पंतप्रधान कार्यालय
गोव्यातील 9व्या जागतिक आयुर्वेद परिषदेच्या समारोप सत्रात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Posted On:
11 DEC 2022 11:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 डिसेंबर 2022
गोव्याचे राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्लई जी, लोकप्रिय युवा मुख्यमंत्री वैद्य प्रमोद सावंत जी, केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल जी, श्रीपाद नाईक जी, डॉ महेंद्रभाई मुंजपारा जी, शेखर जी, इतर मान्यवर, जागतिक आयुर्वेद परिषदेमध्ये देश विदेशातून आलेले आयुष क्षेत्रातील सर्व विद्वान आणि तज्ज्ञ , इतर सर्व मान्यवर, महोदय आणि महोदया !
गोव्याच्या सुंदर भूमीवर जागतिक आयुर्वेद परिषदेसाठी देश-विदेशातून जमलेल्या तुम्हा सर्व मित्रांचे मी स्वागत करतो.जागतिक आयुर्वेद परिषदेच्या यशासाठी मी तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. हा कार्यक्रम अशा वेळी होत आहे, जेव्हा भारताचा स्वातंत्र्याच्या अमृतकाळाचा प्रवास सुरू आहे.आपल्या ज्ञान-विज्ञान आणि सांस्कृतिक अनुभवातून जगाच्या कल्याणाचा संकल्प हे अमृतकाळाचे मोठे ध्येय आहे. आणि यासाठी आयुर्वेद हे एक सशक्त आणि प्रभावी माध्यम आहे. भारत यावर्षी जी -20 गटाचे अध्यक्षपद आणि यजमानपद भूषवत आहे. आम्ही जी -20 शिखर परिषदेची संकल्पना देखील ठेवली आहे – “एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य”! जागतिक आयुर्वेद परिषदेच्या या कार्यक्रमात तुम्ही सर्वजण अशा विषयांवर चर्चा कराल आणि संपूर्ण जगाच्या आरोग्यासाठी विचारविनिमय कराल. मला आनंद आहे की ,जगातील 30 हून अधिक देशांनी आयुर्वेदाला पारंपरिक औषध पद्धती म्हणून मान्यता दिली आहे.आपण सर्वांनी आयुर्वेदाला अधिकाधिक देशांपर्यंत पोहोचवले पाहिजे , आयुर्वेदाला मान्यता मिळवून द्यायची आहे.
मित्रांनो,
आज मला इथे आयुषशी संबंधित तीन संस्थांचे लोकार्पण करण्याची संधी मिळाली आहे. मला विश्वास आहे, अखिल भारतीय आयुर्वेद संस्था -गोवा, राष्ट्रीय युनानी औषध संस्था -गाझियाबाद आणि राष्ट्रीय होमिओपॅथी संस्था-दिल्ली, या तीनही संस्था आयुष आरोग्य सेवा प्रणालीला एक नवी गती देतील.
मित्रांनो,
आयुर्वेद हे असे शास्त्र आहे, ज्याचे तत्वज्ञान, ज्याचे ब्रीदवाक्य आहे- ‘सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयः’ म्हणजे, सर्वांचे सुख, सर्वांचे आरोग्य.आजार झाला की मग त्यावर उपचार करणे ही असहाय्यता नाही तर जीवन निरामय असायला हवे, जीवन रोगांपासून मुक्त असायला हवे. सर्वसाधारणपणे धारणा अशी आहे की, जर कोणता प्रत्यक्ष आजार नसेल तर आपण निरोगी आहोत. पण, आयुर्वेदाच्या दृष्टीने निरोगी असण्याची व्याख्या अधिक व्यापक आहे. तुम्हा सर्वांना माहीत आहे आयुर्वेद सांगतो - सम दोष समाग्निश्च, सम धातु मल क्रियाः। प्रसन्न आत्मेन्द्रिय मनाः, स्वस्थ इति अभिधीयते॥ म्हणजेच ज्याचे शरीर संतुलित आहे, सर्व क्रिया संतुलित आहेत आणि मन प्रसन्न आहे, तो निरोगी आहे. म्हणूनच आयुर्वेद उपचारांच्या पलीकडे जाऊन निरामयतेवर भर देतो , निरामयतेला प्रोत्साहन देतो. जग देखील आता अनेक बदलांमधून आणि प्रचलित पद्धतींनुसार बाहेर पडत आहे आणि जीवनाच्या या प्राचीन तत्त्वज्ञानाकडे परत येत आहे.
