माहिती आणि प्रसारण मंत्रालय
53व्या इफ्फी मध्ये पहिल्या चित्रपट तंत्रज्ञान प्रदर्शनाचे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन
आघाडीच्या उत्पादकांनी समकालीन चित्रपट निर्मितीसाठीची अत्याधुनिक उपकरणे केली प्रदर्शित
गोवा/मुंबई, 21 नोव्हेंबर 2022
केंद्रीय माहिती आणि प्रसारण आणि युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी तंत्रज्ञान आणि चित्रपट कला/चित्रपट आणि सौंदर्यशास्त्र प्रदर्शनाचे इफ्फी 2022 मध्ये आज 21 नोव्हेंबर 2022 रोजी गोव्यात उद्घाटन केले. उद्घाटनानंतर ठाकूर यांनी इफ्फी मध्ये आयोजित या प्रकारच्या पहिल्याच प्रदर्शनात असलेल्या अत्याधुनिक उपकरण आणि तंत्रज्ञानाची पाहणी केली.
53व्या इफ्फी मध्ये आयोजित चित्रपट तंत्रज्ञान प्रदर्शनात, तंत्रज्ञान आणि चित्रपट कला/चित्रपट आणि सौंदर्यशास्त्राशी संबंधित विविध पैलू प्रदर्शित केले आहेत. या प्रदर्शनाला भेट देणाऱ्या चित्रपट रसिकांना तंत्रज्ञान आणि चित्रपट कला/चित्रपट आणि सौंदर्यशास्त्र यांच्यातील संबंधांवर माहिती देण्यात येत आहे. तसेच या सर्वांच्या एकत्रित परिणामांमुळे चित्रपट बघण्याचा अनुभव कसा समृध्द होतो याविषयी देखील माहिती देण्यात येते.
“या पहिल्याच चित्रपट तंत्रज्ञान प्रदर्शनात चित्रपट निर्मितीचे सर्वोत्तम तंत्रज्ञान महोत्सवाचा भाग बनले आहे. चित्रपट विद्यार्थी आणि व्यावसायिकांना आपले ज्ञान अद्ययावत करणे आणि बाजारपेठेतील अत्याधुनिक तंत्रज्ञानाबद्दल माहिती मिळविण्याची ही सुवर्ण संधी आहे,” असे एफटीआयआयचे संचालक संदीप शहारे यांनी सांगितले.
कंपाल फुटबॉल मैदान, कलाअकादमी जवळ, डी बी मार्ग, पणजी इथे हे प्रदर्शन भरले आहे, हे प्रदर्शन 21 ते 27 नोव्हेंबर, 2022 दरम्यान सकाळी 11 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सुरु राहील. सोनी, कॅनन, झेसीस, रेड, लिका ॲटलास, डीझेडओ, ॲपच्रर लाईट्स, हंसा सिने इक्विपमेंट आणि इतर आघाडीच्या चित्रपट उपकरण उत्पादकांनी या प्रदर्शनात भाग घेतला आहे. त्यांनी, समकालीन चित्रपट निर्मितीत वापरली जाणारी आपली अत्याधुनिक उपकरणे या प्रदर्शनात मांडली आहेत. या प्रदर्शनात कॅमेरा उत्पादक, लेन्स, दिवे, ग्रिप्स, कलर ग्रेडिंग सॉफ्टवेयर, ॲनिमेशन, व्हीएफएक्स, एआर, व्हीआर, ऑडीओ मॉनिटर्स, ध्वनिशास्त्र, रियाल टाईम डबिंग, टॉकबॅक, संरक्षण आणि जीर्णोद्धार यांच्याशी संबंधित तंत्रज्ञान आणि उपकरणे या प्रदर्शनात आहेत. या 7000 वर्ग मीटर मध्ये पसरलेल्या प्रदर्शनाशिवाय, चर्चा आणि विविध सत्रे आयोजित करण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
* * *
PIB Mumbai | G.Chippalkatti/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1877796)
Visitor Counter : 243