युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
साई (SAI) च्या पतियाळा केंद्राला केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी दिली भेट, 300 खाटांच्या नवीन वसतीगृहाचे केले उद्घाटन
या प्रतिष्ठित केंद्रात प्रशिक्षण घेणाऱ्या क्रीडापटूंना अधिक चांगली निवासाची सोय उपलब्ध होईल असा अनुराग ठाकूर यांना विश्वास
Posted On:
17 DEC 2022 2:53PM by PIB Mumbai
ठळक मुद्दे:
- नवीन 300 खाटांच्या वसतिगृहाच्या बांधकामाचा खर्च 26.77 कोटी रुपये
- भारताचे दिग्गज हॉकीपटू मेजर ध्यानचंद आणि धावपटू पीटी उषा यांना समर्पित वसतिगृहांचे मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन, याच्या नूतनीकरण आणि सुधारणेसाठी एकूण खर्च 5.25 कोटी रुपये.
केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री, अनुराग सिंह ठाकूर यांनी शनिवारी साई, अर्थात भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या (SAI) नेताजी सुभाष राष्ट्रीय क्रीडा संस्थेला (एनएसएनआयएस) भेट दिली आणि 300 खाटांच्या नवीन वसतिगृहाचे उद्घाटन केले. या वसतिगृहाच्या बांधकामासाठी एकूण 26.77 कोटी रुपये खर्च झाला.

मंत्र्यांनी भारताचे दिग्गज हॉकीपटू मेजर ध्यानचंद आणि धावपटू पीटी उषा यांना समर्पित वसतिगृहांचे उद्घाटनही केले, याचे नूतनीकरण आणि सुधारणेसाठी एकूण 5.25 कोटी रुपये खर्च करण्यात आले.
उद्घाटनप्रसंगी बोलताना ठाकूर म्हणाले, "खेळाडूंना सर्वोत्तम सुविधा देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. खेळाडूंना धोरणांच्या केंद्रस्थानी ठेवण्याचे महत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहमीच अधोरेखित केले आहे. या 300 खाटांच्या नवीन वसतीगृहाचे उद्घाटन आणि जुन्या वसतीगृहाचे नूतनीकरण हे या दिशेने आणखी एक पाऊल असून यामुळे या प्रतिष्ठित केंद्रात प्रशिक्षण घेणाऱ्या खेळाडूंना अधिक चांगली निवासाची सोय उपलब्ध होईल.”

एनएसएनआयएस पटियाला मध्ये शैक्षणिक अभ्यासक्रमात प्रथमच समाविष्ट करण्यात आलेल्या स्पोर्ट्स परफॉर्मन्स अॅनालिसिस (क्रीडा कामगिरी विश्लेषण ) अभ्यासक्रमाचे ठाकूर यांनी उद्घाटनही केले. या अभ्यासक्रमाच्या पहिल्या तुकडीमधील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ठाकूर म्हणाले, “खेळाडूच्या वास्तविक क्षमतेचे मूल्यांकन करण्यासाठी, क्रीडा विज्ञान आणि क्रीडा कामगिरी विश्लेषण याचा समावेश करणे अत्यंत महत्वाचे आहे, जे आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधील भारताची एकूण कामगिरी उंचावण्यासाठी उपयोगी ठरू शकेल.”

आपल्या भेटीत ठाकूर यांनी 400 पेक्षा जास्त क्रीडापटू आणि प्रशिक्षणार्थी यांच्याशी संवाद साधला आणि त्यांना खेळावर लक्ष केंद्रित करून देशाचा गौरव वाढवण्यासाठी प्रोत्साहन दिले. केंद्रात उपलब्ध असलेल्या सुविधा आणि सध्याच्या व्यवस्थेत हव्या असलेल्या सुधारणा याबद्दल खेळाडूंनी सूचना द्याव्यात असेही त्यांनी सुचवले.
साई पटियालाने गेल्या काही वर्षांमध्ये अनेक नामांकित खेळाडू घडवले असून, या खेळाडूंनी जागतिक अजिंक्यपद आणि ऑलिम्पिक पदकांसह देशासाठी अभिमानस्पद कामगिरी केली आहे.

2021 मध्ये, साई पटियालाच्या खेळाडूंनी राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांच्या सहा क्रीडा प्रकारांमध्ये एकूण 72 पदके जिंकली. 2022 मध्ये ही संख्या 195 पदकांवर गेली.
आंतरराष्ट्रीय स्तरावर, साई पटियालाच्या खेळाडूंनी राष्ट्रकुल अजिंक्यपद, युरोपियन खुली स्पर्धा आणि जागतिक कनिष्ठ गट अजिंक्यपद स्पर्धा यासारख्या क्रीडा स्पर्धांमध्ये 19 पदकांची कमाई केली आहे.
***
N.Chitale/R.Agashe/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1884412)
Visitor Counter : 225