्यापक आर्थिक भागीदारी कराराच्या (CEPA) प्रत्यक्ष अंमलबजावणीला 1 मे 2022 पासून सुरवात. या करारामुळे आगामी 5 वर्षांत दोन्ही देशांमधला व्यापार सध्याच्या 60 अब्ज अमेरिकी डॉलर्सवरून 100 अब्ज अमेरिकी डॉलर्सपर्यंत वाढणार
भारत-सौदी अरेबिया धोरणात्मक भागीदारी परिषदेच्या (SPC) अंतर्गत पहिल्यांदाच झालेल्या अर्थव्यवस्था आणि गुंतवणूक समितीच्या मंत्रीस्तरीय बैठकीत केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांचा सहभाग
भारत आणि गल्फ सहकार्य परिषदेने (GCC) भारत-गल्फ सहकार्य परिषदेरम्यानच्या मुक्त व्यापार करारावरील वाटाघाटींवरील चर्चा पुढे नेण्याची केली घोषणा
5 व्या भारत-कॅनडा व्यापार आणि गुंतवणूकविषयक मंत्रीस्तरीय संवादात समांतरपणे भारत- कॅनडा व्यापक आर्थिक भागीदारी करारावरील वाटाघाट
Posted On:
16 DEC 2022 11:54PM by PIB Mumbai
निर्यातविषयक कामगिरी
भारताच्या माल निर्यातीच्या बाबतीत एप्रिल ते ऑक्टोबर 2021-22 या काळाच्या तुलनेत एप्रिल ते ऑक्टोबर, 2022-23 या काळात 12.6% इतकी सकारात्मक वाढ नोंदवली गेली आहे. एप्रिल ते ऑक्टोबर, 2022-23 या काळात भारताची माल निर्यात 263.3 अब्ज अमेरिकी डॉलर्स इतकी होती, तर एप्रिल ते ऑक्टोबर 2021-22 या काळात ही माल निर्यात 234.0 अब्ज अमेरिकी डॉलर्स इतकी होती.
भारताच्या सेवा निर्यातीच्या बाबतीतही एप्रिल ते ऑक्टोबर 2021-22 या काळाच्या तुलनेत एप्रिल ते ऑक्टोबर, 2022-23 या काळात 31.43%ची सकारात्मक वाढ नोंदवली गेली आहे. एप्रिल ते ऑक्टोबर, 2022-23 या काळात भारताची सेवा निर्यात 181.39 अब्ज अमेरिकी डॉलर्स इतकी होती, तर एप्रिल ते ऑक्टोबर, 2021-22 या काळात ती 138.01 अब्ज अमेरिकी डॉलर्स इतकी होती.
एकूणात भारताच्या माल आणि सेवेच्या एकूण एकत्रित निर्यातीचा विचार केला तर त्यात एप्रिल ते ऑक्टोबर 2021-22 या काळाच्या तुलनेत एप्रिल ते ऑक्टोबर, 2022-23 या काळात 19.56% इतकी सकारात्मक वाढ नोंदवली गेली आहे. एप्रिल ते ऑक्टोबर 2021-22 या काळाच्या तुलनेत एप्रिल ते ऑक्टोबर, 2022-23 या कालावधीत भारताची माल आणि सेवेची एकूण एकत्रित निर्यात वाढून 444.74 अब्ज अमेरिकी डॉलर्सवर पोहोचली. एप्रिल ते ऑक्टोबर, 2021-22 या काळात ही निर्यात 371.98 अब्ज अमेरिकी डॉलर्स इतकी होती.
भारत-संयुक्त अरब अमिरात व्यापक आर्थिक भागीदारी करार (CEPA)
भारताचे वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल आणि युएईचे अर्थमंत्री, एच. ई. अब्दुल्ला बिन तौक अल मारी यांनी 18 फेब्रुवारी 2022 रोजी भारत-संयुक्त अरब अमिरात व्यापक आर्थिक भागीदारी करारावर (CEPA) स्वाक्षऱ्या केल्या. दोन्ही देशांमधल्या आभासी पद्धतीने झालेल्या शिखर परिषदेत, या करारावर स्वाक्षऱ्या होत असताना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अबू धाबीचे युवराज एचएच शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान आभासी माध्यमातून उपस्थितीत होते.
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांच्या नेतृत्वाखाली भारताच्या शिष्टमंडळाने 18 ते 19 सप्टेंबर 2022 सौदी अरेबियात रियाधला भेट दिली. भारत-सौदी अरेबिया धोरणात्मक भागीदारी परिषदेच्या (SPC) अंतर्गत पहिल्यांदाच होत असलेल्या अर्थव्यवस्था आणि गुंतवणूक समितीच्या मंत्रीस्तरीय बैठकीत ही शिष्टमंडळ सहभागी झाले होते. या मंत्रिगटाच्या बैठकीत, स्थापन घटनात्मक संयुक्त कार्यकारी गटांनी परस्पर द्विपक्षीय सहकार्याची 40 पक्षा जास्त क्षेत्र निश्चित करून त्याविषयी चर्चा केली. दोन्ही देशांमधील व्यापार आणि गुंतवणूकविषयीचे संबंध अधिक दृढ करण्यासाठी प्राधान्याने हाती घ्यायचे प्रकल्प आणि त्यांच्या अंमलबजावणीची प्रक्रिया यावरही या बैठकीत चर्चा करण्यात आली.
जागतिक व्यापार संघटनेची (WTO) बारावी मंत्रिस्तरीय परिषद (“MC-12”) परिषद 12 ते 17 जून 2022 दरम्यान स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा इथे आयोजित करण्यात आली होती. या परिषदेत घोषणापत्रे, निर्णय आणि करारांच्या स्वरूपात काही बाबींवर शिक्कामोर्तब करण्यात आले. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांच्या नेतृत्वाखालील भारताचे शिष्टमंडळ या परिषदेत सहभागी झाले होते. एमसी-12 या परिषदेत मागच्या सात वर्षांनंतर पहिल्यांदाच विविध क्षेत्राच्या बाबतीत काही निर्णायक गोष्टी ठरवल्या गेल्या. कृषी, मत्स्यपालन, महामारीच्या परिस्थितीवर जागतिक व्यापार संघटनेने केलेल्या कृती, व्यापाराशी निगडीत बौद्धिक संपदाच्या हक्कांशी (Trade-Related Aspects of Intellectual Property Rights - TRIPS) संबंधीत सवलत, ई-कॉमर्सवरची स्थगिती आणि जागतिक व्यापार संघटनेने केलेल्या सुधारणा अशा या परिषदेच्या विषयपत्रिकेचा भाग असलेल्या सर्व क्षेत्रांतील वाटाघाटींमध्ये भारताने विधायक सहभाग घेतला. या परिषदेत जे महत्वाचे निर्णय झाले, त्यात मत्स्योद्योगासाठी अनुदान, महामारीच्या परिस्थितीवर जागतिक व्यापार संघटनेकडून अपेक्षीत कृती, अन्नसुरक्षा, ई-कॉमर्स यांबाबतच्या निर्णयांचा समावेश होता. या निर्णयांमुळे जागतिक व्यापार संघटनेची बहुआयामी व्यापार प्रणाली अधिक मजबूत झाली. सदस्य देश परस्पर लाभदायक परिणामांचा पाठपुरावा करत एकत्र आले आहेत.
***
JPS/SRT/T.Pawar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1884587)
Visitor Counter : 199