संरक्षण मंत्रालय
“आत्मनिर्भर आणि सुरक्षित सीमा हीच ‘नव्या भारताला’ सशक्त करण्याची गुरुकिल्ली; त्याचा पाया घातला गेला आहे- संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे नवी दिल्लीत एका कार्यक्रमात प्रतिपादन
‘आत्मनिर्भर स्वदेशी संरक्षण उद्योगांनी बनवलेल्या अत्याधुनिक शस्त्रांचा पुरवठा सैन्यदलांना करण्यावर भर” -राजनाथ सिंह
Posted On:
15 OCT 2022 3:57PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 ऑक्टोबर 2022
“भारताला एक शक्तिशाली देश बनवण्यासाठी, आत्मनिर्भर आणि सुरक्षित सीमा अतिशय महत्वाच्या आहेत” असे प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज, 15 ऑक्टोबर 2022 रोजी नवी दिल्लीत एका कार्यक्रमात बोलतांना केले. यावेळी आपल्या भाषणात, राजनाथ सिंह यांनी, भारताला, 2047 पर्यंत जगातील सर्वात शक्तिशाली देशांच्या पंक्तीत स्थान मिळवून देण्याच्या सरकारच्या निश्चयाचा पुनरुच्चार केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी, संरक्षण मंत्रालय सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
भारतीय सैन्यदलांना, भारतीय संरक्षण उद्योगांनीच तयार केलेल्या अत्याधुनिक/ अद्ययावत शस्त्रास्त्रांचा पुरवठा करण्यावर सरकार भर देत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. शस्त्र आयातीवर असलेले अवलंबित्व कमी करण्यासाठी, संरक्षण मंत्रालयाने हाती घेतलेल्या विविध उपाययोजनांची त्यांनी माहिती दिली. यात, भारतीय कंपन्यांकडून विकत घेण्यासाठीच्या स्वदेशी उपरकरणांच्या यादीचाही त्यांनी उल्लेख केला. अलीकडेच नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट करण्यात आलेल्या आयएनएस विक्रांतचे उदाहरण त्यांनी दिले. यात, देशी बनावटीच्या 76 टक्के वस्तू, वापरण्यात आल्या आहेत. भारताकडे, आधुनिक शस्त्रे आणि प्लॅटफॉर्म विकसित करण्याची क्षमता आहे, असे संरक्षण मंत्री म्हणाले. येत्या दहा वर्षांत, भारतात, अत्याधुनिक आणि प्रभावी अशी जल, भू, आकाश आणि अवकाश अशा सर्व भागातील शस्त्रास्त्र प्लॅटफॉर्म तयार करण्याची क्षमता विकसित होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
गेल्या काही वर्षांत सरकारने उचललेल्या अनेक पावलांमुळे, देशातील संरक्षण क्षेत्रातील उपकरणांची निर्यात मोठ्या प्रमाणात वाढली आहे, याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. “एक काळ असा होता, जेव्हा भारताने केवळ 1,900 कोटी रुपयांच्या संरक्षण साधन सामुग्रीची निर्यात केली होती. आज हा आकडा 13,000 कोटी रुपयांच्या पलीकडे गेला आहे. 2025 पर्यंत, देशांत 1.75 लाख कोटी रुपयांचे संरक्षण विषयक उत्पादन करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे, त्यापैकी, 35,000 कोटी रुपयांचे उत्पादन केवळ निर्यातीसाठी केले जाईल. आणि हे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दिशेने आपण योग्य वाटचाल करतो आहोत,” असे त्यांनी सांगितले.
सीमाप्रदेशाचा विकास, हा ही केंद्र सरकारच्या दृष्टिकोनाचा एक महत्वाचा भाग असल्याचे सांगत, राजनाथ सिंह म्हणाले की, देशाच्या दुर्गम भागात संपर्क आणि दळणवळण व्यवस्था मजबूत करण्यासाठीचे सर्व प्रयत्न सुरु असून, त्यामुळे लष्करी दलांची शस्त्रसज्जता वाढेल आणि या सीमाभागात राहणारे लोक भारताशी जोडले जातील. ईशान्य भारतातील राज्यांमध्येही, लष्करी दले आणि सर्वसामान्य लोकांमध्ये असलेली एकत्रित ऊर्जा कौतुकास्पद आहे, असे सांगत त्यांनी अत्यंत विपरित परिस्थितीत, ईशान्य भारतीयांच्या अभेद्य देशभक्तीचे कौतुक केले.
