पंतप्रधान कार्यालय

महाराष्ट्र रोजगार मेळाव्यातील पंतप्रधानांचा व्हिडिओ संदेश

Posted On: 03 NOV 2022 1:24PM by PIB Mumbai

नमस्कार!

मी, सर्वात आधी, आपल्या सर्वांचे, मनापासून अभिनंदन करतो ! आपल्यापैकी काही लोकांना, आज नियुक्तीपत्र प्रदान होत आहेत, याचा मला खूप आनंद होत आहे. मी यासाठी, आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो!

देशातील तरुणांना सरकारी विभागांमध्ये सामूहिकरित्या नियुक्तीपत्र देण्याच्या अभियानात, आज महाराष्ट्राचे नावही जोडले जात आहे. केंद्र सरकारने धनत्रयोदशीच्या दिवशी दहा लाख नोकऱ्या देण्याच्या अभियानाची सुरुवात केली होती. मी तेव्हाच म्हटले होते की येणाऱ्या दिवसात, विविध राज्य सरकारे देखील याच प्रकारे रोजगार मेळावे घेतील. याच शृंखलेत आज महाराष्ट्रात शेकडो तरुणांना एकाच वेळी नियुक्तीपत्रे दिली जात आहेत. ज्या युवक युवतींना आज नियुक्तीपत्र प्राप्त होत आहेत त्यांना मी खूप शुभेच्छा देतो.

मी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांचेही अभिनंदन करतो. इतक्या कमी कालावधीत रोजगार मेळाव्याचे झालेले आयोजन पाहता, महाराष्ट्र सरकार तरुणांना रोजगार देण्याच्या दिशेने दृढ संकल्पासह वाटचाल करत आहे हे स्पष्ट होते. मला याचाही आनंद आहे की येणाऱ्या काळात महाराष्ट्रात याच प्रकारे रोजगार मेळाव्यांचा विस्तार केला जाईल. मला सांगण्यात आले की महाराष्ट्राच्या गृह विभागात हजारो पोलीस कॉन्स्टेबलची भरती होईल आणि ग्रामीण विकास विभागात देखील भरती अभियान चालवले जाईल.

मित्रांनो,

सध्या देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. देश विकसित भारताच्या ध्येयावर काम करत आहे. या ध्येयप्राप्तीत आपल्या तरुणांची खूप मोठी भूमिका आहे, आपली आहे. बदलत्या काळात ज्या प्रकारे वेगाने नोकऱ्यांचे स्वरूप बदलत आहे, त्याच वेगाने सरकार देखील विविध प्रकारच्या नोकऱ्यांकरिता सातत्याने संधी निर्माण करत आहे. स्वयंरोजगाराकरिता विनाहमी कर्ज देणाऱ्या मुद्रा योजनेअंतर्गत, सरकारने 20 लाख कोटी रुपयांतून अधिकची मदत तरुणांना केली आहे. याचा खूप मोठा लाभ महाराष्ट्रातील तरुणांनी घेतला आहे. सरकार स्टार्टअप्सना, लघुउद्योगांना,  एमएसएमईना सर्वतोपरी आर्थिक मदत करत आहे, जेणेकरून तरुणांना आपली प्रतिभा दाखवण्याची पूर्ण संधी मिळेल.

मित्रांनो,

सरकारच्या प्रयत्नांबाबतची सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या या संधी दलित-मागास, आदिवासी, सर्वसामान्य आणि महिला अशा सर्वांनाच समान रूपाने उपलब्ध केली जात आहे. सरकारद्वारे ग्रामीण भागात बचत गटांनाही खूप प्रोत्साहन दिले जात आहे. गेल्या आठ वर्षात आठ कोटी महिला बचत गटाशी जोडल्या गेल्या आहेत. या बचत गटांना साडेपाच लाख कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे. आता या समूहाशी संबंधित महिला आपली उत्पादने तर तयार करत आहेतच, इतर महिलांनाही रोजगार देत आहेत. 

मित्रांनो,

सरकार, देशभरात आज पायाभूत सुविधा, माहिती तंत्रज्ञान आणि अन्य क्षेत्रात विक्रमी गुंतवणूक करत आहे, त्यामुळे देखील सातत्याने रोजगाराच्या नवनवीन संधी निर्माण होत आहेत. आपण फक्त महाराष्ट्राचा विचार केला, तर केंद्र सरकारतर्फे दोन लाख कोटी रुपयांपेक्षाही अधिकचे सुमारे सव्वा दोनशे प्रकल्प मंजूर करण्यात आले आहेत. या प्रकल्पांवर सध्या काम सुरू आहे किंवा लवकरच सुरू होणार आहेत. तुम्ही विचार करू शकता, महाराष्ट्रात रेल्वेत 75 हजार कोटी रुपये आणि आधुनिक रस्त्यांकरिता 50 हजार कोटी रुपयांचे प्रकल्प मंजूर केले आहेत. सरकार जेव्हा इतका मोठा खर्च पायाभूत सुविधांवर करते, तेव्हा त्यामुळे देखील रोजगाराच्या लाखो नव्या संधी निर्माण होतात.

मित्रांनो,

मला विश्वास आहे की भविष्यात महाराष्ट्रात तरुणांकरिता याच प्रकारे रोजगाराच्या अगणित संधी निर्माण होत राहतील. पुन्हा एकदा, आज नियुक्तीपत्र प्राप्त करणाऱ्या सर्व तरुण-तरुणींना मी शुभेच्छा देतो.

 

 खूप खूप धन्यवाद.

****

Shailesh P/Vinyak/CYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1873649) Visitor Counter : 166