पंतप्रधान कार्यालय
हिमाचल प्रदेशातील चंबा येथे दोन जलविद्युत प्रकल्पांची पंतप्रधानांच्या हस्ते पायाभरणी
प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या (पीएमजीएसवाय ) तिसऱ्या टप्प्याचा पंतप्रधानांनी केला प्रारंभ
''130 कोटी भारतीयांसाठी आगामी 25 वर्षे अत्यंत महत्त्वाची''
''राज्याचा विकासाचा वेग दुप्पट करणाऱ्या दुहेरी इंजिन सरकारची ताकद हिमाचलला आता जाणवली आहे''
"डोंगराळ भागात, दुर्गम भागात वेगवान विकासाचा महायज्ञ सुरू आहे "
“तुमचा (लोकांचा) आदेश माझ्यासाठी सर्वोच्च आहे. तुम्हीच मला आदेश देणारे हाय कमांड''
"सेवेची भावना प्रबळ असते तेव्हाच अशाप्रकारची विकासकामे होतात"
"केवळ दुहेरी -इंजिन सरकारनेच अध्यात्म आणि पर्यटनाचे सामर्थ्य ओळखले "
Posted On:
13 OCT 2022 4:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 ऑक्टोबर 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हिमाचल प्रदेशातील चंबा येथे दोन जलविद्युत प्रकल्पांची पायाभरणी केली आणि प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या (पीएमजीएसवाय ) तिसऱ्या टप्प्याचा प्रारंभ केला.
दोन दिवसांपूर्वी ते महाकाल नगरीला भेट देत होते आणि आज ते मणि महेश्वराच्या दर्शनाला आले आहेत, असे पंतप्रधानांनी उपस्थितांना संबोधित करताना नमूद केले. चंबा संदर्भातील विस्तृत माहिती पंतप्रधानांना सामायिक करणाऱ्या ,या भागातील एका शिक्षकाने पाठवलेल्या पत्राची पंतप्रधानांनी आठवण करून दिली. हे पत्र पंतप्रधानांनी मन की बातमध्ये सामायिक केले होते.
चंबा आणि इतर दुर्गम भागातील गावांसाठी रस्ते जोडणी आणि रोजगार निर्मितीवर आधारीत विविध प्रकल्प सुरू करण्याची संधी मिळाल्याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला. ‘पहाड का पानी और पहाड की जवानी पहाड के काम नहीं आती’ म्हणजेच डोंगरावरचे पाणी आणि डोंगराचे तारुण्य डोंगराच्या कामी येत नाही ही म्हण आता बदलत आहे, असे सांगत हिमाचल प्रदेशातील आपल्या दिवसांची आठवण करून देत पंतप्रधानांनी याचा उल्लेख केला. “आता डोंगराळ भागातील तरुणांचा या भागाच्या विकासात सक्रिय सहभाग असेल ”, असे ते म्हणाले.
''130 कोटी भारतीयांसाठी पुढील 25 वर्षे अत्यंत महत्त्वाची आहेत'', असे पंतप्रधान म्हणाले."भारताचा स्वातंत्र्याचा अमृत काळ सुरु झाला असून या कालावधीत भारताला एक विकसित देश बनवण्याचे उद्दिष्ट पूर्ण करायचे आहे, असे त्यांनी सांगितले. येत्या काही महिन्यांत,हिमाचलच्या स्थापनेलाही 75 वर्षे पूर्ण होत आहेत.म्हणजेच, जेव्हा भारत स्वातंत्र्याची 100 वर्षे साजरी करेल, तेव्हा हिमाचल देखील आपल्या स्थापनेची 100 वर्षे साजरी करेल.म्हणूनच येत्या 25 वर्षांतील प्रत्येक दिवस आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे,” असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले
जेव्हा हिमाचल प्रदेशचा दिल्लीमध्ये फारसा प्रभाव नव्हता आणि त्याच्या मागण्या आणि विनंत्यांकडे दुर्लक्ष केले गेले, परिणामी चंबासारखी महत्त्वाची श्रद्धास्थाने आणि नैसर्गिक सौंदर्य लाभलेली ठिकाणे विकासाच्या शर्यतीत मागे पडली, या दिवसांची पंतप्रधानांनी आठवण करून दिली. चंबाच्या सामर्थ्याची जाणीव असल्याने आकांक्षी जिल्हा म्हणून याकडे विशेष लक्ष देण्यात आल्याचे मोदी यांनी सांगितले. एक भारत श्रेष्ठ भारत या भावनेने केरळमधील मुले हिमाचलमध्ये येत असल्याबद्दलही त्यांनी आनंद व्यक्त केला.
