संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

संरक्षण क्षेत्रातील ‘आत्मनिर्भरता’: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डेफएक्सपो (DefExpo) 2022 दरम्यान स्वदेशी वापराच्या 101 वस्तूंची चौथी यादी केली जाहीर

Posted On: 19 OCT 2022 11:06AM by PIB Mumbai

संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर होण्यासाठी तसेच सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्राच्या सक्रिय सहभागाने संरक्षण क्षेत्रातील उत्पादन निर्यातीला चालना देणे हा सरकारच्या ‘आत्मनिर्भर भारत अभियाना’तील एक महत्त्वाचा घटक आहे.

संरक्षण मंत्रालयाने (एमओडी) संरक्षण क्षेत्रात ‘आत्मनिर्भरता’ साध्य करण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत. सकारात्मक स्वदेशीकरण याद्या हा त्या दिशेने महत्त्वाचा उपक्रम आहे.

संरक्षण मंत्रालयाने यापूर्वी अनुक्रमे 21 ऑगस्ट 2020, 31 मे 2021 आणि 07 एप्रिल 2022 रोजी 310 वस्तूंचा समावेश असलेल्या 'प्रथम, द्वितीय आणि तृतीय सकारात्मक स्वदेशीकरण याद्या' जाहीर केल्या होत्या. गुजरातमधील गांधीनगर येथे डेफएक्सपो (DefExpo) 2022 च्या उद्घाटन समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 19 ऑक्टोबर 2022 रोजी 101 वस्तूंची 'चौथी सकारात्मक स्वदेशीकरण यादी' जाहीर केली. संरक्षण संपादन प्रक्रिया (डीएपी) 2020 मध्ये दिलेल्या तरतुदींनुसार यादीतील सर्व वस्तू स्वदेशी स्त्रोतांकडूनच खरेदी केल्या जातील. ही यादी संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर होण्यासाठी सतत प्रोत्साहन देणारी आहे.

पंतप्रधानांनी 76 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्याच्यावरून राष्ट्राला संबोधित करताना, या सकारात्मक यादीद्वारे स्वदेशीकरणासाठी घेतल्या जात असलेल्या प्रयत्नांची प्रशंसा केली होती. या यादीमुळे स्वदेशीकरणाला चालना मिळेल आणि संरक्षण क्षेत्रात ‘आत्मनिर्भरता’ साध्य होईल आणि आगामी काळात निर्यात वाढेल असे ते म्हणाले.

संरक्षण मंत्रालयाने उद्योगांसह तसेच सर्व संबंधितांशी केलेल्या चर्चेच्या अनेक फेऱ्यांनंतर चौथी यादी तयार केली आहे. यात विकासाच्या प्रक्रियेतील तसेच येत्या पाचदहा वर्षात मागणी नोंदवता येतील अशा उपकरणे/प्रणालींवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. पहिल्या तीन याद्यांप्रमाणेच सातत्याने आवश्‍यकता असलेल्या दारूगोळा आयातीला पर्याय निर्माण करण्यावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. ही चौथी यादी भारतीय संरक्षण उद्योगाची वाढती क्षमता दर्शवते. तंत्रज्ञान तसेच उत्पादन क्षमतांमध्ये नवीन गुंतवणूक आकर्षित करून देशांतर्गत संशोधन आणि विकासाच्या क्षमतेला ती चालना देणारी आहे.

सशस्त्र दलांचा कल आणि भविष्यातील गरजा समजून घेण्यासाठी तसेच देशांतर्गत आवश्यक संशोधन आणि विकास, उत्पादन क्षमता निर्माण करण्यासाठी देशांतर्गत संरक्षण उत्पादन उद्योगाला पुरेशी स्पष्टता आणि संधी या चौथ्या यादीने निर्माण होणार आहे.

संरक्षण मंत्रालय यासाठी अनुकूल वातावरण उपलब्ध करेल आणि 'चौथ्या सकारात्मक स्वदेशीकरण यादी'मध्ये नमूद केलेल्या कालमर्यादा पूर्ण केल्या जातील याची खातरजमा करण्यासाठी उद्योगाला सर्वतोपरी सहकार्य करेल. यामुळे संरक्षण क्षेत्रास आत्मनिर्भरता प्राप्त होईल आणि देशातील निर्यातीसाठी क्षमता विकसित होईल.  सर्व भागधारकांच्या माहितीसाठी ही यादी संरक्षण मंत्रालयाच्या संकेतस्थळावर (www.mod.gov.in) उपलब्ध केली आहे.

चौथी सकारात्मक स्वदेशीकरण यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा


***

Gopal C/Vinayak/CYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1869132) Visitor Counter : 300