आणि मला खूप आनंद होत आहे की, या संदर्भात भारतात खूप आधीपासूनच काम सुरू झाले आहे. जेव्हा मी गुजरातचा मुख्यमंत्री म्हणून काम करत होतो, तेव्हापासूनच आम्ही आयुर्वेदाच्या प्रचारासाठी अनेक प्रयत्न सुरू केले.आम्ही आयुर्वेदाशी संबंधित संस्थांना प्रोत्साहन दिले, गुजरात आयुर्वेद विद्यापीठाचे आधुनिकीकरण करण्याचे काम केले. त्याचा परिणाम असा आहे की आज जागतिक आरोग्य संघटनेने जामनगरमध्ये पारंपरिक औषधांसाठीचे जगातील पहिले आणि एकमेव जागतिक केंद्र सुरु केले आहे. देशातही आम्ही सरकारमध्ये स्वतंत्र आयुष मंत्रालय स्थापन केले, त्यामुळे आयुर्वेदाबद्दल उत्साह आणि विश्वास वाढला. एम्सच्या धर्तीवर आज अखिल भारतीय आयुर्वेद संस्थाही सुरू होत आहे. याच वर्षी जागतिक आयुष नवोन्मेष आणि गुंतवणूक परिषदेचेही यशस्वी आयोजन करण्यात आले .ज्यामध्ये जागतिक आरोग्य संघटनेने देखील भारताच्या प्रयत्नांची प्रशंसा केली आहे. संपूर्ण जग आता आरोग्य आणि निरामयतेचा जागतिक सण म्हणून आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करत आहे. म्हणजेच योग आणि आयुर्वेद, जे पूर्वी दुर्लक्षित मानले जात होते, ते आज संपूर्ण मानवतेसाठी एक नवीन आशा बनले आहे.
मित्रांनो,
आयुर्वेदाशी संबंधित आणखी एक पैलू आहे, ज्याचा उल्लेख मला जागतिक आयुर्वेद परिषदेमध्ये नक्कीच करावासा वाटतो.येत्या शतकात आयुर्वेदाच्या उज्ज्वल भविष्यासाठी हे तितकेच आवश्यक आहे.
मित्रांनो,
आयुर्वेदाबाबत जागतिक सहमती, सहजता आणि स्वीकृती यासाठी इतका वेळ लागला कारण आधुनिक विज्ञानाधारित पुराव्याला प्रमाण मानले जाते. आपल्याकडे आयुर्वेदाचा परिणामही होता तसेच फलितही होते पण पुराव्याच्या बाबतीत आपण मागे पडत होतो. आणि म्हणूनच, आज आपल्यासाठी 'माहिती आधारित पुराव्याचे ' दस्तऐवजीकरण करणे अत्यावश्यक आहे. यासाठी आपल्याला दीर्घकाळ निरंतर काम करावे लागेल. आपली जी वैद्यकीय माहिती आहे संशोधने आहेत , नियतकालिके आहेत , आपल्याला त्या सर्वांना एकत्र आणून आधुनिक वैज्ञानिक मापदंडांवर प्रत्येक दाव्याची पडताळणी करून दाखवावी लागेल . भारतात गेल्या काही वर्षांत या दिशेने मोठ्या प्रमाणावर काम झाले आहे. आम्ही पुराव्यावर आधारित संशोधन डेटासाठी आयुष संशोधन पोर्टल देखील तयार केले आहे. यावर आतापर्यंत सुमारे 40 हजार संशोधन अभ्यासांची माहिती उपलब्ध आहे. कोरोनाच्या काळातही, आमच्याकडे आयुषशी संबंधित सुमारे 150 विशिष्ट संशोधन अभ्यास झाले आहेत. तो अनुभव पुढे घेऊन आम्ही आता 'राष्ट्रीय आयुष संशोधन संघ' स्थापन करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहोत. इथे भारतात, एम्स मधील एकात्मिक औषध केंद्र यांसारख्या संस्थांमध्ये योग आणि आयुर्वेदाशी संबंधित अनेक महत्त्वाचे संशोधन देखील केले जात आहे.येथून पुढे आलेले आयुर्वेद आणि योगाशी संबंधित शोधनिबंध प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये प्रकाशित होत आहेत याचा मला आनंद आहे. अलीकडे, अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डिओलॉजी आणि न्यूरोलॉजी जर्नल सारख्या सन्मानित नियतकालिकांमध्ये अनेक संशोधने प्रकाशित झाली आहेत. मला वाटते की, जागतिक आयुर्वेद परिषदेमधील सर्व सहभागींनी आयुर्वेदाला जागतिक प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी भारतासोबत सहकार्य करावे आणि योगदान द्यावे .
