संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

निवृत्त-अग्निवीरांसाठी कॉर्पोरेट रोजगारांमध्ये आरक्षण देण्यासंदर्भात संरक्षण मंत्रालयाची भारतीय संरक्षण उद्योगाशी चर्चा

Posted On: 01 DEC 2022 9:15AM by PIB Mumbai

निवृत्त अग्निवीरांना भारतीय संरक्षण उत्पादक कंपन्यांमध्ये या कंपन्यांच्या कॉर्पोरेट रिक्रूटमेंट प्लॅन अंतर्गत चांगले रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने भारतीय संरक्षण उत्पादक सोसायटीच्या छत्राखालील भारतीय संरक्षण उद्योगासोबत 30 नोव्हेंबर 2022 रोजी एका चर्चासत्राचे आयोजन केले.संरक्षण सचिव गिरीधर अरमाने यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सत्रामध्ये भारतीय संरक्षण उद्योगातील लार्सन ऍन्ड टूब्रो, अदानी डिफेन्स लि., टाटा ऍडव्हान्स्ड सिस्टिम लि., अशोक लेलँड आणि इतर प्रमुख कंपन्यांचे वरिष्ठ कार्यकारी अधिकारी सहभागी झाले होते.  

संरक्षण दलांमध्ये सेवा केल्यानंतर अतिशय समर्पित वृत्ती असलेल्या आणि शिस्तबद्ध अग्निवीरांना राष्ट्रउभारणीच्या कार्यात सक्रिय असलेल्या विविध क्षेत्रांमध्ये रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने त्यांच्या प्रावीण्याचा उत्तम प्रकारे वापर करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याची बाब संरक्षण सचिवांनी अधोरेखित केली. संरक्षण  दलांमध्ये कार्यरत असताना अग्निवीरांनी प्राप्त केलेल्या कौशल्यांमुळे अतिशय उच्च कौशल्यप्राप्त स्पर्धात्मक आणि व्यावसायिक मनुष्यबळ आपोआप उपलब्ध होईल आणि त्यांचा या उद्योगांमध्ये फलदायी आणि उत्पादक कामांसाठी वापर करता येईल.

या चर्चासत्रामध्ये उपस्थित असलेल्या कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या उपक्रमाला बिनशर्त पाठिंबा दर्शवला आणि त्यासाठीची वचनबद्धता व्यक्त केली. त्याचबरोबर पहिल्या तुकडीचा संरक्षण दलांमधला कार्यकाळ पूर्ण झाल्याबरोबर त्यातील निवृत्त अग्निवीरांना आपल्या कंपन्यांमध्ये नियुक्त करण्यासाठी उत्सुकता व्यक्त केली. उपलब्ध असलेल्या कौशल्य संचांच्या आधारे अग्निवीरांच्या आरक्षणासाठी आपल्या नियुक्ती धोरणात योग्य त्या तरतुदी करण्याचे आश्वासन या अधिकाऱ्यांनी दिले.

अग्निवीरांनी प्राप्त केलेल्या कौशल्याचीं जोडणी उद्योगांच्या गरजांशी करण्यासंदर्भात करण्यात आलेल्या काही सूचनांचा देखील या सत्रात विचार करण्यात आला.

या सत्रामध्ये सहभागी झालेल्या प्रतिनिधींनी दिलेल्या उत्साही प्रतिसादाची संरक्षण सचिवांनी प्रशंसा केली. भारतीय संरक्षण उद्योगाने आपल्या वचनबद्धतेचे पालन करावे आणि लवकरात लवकर कॉर्पोरेट नियुक्ती योजना जाहीर करावी, असे आवाहन संरक्षण सचिवांनी केले.

*** 

Sonali K/Shailesh P /CYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1880217) Visitor Counter : 206