ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

रास्त भाव दुकानांची आर्थिक व्यवहार्यता सुधारण्यासाठी राज्ये/ केंद्रशासित प्रदेश अतिरिक्त महसूल पर्यायांचा शोध घेणार : सचिव, अन्न आणि सार्वजनिक वितरण विभाग

Posted On: 19 NOV 2022 5:37PM by PIB Mumbai

 

रास्त भाव दुकानांची आर्थिक व्यवहार्यता सुधारण्यासाठी राज्ये/ केंद्रशासित प्रदेश अतिरिक्त महसूल पर्यायांचा शोध घेतील असे अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाचे सचिव संजीव चोप्रा यांनी शुक्रवारी अन्न सचिवांच्या परिषदेदरम्यान राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांशी संवाद साधताना सांगितले.

अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या परिषदेत पोषण-युक्त तांदूळ  , एक देश -एक शिधा पत्रिका, स्मार्ट सार्वजनिक वितरण प्रणाली, रूट ऑप्टिमायझेशन इत्यादींसह विभागाच्या विविध योजनांशी संबंधित महत्त्वाच्या मुद्द्यांवर राज्यांच्या आणि केंद्रशासित प्रदेशांच्या अन्न सचिवांशी तपशीलवार चर्चा करण्यात आली. चोप्रा यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात, अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाच्या  योजना आणि कार्यक्रमांच्या सर्वांगीण अंमलबजावणीसाठी राज्य सरकारांनी सर्वतोपरी सहकार्य करण्यावर भर दिला.

2023-24 पर्यंत सर्व सरकारी कार्यक्रमांमध्ये पोषण मुल्य-युक्त तांदूळाचे संपूर्ण वितरण करण्याचे केंद्र सरकारचे लक्ष्य आहे, असे चोप्रा यांनी सांगितले. हे लक्ष्य साध्य करण्यासाठी परिसंस्था पूर्णपणे सज्ज असून निर्धारित वेळेनुसार तांदूळ खरेदी, पुरवठा आणि वितरण सुनिश्चित करण्यासाठी राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांना त्यांची संबंधित यंत्रणा तयार ठेवण्याची विनंती करण्यात आली आहे.

एक देश -एक शिधा पत्रिका  योजनेअंतर्गत स्थलांतरितांना अन्नधान्य पुरवठा करण्यासाठी राज्यांनी घेतलेल्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले. या योजनेचा परिणाम म्हणून योजनेच्या सुरुवातीपासून 91 कोटींहून अधिक पोर्टेबिलिटी व्यवहारांची नोंद झाली आहे. नंदुरबार (महाराष्ट्र) येथील प्रतिनिधीने कुपोषण कमी करण्यासाठी जिल्हा डॅशबोर्ड तयार करणे आणि स्थलांतरितांचे प्रोफाइल तयार करणे यांसारख्या सूचना सामायिक केल्या. .

विश्व खाद्य कार्यक्रमाने विकसित केलेल्या अन्नपूर्ती ग्रेन एटीएमचा प्रारंभ आराखडा  या परिषदेत सादर करण्यात आला. हे एटीएम दोन धान्यांचे  वितरण करू शकते आणि 50 किलो अन्नधान्य वितरीत करण्यासाठी याला सुमारे 90 सेकंद लागतात.

***

S.Kane/S.Mukhedkar/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1877298)
Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu