माहिती आणि प्रसारण मंत्रालय

केंद्रीय माहिती आणि प्रसारण सचिवांनी पत्रसूचना कार्यालयाच्या संशोधन विभागाच्या कामांचा आढावा घेतला; क्षमता बांधणी कार्यशाळेचेही केले उद्‌घाटन


लोकांपर्यंत अधिक व्यापक आणि प्रभावीपणे पोहोचण्यासाठी हिन्दी आणि प्रादेशिक भाषांमधील मजकूर वाढवावा: सचिवांची सूचना

Posted On: 28 OCT 2022 9:56PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 28 ऑक्टोबर 2022

केंद्रीय माहिती आणि प्रसारण सचिव अपूर्व चंद्रा यांनी आज, पत्रसूचना कार्यालयाचे प्रधान महासंचालक सत्येंद्र प्रकाश यांच्यासह पत्रसूचना कार्यालयाच्या संशोधन विभागाचा आढावा घेतला. या कार्यालयाला एक वर्ष पूर्ण झालं आहे. सरकारी संवादप्रक्रियेची बऱ्याच काळापासूनची प्रलंबित गरज लक्षात, घेऊन, त्यासाठी, सरकारची धोरणे आणि निर्णयांचा संपूर्ण दृष्टिकोन प्रसारमाध्यमे आणि लोकांपर्यंत जावा, त्यांचे संदर्भ मिळावेत, यासाठी हा संशोधन विभाग सुरु करण्यात आला आहे.

संशोधन विभागाची सुरुवात ऑक्टोबर 2021 पासून झाली. ह्या विभागाद्वारे,केंद्र सरकारच्या विविध उपक्रमांशी संबंधित, तथ्यांवर आधारित, सखोल संशोधन केलेला मजकूर/माहिती संकलित केली जाते आणि ती पत्रसूचना कार्यालय तसेच विविध अधिकृत माध्यमांद्वारे प्रसारमाध्यमे आणि लोकांपर्यन्त पोहोचवली जाते. ह्या विभागाने आतापर्यंत, 450 दस्तावेज तयार केले आहेत. यात स्पष्टीकरणे आणि तथ्ये, प्रश्नांची उत्तरे, विशेष लेख अशा मजकुराचा समावेश आहे. या विभागाची स्थापना झाल्यापासून त्याला प्रसारमाध्यमे आणि लोकांचा उत्तम प्रतिसाद मिळतआहे.

यावेळी अपूर्व चंद्रा यांच्या हस्ते एक दिवसीय क्षमता बांधणी कार्यशाळेचे उद्घाटन झाले.  संशोधन विभागाच्या सदस्यांसाठी ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

यावेळी बोलतांना, अपूर्व चंद्रा यांनी संवादाचा मजकूर हिन्दी आणि प्रादेशिक भाषांमध्ये देखील तयार करावा, जेणेकरुन जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा मजकूर पोहोचवता येईल आणि सरकारची धोरणे आणि कार्यक्रमाची माहिती सहजपणे लोकांपर्यंत पोहोचू शकेल, अशी सूचना केली. त्यांनी विविध प्रकल्पांमध्ये योगदान देणाऱ्या सर्व चमूचे कौतुक केले. तसेच, आपल्या कामाचे दृश्य परिणाम आणि मौल्यवान सूचना देऊन हे काम अधिक समृद्ध करण्यासाठी त्यांनी सूचना दिल्या. या कार्यशाळेच्या उद्घाटन सत्राला माहिती प्रसारण विभागाचे सहसचिव विक्रम सहाय आणि माहिती सेवेतील इतर अधिकारी उपस्थित होते.

संशोधन विभागाची स्थापना ही माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या मागील वर्षातील सर्वात महत्त्वपूर्ण नवीन उपक्रमांपैकी एक आहे, असे सचिवांनी यावेळी नमूद केले. हा विभागाने सरकारी संपर्कव्यवस्थेच्या क्षेत्रात यशस्वीरित्या एक स्थान निर्माण केले आहे, असेही ते पुढे म्हणाले.

सत्येंद्र प्रकाश यांनी यावेळी, संशोधनाचे महत्त्व अधोरेखित केले. यामुळे, राष्ट्रीयदृष्ट्या महत्वाच्या गोष्टींचे सर्वव्यापक पैलू, प्रसारमाध्यमे आणि लोकांपर्यंत पोहोचवावे, अशी सूचना त्यांनी केली. या विभागाकडून असलेल्या अपेक्षा आणि भूमिकांविषयी बोलतांना त्यांनी पत्रसूचना कार्यालयाचा मंच अधिक आशयघन, नेमका, आकर्षक आणि वाचकांना खिळवून ठेवणारा असावा, अशी सूचना केली.  सरकारी संपर्ककर्त्यांनी, आपले अंतिम वाचक कोण आहेत, आपल्याला हा मजकूर कोणापर्यंत पोचवायचा आहे, हे कधीही विसरता कामा नये,असे सत्येंद्र प्रकाश यावेळी म्हणाले.

संशोधन विभागाचे अतिरिक्त महासंचालक, आशीष गोयल यांनी यावेळी, संशोधन विभागाच्या कार्याची माहिती दिली. अगदी सुरुवातीच्या काळापासून ह्या विभागाने आजपर्यंत केलेली कामे, कामांमधील विविधता आणि येत्या काळातली रूपरेषा सर्वांसमोर मांडली.

कार्यशाळेच्या  दुपारच्या दोन सत्रात, संशोधन विभागातील चमूच्या  कार्यक्षमता बांधणीवर भर देण्यात आला. त्यासाठी, त्यांचा नवीन साधने आणि संकल्पनांशी परिचय करुन देण्यात आला, ज्यामुळे त्यांच्या मजकुराचे मूल्य वाढू शकेल.

इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मास कम्युनिकेशन (IIMC) च्या प्राध्यापिका डॉ. अनुभूती यादव यांनी 'दृश्य संवाद: साधने आणि कौशल्ये' या विषयावरील सत्रात मार्गदर्शन केले.  त्यांनी सहभागींना अशा विविध प्रकारच्या साधनांची ओळख करून दिली जी संशोधन दस्तऐवजांना दृश्य स्वरूपात आकर्षक बनवू शकतील. हा मजकूर वाचकांसाठी अधिक आकर्षक कसा बनवावा, यावर त्यांनी भर दिला.

संवाद संशोधन: पद्धती आणि साधने (‘कम्युनिकेशन रिसर्च: मेथडॉलॉजी अ‍ॅण्ड टूल्स’) या विषयावरील सत्रात आयआयएमसीच्या प्राध्यापिका डॉ. शाश्वती गोस्वामी, संशोधन अधिकारी अनन्या रॉय, यांनी संपर्क संशोधनातील सर्व बारकाव्यांसह मार्गदर्शन केले.

संशोधन विभागाने तयार केलेली स्पष्टीकरणे (Explainers), तथ्ये (Factsheets,), वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)विशेष लेख (Features), आणि अमृत यात्रा मालिका (Amrit Yatra series)अशी विविध लेखन सामुग्री बघण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

 

 

S.Kane/R.Aghor/ P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1871710) Visitor Counter : 172