राज्याच्या विकासाचा वेग दुप्पट करणाऱ्या दुहेरी इंजिन सरकारची ताकद आज हिमाचलला जाणवत असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. जिथे कामाचा भार आणि ताण कमी आणि राजकीय फायदे जास्त अशा भागात पूर्वीची सरकारे सेवा पुरवत असत ,त्यामुळे दुर्गम आणि आदिवासी भागाचा विकास दर बऱ्यापैकी कमी राहिला, अशी टीका पंतप्रधानांनी केली. “रस्ते असो, वीज असो की पाणी असो, अशा भागातील लोकांना सर्वात शेवटी लाभ मिळतो”,मात्र "दुहेरी इंजिन सरकारची कार्यशैली इतरांपेक्षा वेगळी आहे. लोकांचे जीवन सुसह्य कसे करता येईल याला आमचे प्राधान्य आहे.म्हणूनच आम्ही आदिवासी भाग आणि डोंगराळ भागांच्या विकासासाठी सर्वाधिक भर देत आहोत'', असे मोदी म्हणाले. दुर्गम आणि डोंगराळ भागातील जीवन बदलवत असलेल्या गॅस जोडणी , पाईपद्वारे पाणी, आरोग्य सेवा, आयुष्मान भारत , रस्ते जोडणी यांसारख्या त्यांच्या सरकारने केलेल्या उपाययोजनांचा त्यांनी उल्लेख केला.
“आम्ही गावागावात निरामयता केंद्र बनवत आहोत, त्याचवेळी जिल्ह्यांमध्येही वैद्यकीय महाविद्यालये सुरू करत आहोत”, असे त्यांनी सांगितले.
पर्यटनाच्या संरक्षणासाठी हिमाचलला लसीकरणात कशाप्रकारे प्राधान्य देण्यात आले याचाही उल्लेख त्यांनी केला.देशात सर्वात जलद गतीने शंभर टक्के लसीकरण टप्पा पूर्ण केल्याबद्दल मोदी यांनी मुख्यमंत्री आणि त्यांच्या चमूचे कौतुक केले.
ग्रामीण रस्त्यांच्या बांधणीसंदर्भात बोलताना पंतप्रधान म्हणाले की, स्वातंत्र्यानंतर 2014 पर्यंत 7000 किमी लांबीचे ग्रामीण रस्ते 1800 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आले होते, मात्र गेल्या 8 वर्षांत,केवळ 5000 कोटी रुपये आर्थिक खर्चात 12000 किमीचे रस्ते बांधण्यात आले आहेत.आज सुरू झालेल्या योजनांमुळे 3000 किमीचे ग्रामीण रस्ते तयार होतील, अशी माहिती त्यांनी दिली.
पंतप्रधान म्हणाले की, ते दिवस गेले जेंव्हा हिमाचल प्रदेश दिल्लीला येऊन विनंत्या करायचा. आता हिमाचल प्रदेश नवीन प्रकल्पांची माहिती आणि त्याच्या प्रगतीचे तपशील सोबत घेऊन आपले हक्क मागण्यासाठी येत आहे. “तुमचा (लोकांचा) आदेश माझ्यासाठी सर्वोच्च आहे. तुम्हीच माझे हाय कमांड आहात. हे मी माझे भाग्य समजतो, म्हणूनच तुमची सेवा करताना मला विशेष आनंद मिळतो आणि नवी ऊर्जा देखील मिळते”, असेही पंतप्रधान म्हणाले.
गेल्या 8 वर्षातील विकास अधोरेखित करताना पंतप्रधान म्हणाले, "देशभरातल्या डोंगराळ भागात, दुर्गम भागात तसेच आदिवासी भागात वेगवान विकासाचा महायज्ञ सुरू आहे." त्याचे फायदे केवळ हिमाचलमधील चंबापुरतेच मर्यादित नसून पांगी-भरमौर, छोटा-बडा भंगाल, गिरिमपार, किन्नौर आणि लाहौल-स्पिती यांसारख्या क्षेत्रांनाही याचा लाभ मिळत असल्याची माहिती त्यांनी दिली. आकांक्षी जिल्ह्यांच्या विकास क्रमवारीत चंबाला दुसरे स्थान मिळाल्याबद्दल पंतप्रधानांनी सर्वांचे अभिनंदन केले.
आदिवासी समुदायांच्या विकासावर लक्ष केंद्रित करण्याबाबत बोलताना पंतप्रधानांनी माहिती दिली की, सिरमौरच्या गिरीपार भागातील हाटी समुदायाला आदिवासी दर्जा देण्याचा आणखी एक ऐतिहासिक निर्णय सरकारने घेतला आहे. “आमचे सरकार आदिवासी समुदायाच्या विकासाला किती प्राधान्य देत आहे हे यावरून दिसून येते”, असे ते म्हणाले. हिमाचल प्रदेश आणि केंद्रातील याआधीच्या सरकारांनी निवडणुकीच्या वेळीच दुर्गम आणि आदिवासी गावांचा विचार केला होता, मात्र आजचे दुहेरी इंजिनचे सरकार अहोरात्र लोकांची सेवा करण्यासाठी झटत आहे, असे पंतप्रधान म्हणाले. कोरोना महामारीच्या काळात गरीब कुटुंबांना दिलासा देण्यासाठी सरकारने केलेल्या प्रयत्नांची आठवण करून देत पंतप्रधानांनी मोफत धान्य वितरण कार्यक्रमाचा उल्लेख केला. "गेल्या दीड वर्षांपासून सरकार देशातील 80 कोटींहून अधिक लोकांना अन्नधान्य पुरवत असल्याबद्दल जग भारताकडे आश्चर्याने पाहत आहे", असे मोदी म्हणाले. मोदींनी भारतातील कोविड प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रमाच्या यशाबद्दल समाधान व्यक्त केले आणि या यशाचे श्रेय आरोग्य विभागातील कामगार आणि आशा कार्यकर्त्यांच्या सक्रिय सहभागाला दिले. "सेवेची भावना प्रबळ असेल तेव्हाच विकासाची अशी कामे होतात", असे मोदी म्हणाले.
डोंगराळ आणि आदिवासी भागात रोजगाराच्या बाबतीत असलेल्या आव्हानांबाबत बोलताना पंतप्रधान म्हणाले की, आम्ही या भागातील सामर्थ्याचे स्थानिक लोकांच्या ताकदीत रूपांतर करण्याचा प्रयत्न करत आहोत. "आदिवासी भागातील जल आणि वन संपत्ती अमूल्य आहे", असे ते म्हणाले. पंतप्रधानांनी निदर्शनास आणून दिले की चंबा हा देशाच्या अशा भागात आहे जिथे सर्वप्रथम जलविद्युत निर्मितीला सुरूवात झाली. आज ज्या प्रकल्पांची आज पायाभरणी करण्यात आली आहे अशा प्रकल्पामुळे वीज निर्मिती क्षेत्रात चंबा आणि हिमाचल प्रदेशाचे योगदान वाढेल हे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. हिमाचलमध्ये चंबा येथे निर्माण होणाऱ्या विजेपासून शेकडो कोटींची कमाई होईल आणि येथील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असेही ते म्हणाले. “गेल्या वर्षी मला अशा 4 मोठ्या जलविद्युत प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करण्याची संधी मिळाली. काही दिवसांपूर्वी बिलासपूरमध्ये सुरू झालेल्या हायड्रो इंजिनिअरिंग महाविद्यालयाचा हिमाचलच्या तरुणांनाही फायदा होईल”, असे पंतप्रधान म्हणाले.