ईशान्य प्रदेश भारताचा एक बाहू असून, या बाहूकडे स्वातंत्र्यानंतर दीर्घकाळ दुर्लक्ष केले गेले, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ईशान्य भागाच्या प्रगतीवर केंद्र सरकारने सुरुवातीपासूनच भर दिला आहे. कारण हा प्रदेश देशाच्या आर्थिक, सामाजिक, राजकीय आणि धोरणात्मक विकासासाठी महत्त्वाचा आहे, असे राजनाथ सिंह म्हणाले.
“आमच्या सरकारची गेल्या साडे आठ वर्षातील सर्वात मोठी कामगिरी म्हणजे ईशान्येकडील राज्यांमध्ये शांतता आणि समृद्धी प्रस्थपित करणे. 2014 पासून, ईशान्येकडील जवळजवळ प्रत्येक राज्यातल्या हिंसाचाराच्या घटनांमध्ये 80-90 टक्के घट झाली आहे. बहुतेक कट्टरपंथी संघटना एकतर मुळापासून उखडून टाकल्या आहेत किंवा कट्टरपंथियांनी शरणागती पत्करत, मुख्य प्रवाहात सामील होण्याचा मार्ग निवडला आहे. 80 टक्के भागातून सशस्त्र दल (विशेष अधिकार) कायदा काढून टाकण्यात आला आहे. हे शक्य झाले कारण आता या प्रदेशात शांतता, स्थैर्य आणि शाश्वत स्थिती निर्माण झाली आहे,” असे राजनाथ सिंह म्हणाले.
ईशान्य भागात, दळणवळणाचे मजबूत जाळे उभारणे, हे गेल्या साडे आठ वर्षातले सरकारचे आणखी एक मोठे यश असल्याचे त्यांनी सांगितले. हवाई, रस्ते आणि रेल्वे संपर्काच्या पायाभूत सुविधा मजबूत झाल्या आहेत त्यामुळे, हा संपूर्ण प्रदेश उर्वरित भारताशी जोडला गेला आहे, असे संरक्षण मंत्री म्हणाले.
पंतप्रधान ईशान्य भारत प्रदेश विकास उपक्रम (PM-DevINE) ला केंद्रीय मंत्रिमंडळाने दिलेली मंजूरी हेच ईशान्य भारताच्या प्रगतीसाठी सरकारच्या कटीबद्धतेचे द्योतक आहे, असे राजनाथ सिंह म्हणाले. एक भक्कम, समृद्ध आणि आत्मनिर्भर असा ‘नवा भारत’ निर्माण करायचा असेल, तर, त्यासाठी ईशान्य भारतीय प्रदेशाचा विकास अत्यंत महत्वाचा आहे, असेही त्यांनी पुढे सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची अर्थव्यवस्था अधिक गतिमान आणि मजबूत झाली आहे. 2014 च्या तुलनेत देशातील, स्टार्टअप्स च्या संख्येत कित्येक पटीने वाढ झाली असून, 400 पासून ह्या स्टार्ट अप्स आता 75, 000 पर्यंत पोहोचल्या आहे. यापैकी 100 पेक्षा जास्त स्टार्ट अप्स, आज जगभरात युनिकॉर्न म्हणून ओळखल्या जात असून, त्यांची किंमत, 1 अब्ज डॉलर्स इतकी आहे, असे त्यांनी नमूद केले.
“आज जेव्हा जगातील, बहुतांश देश आर्थिक संकटाचा सामना करत आहेत, जागतिक नाणेनिधीने जागतिक अर्थव्यवस्थेचा दर 2022-23 ह्या वर्षांत, 2.9 असेल, असा अंदाज वर्तवला आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेचा विकासदरही किंचित कमी असेल, असे आयएमएफ ने म्हटले असले, तरीही तो 6.1 टक्के असेल. संपूर्ण जग भारताच्या ह्या विकासयात्रेकडे बघत आहे, असे संरक्षण मंत्री म्हणाले.
* * *
S.Patil/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1868051)