पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय
कॅनडामध्ये मॉन्ट्रियल येथे संयुक्त राष्ट्रांच्या जैवविविधता परिषदेच्या आढावा बैठकीत भूपेंद्र यादव यांचे मार्गदर्शन
जागतिक जैवविविधतेच्या आराखड्यात निर्धारित करण्यात आलेली लक्ष्ये आणि उद्दिष्टे महत्त्वाकांक्षी, वास्तववादी आणि व्यवहार्य असली पाहिजेत- भूपेंद्र यादव
Posted On:
18 DEC 2022 10:01AM by PIB Mumbai
केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी कॅनडामध्ये मॉन्ट्रियल येथे कॉप-15 मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या जैवविविधता परिषदेच्या आढावा बैठकीच्या पूर्ण सत्रामध्ये आपले विचार व्यक्त केले. या पूर्ण सत्रामध्ये बोलताना यादव म्हणाले,
अध्यक्ष महोदय, मान्यवर, सन्माननीय महिला आणि पुरुष,
सर्व पक्षांनी दिलेल्या अतिशय मोलाच्या योगदानाबद्दल त्यांच्या योगदानाचे महत्त्व मी विचारात घेतो आणि 2020 पश्चात जागतिक जैवविविधता आराखड्याची अंमलबजावणी करण्याबाबत या परिषदेमध्ये सहमती होईल, अशी मला आशा आहे.
परिसंस्थेच्या अवमूल्यनाच्या प्रक्रियेची दिशा बदलून तिला पूर्वस्थितीत आणणे आणि जागतिक जैवविविधतेचा ऱ्हास थांबवणे या दोन गोष्टी सामाजिक-आर्थिक विकासासाठी, मानव कल्याणासाठी आणि जागतिक शाश्वततेच्या दिशेने पुढे जाण्यासाठी अत्यावश्यक आहेत. जागतिक जैवविविधतेच्या आराखड्यात निर्धारित करण्यात आलेली लक्ष्ये आणि उद्दिष्टे महत्त्वाकांक्षी असण्याबरोबरच ती वास्तववादी आणि व्यवहार्य असली पाहिजेत. हवामान बदलाच्या प्रक्रियेचा जैवविविधतेवर विपरित परिणाम होत असल्याने जैवविविधतेचे संवर्धन देखील सामाईक परंतु वर्गीकृत जबाबदाऱ्यांवर आणि संबंधित क्षमतांवर आधारित असले पाहिजे.
महोदय,
विकसनशील देशांसाठी शेती हे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणारे प्रमुख आर्थिक साधन आहे आणि या क्षेत्राला पाठबळ देण्यासाठी करण्यात आलेल्या अतिशय महत्त्वाच्या योजनांमध्ये बदल करता येणार नाहीत. विकसनशील देशांसाठी अन्नसुरक्षा हा सर्वोच्च प्राथमिकतेचा विषय असल्याने कीटकनाशकांच्या वापरामध्ये कपातीची संख्यात्मक उद्दिष्टे अनावश्यक आहेत आणि याबाबतचा निर्णय संबंधित देशांकडे त्यांची राष्ट्रीय स्थिती, प्राथमिकता आणि क्षमता यांच्या आधारावर सोपवला पाहिजे. जैवविविधतेच्या संवर्धनासाठी परिसंस्थेचे संवर्धन आणि पुनरुज्जीवन अतिशय विचारपूर्वक आणि एकात्मिक पद्धतीने झाले पाहिजे. जैवविविधतेच्या संवर्धनासाठी निसर्ग आधारित उपायांपेक्षा अशा प्रकारचा परिसंस्था दृष्टीकोन स्वीकारला पाहिजे. या
महोदय,
या आराखड्यांची यशस्वी अंमलबजावणी तितक्याच महत्त्वाकांक्षी असलेल्या संसाधन एकत्रीकरणाच्या यंत्रणेच्या उभारणीचे मार्ग आणि पद्धतींवर सर्वस्वी अवलंबून असेल. म्हणूनच विकसनशील देशांच्या पक्षांना आर्थिक संसाधने उपलब्ध करून देण्यासाठी एका नव्या आणि समर्पित यंत्रणेची उभारणी करण्याची गरज आहे. आपल्या सर्वांना कॉप-15 मधील महत्त्वाकांक्षी आणि वास्तविक जागतिक जैवविविधता आराखडा प्रत्यक्षात आणणे शक्य व्हावे यासाठी भारत सर्व पक्षांसोबत अतिशय मनापासून काम करण्यासाठी संपूर्णपणे वचनबद्ध आहे.
खूप खूप आभार.
***
H.Raut/S.Patil/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1884533)
Visitor Counter : 252