फलोत्पादन, पशुसंवर्धन आणि हस्तकला आणि कला क्षेत्रांतील हिमाचलच्या सामर्थ्याबाबत बोलताना पंतप्रधानांनी फुले, चंबाचे चुख, राजमा मद्रा, चंबा चप्पल, चंबा थाल आणि पंगी की थांगी यांसारख्या स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन दिल्याबद्दल स्थानिक बचत गटांचे कौतुक केले. ही उत्पादने देशाचा वारसा आहेत असे पंतप्रधान म्हणाले. व्होकल फॉर लोकलचे उदाहरण देत पंतप्रधानांनी बचत गटांच्या महिला सदस्यांचे कौतुक केले. कारण या महिलांनी स्थानिक उत्पादनांच्या विक्रीला चालना देणाच्या सरकारच्या प्रयत्नांना वास्तवात आणले आहे. हिमाचल प्रदेशात उत्पादीत उत्पादनांचा एक जिल्हा एक उत्पादन योजनेंतर्गत प्रचार केला जात आहे आणि ही उत्पादने परदेशी मान्यवरांसमोर मांडण्याचा प्रयत्न देखील केला जात आहे, जेणेकरून हिमाचलचे नाव संपूर्ण जगात जाईल आणि अधिकाधिक लोकांना या उत्पादनांची माहिती मिळेल, असेही पंतप्रधान म्हणाले.
“दुहेरी इंजिनचे सरकार आपली संस्कृती, वारसा आणि श्रद्धा यांचा आदर करते. चंबासह संपूर्ण हिमाचल ही श्रद्धा आणि वारशाची भूमी आहे.” असे पंतप्रधान म्हणाले. हिमाचल प्रदेशाच्या वारसा आणि पर्यटन या बाबींवर विस्ताराने बोलताना पंतप्रधानांनी कुल्लू येथील दसरा महोत्सवाला त्यांनी दिलेल्या भेटीची आठवण करून दिली आणि यात एकीकडे वारसा तर दुसरीकडे पर्यटन असल्याचे सांगितले. डलहौसी आणि खज्जियार सारखी पर्यटन स्थळे हिमाचलसाठी अध्यात्म आणि पर्यटनाच्या दृष्टीने एक प्रेरक शक्ती ठरणार आहेत, असे पंतप्रधान म्हणाले. “केवळ दुहेरी इंजिनच्या सरकारनेच ही शक्ती ओळखली आहे. हिमाचलने आपल्या जुन्या प्रथा बदलून नवीन परंपरा निर्माण करण्याचा संकल्प केला आहे.”
या विशाल मेळाव्यात आपल्याला हिमाचलच्या विकासाची आणि संकल्पांची ताकद दिसते असे सांगत, या विशाल मेळाव्याला साद घालत पंतप्रधानांनी आपल्या भाषणाचा समारोप केला. हिमाचल प्रदेशातील लोकांच्या संकल्पांना आणि स्वप्नांना पाठिंबा देण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जय राम ठाकूर, हिमाचल प्रदेशचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर, खासदार किशन कपूर, इंदू गोस्वामी आणि भाजप प्रदेशाध्यक्ष सुरेश कश्यप आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
पार्श्वभूमी
पंतप्रधानांनी दोन जलविद्युत प्रकल्पांची पायाभरणी केली - 48 मेगावॅट चांजू-III जलविद्युत प्रकल्प आणि 30 मेगावॅटचा देवथल चांजू जलविद्युत प्रकल्प. या दोन्ही प्रकल्पांतून वर्षाकाठी 270 दशलक्ष युनिटपेक्षा जास्त वीजनिर्मिती होईल आणि या प्रकल्पांमधून हिमाचल प्रदेशला सुमारे 110 कोटी रुपयांचा वार्षिक महसूल मिळण्याची अपेक्षा आहे. राज्यातील सुमारे 3125 किलोमीटर रस्त्यांच्या सुधारणांसाठी पंतप्रधानांनी हिमाचल प्रदेशमध्ये प्रधानमंत्री ग्राम सडक योजना (PMGSY) - III देखील सुरू केली. या टप्प्यांतर्गत राज्यातील 15 सीमावर्ती भागातील आणि राज्यातल्या दूरस्थ भागांना जोडणाऱ्या 440 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांच्या अद्ययावतीकरणासाठी केंद्र सरकारकडून 420 कोटी रुपयांपेक्षा अधिकचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
S.Kane/Sonal C/Shraddha/Vikas/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1867458)
Read this release in:
Bengali
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam