पंतप्रधान कार्यालय

गोव्यात मोपा इथे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण

Posted On: 11 DEC 2022 8:19PM by PIB Mumbai

समेस्त गोंयकार भाव-भयणींक, माये मौगाचो नमस्कार!

गोंयांत येवन, म्हाकां सदांच खोस भौग्ता!

मंचावर उपस्थित गोव्याचे राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्लई जी, इथले लोकप्रिय मुख्यमंत्री श्री प्रमोद सावंत जी, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक जी, ज्योतिरादित्य सिंदिया जी, इतर सर्व मान्यवर, स्त्री-पुरुषहो

गोव्याच्या जनतेचे आणि देशातील जनतेचे नव्याने उभारण्यात आलेल्या या दिमाखदार विमानतळासाठी खूप खूप अभिनंदन. गेल्या 8 वर्षात जेव्हा जेव्हा तुमच्यामध्ये येण्याची संधी मिळाली आहे त्यावेळी मी एका गोष्टीचा पुनरुच्चार केला होता. तुम्ही जे प्रेम, जे आशीर्वाद आम्हाला दिले त्याची मी व्याजासकट परतफेड करेन, विकास करून परतफेड करेन. हे आधुनिक एयरपोर्ट टर्मिनल त्याच प्रेमाची परतफेड करण्याचा एक प्रयत्न आहे. या विमानतळाला माझे प्रिय सहकारी आणि गोव्याचे लाडके, दिवंगत मनोहर पर्रिकर जी यांचे नाव देण्यात आले आहे, या गोष्टीचा मला अतिशय आनंद होत आहे. आता मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नावाच्या माध्यमातून पर्रिकरजींचे नाव या ठिकाणी ये-जा करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या स्मरणात राहील.

मित्रहो,

आपल्या देशात पायाभूत सुविधांच्या संदर्भात अनेक दशके जो दृष्टीकोन राहिला, त्यामध्ये सरकारांकडून लोकांच्या गरजांपेक्षा मतपेढीला जास्त प्राधान्य देण्यात आले. याच कारणामुळे नेहमीच अशा योजनांवर हजारो कोटी रुपये खर्च करण्यात आले ज्यांची तितक्या प्रमाणात गरजच नव्हती आणि याच कारणामुळे नेहमीच ज्या ठिकाणी लोकांना पायाभूत सुविधांची गरज होती तिकडे दुर्लक्ष केले जात होते. गोव्याचा हा आंतरराष्ट्रीय विमानतळ याचेच उदाहरण आहे. गोवावासियांचीच नव्हे तर देशभरातील लोकांची ही खूपच जुनी मागणी होती की येथे एका विमानतळामुळे काम भागत नाही, गोव्याला दुसरा विमानतळ हवा आहे. ज्यावेळी अटल बिहारी वाजपेयी जी यांचे सरकार केंद्रात होते त्यावेळी या विमानतळाची योजना तयार झाली होती. पण अटलजींचे सरकार गेल्यानंतर या विमानतळासाठी फार काही करण्यात आले नाही. बराच काळ हा प्रकल्प प्रलंबित राहिला. 2014 मध्ये गोव्याने विकासाच्या डबल इंजिनला आपला कौल  दिला. आम्ही पुन्हा एकदा सर्व प्रक्रिया वेगाने पूर्ण केल्या आणि 6 वर्षांपूर्वी मी येथे येऊन त्याची कोनशिला बसवली. मधल्या काळात न्यायालयीन प्रक्रियांपासून महामारीपर्यंत अनेक अडचणी निर्माण झाल्या. पण या सर्व अडचणी येऊन देखील आज हा दिमाखदार विमानतळ तयार झाला आहे. आता या ठिकाणी एका वर्षात सुमारे 40 लाख प्रवाशांची वर्दळ हाताळण्याची सुविधा आहे. आगामी काळात ही क्षमता साडेतीन कोटींपर्यंत जाऊ शकते. या विमानतळामुळे निश्चितच पर्यटनाला खूप मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे. 2 विमानतळ झाल्यामुळे कार्गो हबच्या रुपात देखील गोव्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात संधी निर्माण होण्याच्या शक्यतांमध्ये वाढ झाली आहे. यामुळे फळे- भाज्यांपासून औषधी उत्पादनांपर्यंत निर्यातीला खूप मोठ्या प्रमाणात बळ मिळणार आहे.  

मित्रहो,

मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ आज देशाच्या पायाभूत सुविधांविषयी बदललेल्या सरकारी विचारसरणीचा आणि दृष्टीकोनाचा दाखला देखील आहे. 2014 पूर्वीच्या सरकारांची जी भूमिका होती, त्यामुळे हवाई प्रवास, म्हणजे एक चैनीची गोष्ट बनला होता. जास्त करून श्रीमंत-संपन्न वर्गातील लोकच याचा लाभ घेऊ शकत होते. पूर्वीच्या सरकारांनी कधी हा विचारच केला नाही की सर्वसामान्य लोकांना, मध्यम वर्गाला देखील तशाच प्रकारे हवाई प्रवास करायचा आहे. त्यामुळेच त्यावेळची सरकारे वाहतूक वेगवान करण्याच्या माध्यमांवर गुंतवणूक करण्यापासून लांब राहत होती, विमानतळांच्या विकासासाठी तितक्या प्रमाणात पैसेच खर्च करण्यात आले नाहीत. याचा परिणाम असा झाला की देशामध्ये हवाई प्रवासाशी संबंधित इतक्या मोठ्या प्रमाणावर क्षमता असून देखील आपण त्यामध्ये मागे राहिलो, आपण त्याची चाचपणी करू शकलो नाही. आता देश विकासाच्या आधुनिक विचारांनी काम करत असल्याने त्याचे परिणाम देखील आपल्याला दिसत आहेत.

मित्रहो,

स्वातंत्र्यापासून 2014 पर्यंत देशात लहान-मोठे केवळ 70 विमानतळ होते, सत्तर. जास्त करून केवळ मोठ्या शहरांमध्येच हवाई प्रवासाची सोय होती. मात्र, आम्ही हवाई प्रवास देशाच्या लहान लहान शहरांपर्यंत पोहोचवण्याचा निश्चय केला. यासाठी आम्ही दोन स्तरांवर काम केले. सर्वप्रथम आम्ही देशभरात विमानतळांच्या जाळ्याचा विस्तार केला. दुसरी बाब म्हणजे उडान योजनेच्या माध्यमातून सामान्य लोकांना देखील विमान प्रवास करण्याची संधी मिळाली.  या प्रयत्नांचा अभूतपूर्व परिणाम पाहायला मिळाला आहे. गेल्या 8 वर्षात देशात, आताच सिंदिया जींनी बरेच सविस्तर सांगितले गेल्या 8 वर्षात देशात सुमारे 72 नवे विमानतळ तयार करण्यात आले आहेत. जरा विचार करा स्वातंत्र्यानंतर 70 वर्षात 70च्या जवळपास विमानतळ आणि सध्याच्या काळात 7-8 वर्षात आणखी 70 नवे विमानतळ. म्हणजेच आता भारतात विमानतळांची संख्या दुप्पट झाली आहे. 2000 साली देशात वर्षभरात 6 कोटी लोक हवाई प्रवासाचा लाभ घेत होते. 2020 मध्ये कोरोना काळाच्या आधी ही संख्या 14 कोटींपेक्षा जास्त झाली होती. यामध्ये सुद्धा एक कोटींपेक्षा जास्त सहकाऱ्यांनी उडान योजनेचा लाभ घेत हवाई प्रवास केला होता.

मित्रांनो ,

या सर्व  प्रयत्नांमुळे आज भारत जगातील तिसरी सर्वात मोठी विमानवाहतूक  बाजारपेठ बनला आहे. उडान योजनेने ज्याप्रमाणे देशातील मध्यम वर्गाची स्वप्ने पूर्ण केली आहेत, तो खरोखरच एखाद्या विद्यापीठासाठी, शैक्षणिक जगतासाठी अभ्यासाचा विषय आहे.  या गोष्टीला खूप काळ लोटलेला नाही, जेव्हा मध्यम  वर्गीय  लांबच्या प्रवासासाठी रेल्वेचेच तिकीट आधी बघायचे. आता कमी अंतरासाठी देखील आधी विमानाचा मार्ग, त्याचे तिकीट बघितले जाते आणि पहिला प्रयत्न हाच असतो की विमानानेच प्रवास करायचा. जसजसा देशात हवाई कनेक्टिविटीचा विस्तार होत आहे, विमान प्रवास सर्वांना परवडणारा होत आहे. 

बंधू आणि भगिनींनो,

आपण बऱ्याचदा ऐकतो की पर्यटन कुठल्याही देशाची सुप्त शक्ती वाढवते आणि हे खरे देखील आहे. मात्र हे देखील तितकंच खरे आहे की एखाद्या देशाची ताकद वाढते , तेव्हा जगाला त्याबाबत अधिक  जाणून घेण्याची इच्छा असते.  जर त्या देशात काही पाहण्यासारखे असेल ,  जाणून-समजून घेण्यासारखे असेल, तर जग नक्कीच त्याकडे अधिक आकर्षित होतो.  तुम्ही भूतकाळात डोकावले तर तुम्हाला समजेल, जेव्हा भारत  समृद्ध होता, तेव्हा जगात भारताविषयी एक आकर्षण होते. जगभरातील प्रवासी इथे येत होते, व्यापारी-उद्योजक यायचे , विद्यार्थी यायचे.  मात्र मध्येच गुलामगिरीचा एक मोठा कालखंड आला. भारतातील निसर्ग, संस्कृती , सभ्यता  तीच होती,मात्र भारताची प्रतिमा बदलली , भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला . जे लोक भारतात येण्यास आतुर होते , त्यांच्या पुढल्या पिढीला हे देखील समजले नाही की भारत कुठे आहे.

मित्रांनो,

आता  21 व्या शतकातील भारत, नवा भारत आहे. आज जेव्हा भारत जागतिक पटलावर आपली नवी प्रतिमा तयार करत आहे  , तेव्हा जगाचा दृष्टिकोन देखील वेगाने बदलत आहे. आज जगाला  भारत समजून घेण्याची इच्छा आहे. आज तुम्ही डिजिटल मंचावर जा, किती मोठ्या संख्येने परदेशी लोक भारताची गाथा जगाला सांगत आहेत. या सर्व गोष्टी लक्षात घेतल्या तर  आता  देशात प्रवास सुलभता सुनिश्चित  करण्याची गरज आहे. याच विचारासह गेल्या आठ वर्षात भारताने प्रवास सुलभता वाढवण्यासाठी  आपल्या पर्यटन प्रोफाइलचा  विस्तार करण्याचे शक्य ते सर्व प्रयत्न केले. तुम्ही पाहाल की आम्ही व्हिसाची प्रक्रिया सुलभ केली, व्हिसा ऑन -अरायव्हल  सुविधेचा विस्तार केला. आम्ही आधुनिक पायाभूत विकास आणि दुर्गम, दूरवरच्या भागातल्या कनेक्टिविटी वर लक्ष केंद्रित केले. एअर  कनेक्टिविटी बरोबरच  डिजिटल कनेक्टिविटी, मोबाइल कनेक्टिविटी, रेल्वे  कनेक्टिविटी, आदी सर्व बाबींकडे  आम्ही लक्ष देत आहोत. आज बहुतांश पर्यटन स्थळे रेल्वेने जोडली जात आहेत.  तेजस आणि  वंदे भारत एक्सप्रेस सारख्या आधुनिक गाड्या रेल्वेचा भाग बनत आहेत.  विस्टाडोम कोच असंलेल्या गाड्या पर्यटकांचा अनुभव अधिक समृद्ध करत आहेत. या सर्व प्रयत्नांचा परिणाम आपण  निरंतर अनुभवत आहोत. वर्ष  2015  मध्ये देशातील स्थानिक पर्यटकांची संख्या 14 कोटी होती. गेल्या वर्षी ती वाढून सुमारे 70 कोटींवर पोहचली.  आता कोरोनानंतर जगभरात पर्यटन खूप वेगाने वाढत आहे. गोवा सारख्या पर्यटन ठिकाणी सर्वप्रथम लसीकरण करण्याच्या निर्णयाचा लाभ देखील गोव्याला मिळत आहे  आणि म्हणूनच मी प्रमोद जी आणि त्यांच्या चमूचे अभिनंदन करतो.

आणि मित्रांनो,

आपण सर्वजण जाणतो की पर्यटनामध्ये रोजगार आणि स्वयंरोजगाराची सर्वाधिक  क्षमता आहे .  पर्यटनाद्वारे प्रत्येकजण कमावतो , तो सर्वांना संधी देतो आणि गोव्यात राहणाऱ्यांना समजावण्याची गरज नाही.  म्हणूनच डबल इंजिनचे  सरकार पर्यटनावर इतका भर देत आहे , कनेक्टिविटीचे प्रत्येक माध्यम मजबूत करत आहे.  इथे गोव्यात देखील  2014 नंतर महामार्गांशी संबंधित प्रकल्पांवर 10 हजार  कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक झाली आहे. गोव्यातील वाहतूक कोंडीच्या समस्येकडेही  लक्ष दिले जात आहे आणि सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. कोकण रेल्वेच्या विद्युतीकरणाचाही गोव्याला खूप  लाभ  झाला आहे,

मित्रांनो ,

कनेक्टिव्हिटी वाढवण्याबरोबरच,  आपला वारसा असलेल्या स्मारकांची देखभाल, कनेक्टिव्हिटी आणि संबंधित सुविधा सुधारून वारसा  पर्यटनाला चालना देण्यावरही सरकारचा भर आहे . गोव्यातील  ऐतिहासिक अगोडा कारागृह संकुलातील  संग्रहालयाचा विकास हे देखील याचेच उदाहरण आहे. देशभरातील आपली वारसा स्थळे अधिक आकर्षक बनवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे . तसेच  देशातील तीर्थक्षेत्रे आणि वारसा स्थळांना  भेट देण्यासाठी विशेष रेल्वेगाड्या देखील चालवल्या जात आहेत.

मित्रांनो ,

खरे तर मला आज गोवा सरकारची आणखी एका गोष्टीसाठी प्रशंसा करायची आहे.  गोवा सरकार, भौतिक पायाभूत सुविधांइतकेच सामाजिक पायाभूत सुविधांवरही तेवढाच भर देत आहे. गोव्यात जगणे सुखकर बनवण्याला प्रोत्साहन  आणि सरकारी योजनांच्या लाभापासून एकही  नागरिक वंचित राहू नये या दिशेने स्वयंपूर्ण  गोवा अभियान खूपच यशस्वी ठरले आहे. खूप चांगले काम केले आहे.  गोवा आज 100 टक्के सॅचुरेशनचे  एक  उत्तम उदाहरण बनले आहे.  तुम्ही सर्वजण अशीच विकास कामे करत रहा, लोकांचे जीवन सुखकर बनवत रहा, याच इच्छेसह या भव्य विमानतळासाठी तुम्हा सर्वांचे अभिनंदन करून मी माझे भाषण संपवतो. 

खूप-खूप शुभेच्छा. खूप-खूप  धन्यवाद !

***

NilimaC/SushmaK/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1883000) Visitor Counter : 160