शिक्षण मंत्रालय

वाराणसी येथे महिनाभर चालणाऱ्या ‘काशी तमिळ संगमम ’चे 19 नोव्हेंबरला पंतप्रधान करणार उद्घाटन


पंतप्रधानांच्या काशी दौऱ्याच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या  व्यवस्थेचा धर्मेंद्र प्रधान यांनी घेतला आढावा

Posted On: 18 NOV 2022 7:51PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 नोव्हेंबर रोजी उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे काशी तमिळ संगममया महिनाभर चालणाऱ्या कार्यक्रमाचे उद्घाटन करणार आहेत. तामिळनाडू आणि काशी - या शिक्षणाशी संबंधित देशातील  दोन सर्वात महत्त्वाच्या आणि प्राचीन शैक्षणिक  स्थळांमधले  जुने दुवे पुन्हा शोधण्याच्या ,ते अधोरेखित करण्याच्या  आणि त्याचा उत्सव साजरा करण्याच्या  उद्देशाने, वाराणसी (काशी) येथे 17  नोव्हेंबर ते 16 डिसेंबर 2022 या कालावधीत काशी तमिळ संगममचे आयोजन करण्यात आले आहे.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image001ERMW.jpg

पंतप्रधानांच्या काशी दौऱ्याच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी  केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री  धर्मेंद्र प्रधान  वाराणसीतील कार्यक्रमाच्या तयारीवर सक्रियपणे लक्ष ठेवून आहेत.यापूर्वी, त्यांनी काशी तमिळ संगममचे यशस्वी आयोजन सुनिश्चित करण्यासाठी भारत सरकारचे  रेल्वे मंत्रीतामिळनाडूचे राज्यपाल, उत्तर प्रदेश सरकारचे अधिकारी आणि इतर प्रमुख हितसंबंधितांच्या  बैठका घेतल्या.

काशी तमिळ संगममचे आयोजन भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने ,संस्कृती, वस्त्रोद्योग, रेल्वे, पर्यटन, अन्न प्रक्रिया, माहिती आणि प्रसारण इ.सारख्या अन्य मंत्रालयांच्या  आणि उत्तर प्रदेश  सरकारच्या सहकार्याने केले आहे. विद्वान, विद्यार्थी, तत्वज्ञ, व्यापारी, कारागीर, कलाकार आणि समाजाच्या इतर क्षेत्रातील लोकांना एकत्र येण्याची, त्यांचे ज्ञान, संस्कृती आणि सर्वोत्तम पद्धती सामायिक  करण्याची आणि एकमेकांच्या अनुभवातून शिकण्याची संधी उपलब्ध करून देणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.  राष्ट्रीय शिक्षण धोरण  2020 च्या अनुषंगाने भारतीय ज्ञान संपत्तीला आधुनिक ज्ञान प्रणालींसोबत एकत्रित करण्यावर भर देण्याचा हा प्रयत्न आहे. आयआयटी मद्रास आणि बनारस हिंदू विद्यापीठ या कार्यक्रमासाठी अंमलबजावणी करणाऱ्या दोन संस्था आहेत.

विद्यार्थी,शिक्षकांसह  साहित्य, संस्कृती, कारागीर, आध्यात्मिक, वारसा, व्यवसाय, उद्योजक, व्यावसायिक इत्यादी 12 श्रेणीतील तामिळनाडूतील 2500 हून अधिक प्रतिनिधी 8 दिवसांच्या  वाराणसी दौऱ्यावर येणार आहेत. समान व्यापार, व्यवसाय आणि स्वारस्य असलेल्या स्थानिक लोकांशी संवाद साधण्यासाठी ते प्रत्येक 12 श्रेणीसाठी तयार केलेल्या विशेष कार्यक्रमांमध्ये परिसंवाद , लेक डेम्स, विविध स्थळांना भेटी  इत्यादींमध्ये सहभागी होतील.प्रयागराज आणि अयोध्येसह वाराणसी आणि आसपासच्या प्रेक्षणीय स्थळांनाही प्रतिनिधी भेट देतील.बनारस हिंदू विद्यापीठ आणि इतर उच्च शैक्षणिक संस्थांमधील  विद्यार्थी या शैक्षणिक कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.ते दोन प्रदेशातील विविध क्षेत्रांशी संबंधित तुलनात्मक पद्धतींचा अभ्यास करतील आणि यातून मिळालेल्या  ज्ञानाचे दस्तऐवजीकरण करतील.200 विद्यार्थ्यांचा समावेश असलेल्या प्रतिनिधींच्या पहिल्या गटाने 17 नोव्हेंबर रोजी चेन्नई येथून त्यांचा दौरा सुरू केला, त्यांच्या रेल्वेगाडीला  तामिळनाडूचे राज्यपाल  आर एन रवी यांनी चेन्नई रेल्वे स्थानकावरून हिरवा झेंडा दाखवून रवाना केले.

यासह, स्थानिक लोकांच्या फायद्यासाठी हातमाग, हस्तकला,एक जिल्हा एक उत्पादन  (ओडीओपी) उत्पादने, पुस्तके, माहितीपट, पाककृती, कला प्रकार, इतिहास, पर्यटन स्थळे इत्यादींचे महिनाभराचे प्रदर्शन वाराणसीमध्ये भरवण्यात  येणार आहे.

या उद्घाटन कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान तमिळनाडूतून येणाऱ्या प्रतिनिधींशी संवाद साधतील.उद्घाटन समारंभ  इलैयाराजा यांचे गायन आणि पुस्तक प्रकाशन अशा विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचा साक्षीदार होईल.

***

S.Patil/S.Chavan/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1877145) Visitor Counter : 125