अणुऊर्जा विभाग
स्वच्छ ऊर्जा संक्रमणाची आपली वचनबद्धता पूर्ण करण्यासाठी भारताची ३०० मेगावॅट क्षमतेच्या अणुभट्ट्या (स्मॉल मॉड्युलर रिअॅक्टर्स -SMR) विकसित करण्याच्या दिशेनं वाटचाल-केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह
भारतात हे महत्त्वपूर्ण तंत्रज्ञान विकसित करण्याचे, जितेंद्र सिंह यांचे खाजगी क्षेत्र आणि स्टार्ट-अप्सना आवाहन
Posted On:
27 NOV 2022 4:33PM by PIB Mumbai
स्वच्छ ऊर्जा संक्रमणाची आपली वचनबद्धता पूर्ण करण्यासाठी भारताची ३०० मेगावॅट क्षमतेचे स्मॉल मॉड्युलर रिअॅक्टर्स (SMR) म्हणजेच छोटे छोटे अनेक भाग एकत्रित सांधून तयार केलेल्या अणुभट्ट्या विकसित करण्याच्या दिशेनं वाटचाल सुरु आहे, असं केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार); पृथ्वी विज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार); तसच पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रारी, निवृत्ती वेतन, अणुऊर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी सांगितलं आहे. निती आयोग आणि अणुऊर्जा विभागातर्फे स्मॉल मॉड्युलर रिअॅक्टर्स वर आयोजित कार्यशाळेला ते आज संबोधित करत होते.
डॉ जितेंद्र सिंह म्हणाले की हे महत्त्वपूर्ण तंत्रज्ञान भारतात विकसित करण्यासाठी, खाजगी क्षेत्र आणि स्टार्ट-अप्सचा सहभाग आवश्यक आहे. एसएमआर तंत्रज्ञानाच्या खात्रीपूर्वक व्यावसायिक उपलब्धतेसाठी तंत्रज्ञानाची देवाणघेवाण आणि निधीची उपलब्धता हे दोन महत्त्वाचे दुवे आहेत यावर त्यांनी आपल्या भाषणात भर दिला.
डॉ जितेंद्र सिंह म्हणाले, हवामान बदलाच्या संकटाचा सामना करण्यासाठी भारताचे धाडसी प्रयत्न आणि वचनबद्धतेच्या माध्यमातून, नवीन स्वच्छ ऊर्जा संक्रमणाकरता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबवलेल्या नियोजनाशी, हे नव्या स्वच्छ ऊर्जेच्या पर्यायांसाठीचं संशोधन सुसंगत आहे आणि आपल्या अद्ययावत केलेल्या राष्ट्रीय निर्धारित योगदानांमध्ये (NDCs) ते दिसून येते.
डॉ जितेंद्र सिंह यांनी निदर्शनास आणून दिले की आपण आधीच जीवाश्म-आधारित ऊर्जा संसाधनांचा उपयोग करत स्वच्छ ऊर्जा संक्रमणासाठी पावलं उचलली आहेत आणि 2070 पर्यंत अणुऊर्जेबाबत निव्वळ-शून्य (नेट झिरो)कार्बन उत्सर्जनाचं उद्दिष्ट गाठून, कार्बन उत्सर्जन प्रतिबंधात्मक धोरणात मोठी भूमिका बजावू शकतो. या अनुषंगानेच, अणुऊर्जेची उपयुक्तता केवळ भारताच्याच नव्हे तर संपूर्ण जगातील स्वच्छ ऊर्जा संक्रमणासाठी महत्त्वपूर्ण ठरेल, असही मंत्री म्हणाले.
तीनशे मेगावॅट क्षमतेच्या स्मॉल मॉड्युलर अणुभट्ट्या (SMR), अगदी निसर्गतःच रचनात्मक दृष्ट्या लवचिक असतात आणि त्यांना उभारणीसाठी लहान सुटे भाग पुरेसे ठरतात. SMR तंत्रज्ञान, कमी वेळात सुलभ वहन करता येण्याजोगं तंत्रज्ञान असल्यानं, SMR प्रकारच्या अणुभट्ट्या, कारखान्यात निर्माण करुन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेता येऊ शकतात. त्यामुळे भौगोलिक अनुकूलतेच्या आधारावर एकाच ठिकाणी स्थायी स्वरूपात उभारलेल्या पारंपरिक अणुभट्ट्यांपेक्षा त्यांचं हे वेगळेपण ठळकपणे उठून दिसतं. अशा प्रकारे, या अणुभट्ट्या खर्च आणि उभारणीचा वेळ लक्षणीयरित्या वाचवतात. जिथे विश्वासार्ह आणि नियमित वीज पुरवठ्याची आवश्यकता असते, तिथे विशेषत्वाने एसएमआर हे औद्योगिक डी-कार्बोनायझेशनमधील (कार्बन उत्सर्जन प्रतिबंध) एक आश्वासक तंत्रज्ञान ठरते. अवाढव्य अणुप्रकल्पांच्या तुलनेत एस एम आर प्रकारच्या अणुभट्ट्या या सहज सुलभ आणि सुरक्षित आहेत असं सांगितलं जातं.
***
S.Patil/A.Save/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1879349)
Visitor Counter : 242