माहिती आणि प्रसारण मंत्रालय
iffi banner

भारतीय आंतरराष्‍ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) - ‘टँगो’ सोबत चित्रपटांच्या आनंदाच्या अनुभूतीसाठी सज्ज


इफ्फीच्या 53 व्या आवृत्तीत विविध श्रेणीतील स्पर्धेत अर्जेंटिनाचे सात चित्रपट

#IFFIWOOD, 15 नोव्हेंबर 2022

अर्जेंटिनाच्‍या लोकांच्या व्यक्तिमत्वाचे वर्णन करायचे असेल तर त्‍याला ‘टॅंगो’असे म्हणता येईल. टँगो म्हणजे नाट्यमय, उत्‍कटतेने प्रगट होणारे. चित्रपट निर्मितीमध्‍ये अतिशय चांगली, प्रभावी भूमी आणि चित्रपटविषयक परिणामकारी इतिहास असलेला देश म्‍हणून अर्जेंटिना ओळखला जातो. या देशामध्‍ये कला आणि करमणूक या गोष्‍टी मध्‍यवर्ती मानल्या जातात, त्‍यामुळेच इथला चित्रपट इतिहास मोठा आहे. 1896 मध्‍ये पॅरिसमध्‍ये ल्युमियरचे सिनेमॅटोग्राफ पहिल्‍यांदा आले, त्यानंतर अवघ्‍या एका वर्षामध्‍ये त्यांची आयात करणारा  अर्जेंटिना हा पहिला देश आहे. जगामध्‍ये पहिली निमेटेड फिल्म ‘एल पोस्‍टोल’ ’ ची निर्मितीही अर्जेंटिनामध्‍येच झाली होती. ल्‍युक्रेसिया  मार्ट्रेल , मार्टिन रेज्‍टमन आणि पॅब्‍लो ट्रॅपेरो  या दिग्गजांनी अर्जेंटिनामध्‍ये नवसिनेमाचे नेतृत्व केले. अशी समृद्ध परंपरा असलेल्या अर्जेंटिनामधून भारतीय आंतरराष्‍ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) च्या 53 व्या आवृत्तीमध्‍ये  आपल्या सर्वांसाठी वेगवेगळ्या श्रेणीतल्‍या स्पर्धेमध्‍ये सात चित्रपट दाखवले जाणार आहेत.

रॉड्रिगो ग्युरेरो दिग्दर्शित ‘सेव्हन डॉग्स’ हा चित्रपट आंतरराष्‍ट्रीय चित्रपटाच्या श्रेणीत ‘सुवर्ण मयूर’साठी स्‍पर्धेत आहे. केवळ 80 मिनिटांच्‍या या चित्रपटामध्‍ये माणूस आणि त्‍याच्याकडे असलेले  पाळीव प्राणी यांच्यातील संबंध दाखवण्‍यात आले आहेत.

महोत्सवामध्‍ये अँड्रिया ब्रागा दिग्दर्शित ‘सेल्फ डिफेन्स’ हा चित्रपट  दाखविण्‍यात येणार आहे.  ‘दिग्दर्शनामध्‍ये पदार्पणाचा सर्वोत्कृष्ट चित्रपट’ या श्रेणीमध्‍ये असणार   आहे. हा चित्रपट एका फिर्यादीच्या कथेविषयी आहे. भूतकाळात झालेल्‍या हत्याकांडांच्या  मालिकेच्या   प्रकरणाची उकल करण्‍यासाठी तो आपल्या  गावी परत येतो, असे याचे कथानक आहे.

या महोत्सवात प्रदर्शित होणारे अर्जेंटिनाचे  इतर चित्रपट पुढीलप्रमाणे आहेत.  मिस विबोर्ग (2022), द बॉर्डर्स ऑफ टाइम (2021), द सबस्टिट्यूट (2022), रोब ऑफ जेम्स (2022) आणि इआमी (2022) आहेत.

जर तुम्ही अर्जेंटिनाला आत्तापर्यंत फक्त त्याच्या फुटबॉल दिग्गजांसाठी ओळखत असाल, तर या नोव्हेंबर 2022 मध्ये गोव्यात बसून तिथल्या  चित्रपटसृष्टीचा अनुभव घेण्यासाठी सज्ज व्हा!

इफ्फीविषयी थोडेसे

वर्ष 1952 पासून सुरु झालेला इफ्फी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा आशियातील सर्वात मोठा चित्रपट महोत्सव आहे. चित्रपट निर्मिती, त्यांतील कथा आणि या निर्मितीमध्ये गुंतलेल्या व्यक्ती यांचा उत्सव साजरा करणे ही या महोत्सवाच्या आयोजनामागील संकल्पना आहे. या महोत्सवाद्वारे आपण समाजात मोठ्या प्रमाणात आणि सखोलपणे चित्रपटांविषयीचे सजग कौतुक आणि उत्कट प्रेम जोपासून, वाढवून त्याचा प्रसार करण्याचा, आपापसात प्रेम,समजूतदारपणा आणि बंधुत्व यांचे सेतू बांधण्याचा आणि त्यांना व्यक्तिगत तसेच सामूहिक उत्कृष्टतेची नवी उंची गाठण्यासाठी प्रेरित करण्याचा प्रयत्न करतो.

या महोत्सवाचे यजमान राज्य असलेल्या गोव्याच्या सरकारच्या एन्टरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा या संस्थेच्या सहकार्याने भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयातर्फे दर वर्षी या महोत्सवाचे आयोजन करण्यात येते.या वर्षी आयोजित होत असलेल्या 53 व्या इफ्फी महोत्सवाविषयीची सर्व अद्ययावत माहिती, उत्सवाच्या www.iffigoa.org या संकेतस्थळावर, पत्रसूचना कार्यालयाच्या pib.gov.in या संकेतस्थळावर तसेच इफ्फीचे ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम या समाज माध्यम मंचांवर तसेच गोव्याच्या पत्रसूचना कार्यालयाच्या समाज माध्यम स्थळांवर उपलब्ध आहे. लक्षात असू द्या, चित्रपटांच्या सोहोळ्याचा भरभरून आनंद घेऊया आणि एकेमकांना त्यात सहभागी करून घेऊया.

 

S.Patil/S.Bedekar/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

iffi reel

(Release ID: 1876510) Visitor Counter : 233