बंधू आणि भगिनींनो,
आयुर्वेदाचे असेच आणखी एक वैशिष्ट्य आहे, ज्याची चर्चा क्वचितच होते. काही लोकांना असे वाटते की आयुर्वेद केवळ उपचारांसाठी आहे, परंतु त्याचे हे देखील वैशिष्ट्य आहे की आयुर्वेद आपल्याला जीवन जगण्याची पद्धती शिकवतो. जर मला आधुनिक परिभाषेचा उपयोग करून सांगायचे झाल्यास मी तुम्हाला एक उदाहरण देतो. तुम्ही जगातील सर्वोत्तम कंपनीकडून सर्वोत्तम मोटार खरेदी करता. त्या मोटारीसोबत तिची माहिती पुस्तिकाही येते. त्यात कोणते इंधन टाकायचे, तिची सर्व्हिसिंग केव्हा आणि कशी करायची, तिची देखभाल कशी करायची हे लक्षात ठेवावे लागते.जर डिझेल इंजिनच्या गाडीत पेट्रोल टाकले तर गडबड निश्चित आहे .त्याचप्रमाणे जर तुम्ही कॉम्प्युटर चालवत असाल तर त्याचे सर्व हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर व्यवस्थित चालले पाहिजे.
आपण आपल्या यंत्रांची तर काळजी घेतो, मात्र आपल्या शरीराकडे लक्ष देत नाही, कशाप्रकारचा आहार, कोणता आहार, कोणता दिनक्रम, काय करू नये याकडे आपण लक्षही देत नाही. आयुर्वेद आपल्याला शिकवतो की हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर प्रमाणेच शरीर आणि मनही एकत्रच निरोगी असले पाहिजेत, त्यांच्यात समन्वय असला पाहिजे . उदाहरणार्थ, आज वैद्यक शास्त्रासाठी व्यवस्थित झोप हा एक मोठा विषय आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, महर्षी चरक सारख्या आचार्यांनी शतकांपूर्वी यावर तपशीलवार लिहिले आहे.हे आयुर्वेदाचे वैशिष्ट्य आहे.
मित्रांनो,
आपल्या इथे म्हटले आहे- 'स्वास्थ्यम् परमार्थ साधनम्'. म्हणजेच आरोग्य हे अर्थ आणि प्रगतीचे साधन आहे. हा मंत्र आपल्या वैयक्तिक जीवनासाठी जितका सार्थ आहे तितकाच अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातूनही समर्पक आहे. आज आयुषच्या क्षेत्रात अमर्याद नवीन संधींचा जन्म होत आहे. आयुर्वेदिक औषधी वनस्पतींची लागवड असो, आयुष औषधांची निर्मिती आणि पुरवठा असो, डिजिटल सेवा असो, यासाठी आयुष स्टार्टअप्सना खूप वाव आहे.
बंधू आणि भगिनींनो,
आयुष उद्योगाची सर्वात मोठी ताकद ही आहे की, प्रत्येकासाठी विविध प्रकारच्या संधी उपलब्ध आहेत. उदाहरणार्थ, आज भारतातील आयुष क्षेत्रात सुमारे 40 हजार एमएसएमई, लघुउद्योग अनेक वैविध्यपूर्ण उत्पादने पुरवत आहेत, विविध उपक्रम राबवले जात आहेत. यातून स्थानिक अर्थव्यवस्थेला खूप मोठी ताकद मिळत आहे. आठ वर्षांपूर्वी देशातील आयुष उद्योग क्षेत्र केवळ 20,000 कोटी रुपयांचा होता. आज आयुष उद्योग क्षेत्रातील उलाढाल सुमारे 1.5 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचत आहे. म्हणजे, 7-8 वर्षांत जवळजवळ 7 पट वाढ. तुम्ही कल्पना करू शकता, आयुष स्वतःच एक मोठे उद्योगक्षेत्र , एक मोठी अर्थव्यवस्था म्हणून उदयास येत आहे. आगामी काळात जागतिक बाजारपेठेत त्याचा आणखी विस्तार होणार आहे.तुम्हालाही माहित आहे की जागतिक वनौषधी आणि मसाल्यांची बाजारपेठ सुमारे 120 अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे 10 लाख कोटी रुपयांची आहे. पारंपरिक औषधांचे हे क्षेत्र सतत विस्तारत आहे आणि आपण त्याच्या प्रत्येक संधीचा पुरेपूर फायदा घेतला पाहिजे. ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी, आपल्या शेतकऱ्यांसाठी शेतीचे एक संपूर्ण नवीन क्षेत्र खुले होत आहे, ज्यामध्ये त्यांना खूप चांगला भाव मिळू शकतो. यामध्ये तरुणांसाठी हजारो-लाखो नवीन रोजगार निर्माण होतील.
मित्रांनो,
आयुर्वेदाच्या वाढत्या लोकप्रियतेचा आणखी एक मोठा पैलू आयुर्वेद आणि योग पर्यटन देखील आहे. पर्यटनाचे केंद्र असलेल्या गोव्यासारख्या राज्यात आयुर्वेद आणि निसर्गोपचाराला चालना देऊन पर्यटन क्षेत्राला नव्या उंचीवर नेता येईल. अखिल भारतीय आयुर्वेद संस्था -गोवा ही या दिशेने महत्त्वाची सुरुवात ठरू शकते.
मित्रांनो,
आज भारताने जगासमोर ‘एक पृथ्वी, एक आरोग्य’ हा भविष्यकालीन दृष्टिकोनही ठेवला आहे. 'एक पृथ्वी, एक आरोग्य' म्हणजे आरोग्यासाठी सार्वत्रिक दृष्टिकोन. पाण्यात राहणारे जीवजंतू असोत, वन्य प्राणी असोत, माणूस असो की वनस्पती असोत, त्यांचे आरोग्य परस्परांशी जोडलेले असते. त्यांच्याकडे अलिप्तपणे पाहण्याऐवजी आपण त्यांना संपूर्णतेच्या दृष्टिकोनातून पाहायला हवे . आयुर्वेदाचा हा समग्र दृष्टीकोन भारताच्या परंपरा आणि जीवनशैलीचा एक भाग आहे. गोव्यात होणाऱ्या या जागतिक आयुर्वेद परिषदेमध्ये अशा सर्व पैलूंवर सविस्तर चर्चा व्हावी असे मला वाटते. आपण सर्वजण मिळून आयुर्वेद आणि आयुष यांना समग्रपणे कसे पुढे नेऊ शकतो याचा मार्गदर्शक आराखडा तयार केला पाहिजे. मला विश्वास आहे की तुमचे प्रयत्न या दिशेने नक्कीच परिणामकारक ठरतील. या विश्वासाने तुम्हा सर्वांना खूप खूप धन्यवाद आणि आयुष आणि आयुर्वेदाला खूप खूप शुभेच्छा.
* * *
S.Patil/S.Chavan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1882701)
Visitor Counter : 223
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam