पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय

सीआयटीईएस कॉप-19: भारतातील हस्तकला निर्यातदारांना मोठा दिलासा

Posted On: 21 NOV 2022 7:08PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 21  नोव्हेंबर 2022

ठळक वैशिष्ट्ये:

  • डलबर्गीया शिसम आधारित उत्पादनांच्या निर्यातीचे नियम शिथिल, निर्यातीला मिळणार चालना.
  • भारताच्या प्रस्तावा बरहुकूम निर्यातीच्या नियमात शिथिलता.

लुप्तप्राय वन्यप्राणी आणि वनस्पतींच्या (सीआयटीईएस) प्रजातींवरील आंतरराष्ट्रीय व्यापार परिषदेच्या, सदस्यांच्या परिषदेची 19 वी बैठक 14 ते 25 नोव्हेंबर 2022 या कालावधीत पनामा या निसर्गरम्य शहरात आयोजित करण्यात आली आहे.

शिशमचा (डालबर्गिया शिसम) समावेश परिषदेच्या परिशिष्ट II मध्ये असल्याने, या प्रजातीच्या व्यापारासाठी सीआयटीईएस नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. सध्या 10 किलोपेक्षा जास्त वजनाच्या प्रत्येक मालाला सीआयटीईएस परवानगी आवश्यक आहे. या निर्बंधामुळे, डालबर्गिया शिसमपासून निर्मित भारतीय लाकडी वस्तू (फर्निचर) आणि हस्तकलेची नोंदणीपूर्व निर्यात, वर्षाला अंदाजे 1000 कोटी रुपयांवरुन (~129 दशलक्ष अमेरीकी डॉलर्स) नोंदणीपश्चात निर्यात वर्षाला 500-600 कोटी रुपयांपर्यंत (~64 ते 77 दशलक्ष अमेरीकी डॉलर्स) सतत घसरत आहे.    डालबर्गिया शिसम उत्पादनांच्या निर्यातीत घट झाल्यामुळे या प्रजातींवर आधारित काम करणाऱ्या सुमारे 50,000 कारागिरांच्या उपजिविकेवर परिणाम झाला आहे.

भारताच्या पुढाकाराने, शिशमच्या (डालबर्गिया शिसम) वस्तू जसे की फर्निचर आणि कलाकृतींचे प्रमाण स्पष्ट करण्याच्या प्रस्तावावर यंदाच्या बैठकीत विचार करण्यात आला. भारतीय प्रतिनिधींनी सातत्याने हा मुद्दा लावून धरल्यानंतर, या मालाच्या प्रत्येक एका वस्तूचे वजन 10 किलोग्रामपेक्षा कमी असल्यास, सीआयटीईएसच्या परवानगी शिवाय एका शिपमेंटमधे एकल मालाच्या रुपात कितीही संख्येने डालबर्गिया शिसम-लाकूड आधारित वस्तूंची निर्यात करता येईल यावर एकमत झाले. प्रत्येक वस्तूच्या निव्वळ वजनासाठी फक्त लाकडाचाच विचार केला जाईल. धातू सारख्या उत्पादनांमधे वापरल्या जाणाऱ्या कोणत्याही इतर वस्तू यासाठी ग्राह्य धरल्या जाणार नाहीत यावरही सहमती झाली. भारतीय कारागीर आणि फर्निचर उद्योगासाठी हा मोठा दिलासा आहे.

पार्श्वभूमी:

दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग इथे 2016 मध्ये झालेल्या, परिषदेतील सदस्यांच्या (कॉप)  17 व्या बैठकीत, परिषदेच्या परिशिष्ट II मध्ये डॅलबर्गियाच्या सर्व प्रजातींचा समावेश केला होता. यामुळे या प्रजातींच्या व्यापारासाठी सीआयटीईएस नियमांचे पालन करणे आवश्यक होते.

भारतात, डालबर्गिया शिसम (उत्तर भारतीय रोझवूड किंवा शिसम) ही प्रजाती मुबलक प्रमाणात आढळते आणि तिला लुप्तप्राय प्रजाती मानले जात नाही.  सदस्यांनी चर्चेदरम्यान मान्य केले की डलबर्गिया शिसम ही लुप्तप्राय प्रजाती नाही.  तथापि, डॅलबर्गियाच्या विविध प्रजातींचे वर्गीकरण करण्याच्या आव्हानांबाबत चिंता व्यक्त करण्यात आली.

सीमाशुल्काच्या दृष्टीने, डलबर्गियाच्या तयार लाकडाचे वर्गीकरण करण्यासाठी प्रगत तांत्रिक साधने विकसित करण्याची नितांत गरज उपस्थित देशांनी व्यक्त केली. या पैलूचा विचार करून आणि तयार लाकडाचे स्पष्ट वर्गीकरण करणाऱ्या तंत्राचा अभाव लक्षात घेता, कॉपने सीआयटीईएस परिशिष्ट:II मधून प्रजाती वगळण्यास  सहमती दर्शवली नाही. मात्र, प्रत्येक वस्तूच्या वजनाच्या संदर्भातील दिलासा भारतीय कारागीरांच्या समस्या बर्‍याच प्रमाणात सोडवेल आणि त्यांच्याद्वारे उत्पादित वस्तूंच्या निर्यातीला जबरदस्त चालना देईल.

 

S.Patil/V.Ghode/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 



(Release ID: 1877783) Visitor Counter : 179