पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

संयुक्त राष्ट्र जागतिक भू-स्थानिक आंतरराष्ट्रीय परिषदेत पंतप्रधानांनी केलेले संबोधन

Posted On: 11 OCT 2022 11:39AM by PIB Mumbai

आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी, जागतिक भू-स्थानिक क्षेत्रातील तज्ञ, आदरणीय सहभागी आणि मित्रगण. भारतात आपले स्वागत आहे!

संयुक्त राष्ट्रांच्या दुसर्‍या जागतिक भू-स्थानिक आंतरराष्ट्रीय परिषदेचा भाग म्हणून आपल्या  सर्वांशी संवाद साधताना मला आनंद होत आहे. आपण सर्वजण एकत्र येऊन आपले भविष्य घडवत आहोत, त्यामुळे या ऐतिहासिक प्रसंगी आपले यजमानपद भूषवताना भारतातल्या लोकांना आनंद वाटत आहे. ही परिषद हैदराबादमध्ये होत आहे, ही गोष्ट अद्भुत आहे. हे शहर त्याची संस्कृती आणि खाद्यसंस्कृती, त्याचं आदरातिथ्य आणि उच्च-तंत्रज्ञानाचा  दृष्टीकोन यासाठी ओळखलं जातं.    

 

मित्रहो,

या परिषदेची संकल्पना, ‘जागतिक भू-सक्षम गाव: कोणीही मागे राहू नये (जिओ-एनेबलिंग ग्लोबल विलेज)’, ही आहे. भारताने गेल्या काही वर्षांमध्ये उचललेल्या पावलांमधून ही संकल्पना दिसून येते. आम्ही अंत्योदयाच्या दृष्टीकोनावर काम करत आहोत, ज्याचा अर्थ आहे, कानाकोपऱ्यातल्या वंचित घटकाला मिशन मोडमध्ये सक्षम करणे. हा तो दृष्टीकोन आहे, ज्याने आम्हाला वंचित घटकाचं मोठ्या प्रमाणात सक्षमीकरण करण्यामध्ये मार्गदर्शन केलं आहे. बँक खातं नसलेल्या 450 दशलक्ष नागरिकांना, जी लोकसंख्या युएसएच्या (USA) लोकसंख्येहून जास्त आहे, त्यांना बँकिंग प्रणालीशी जोडणं, विमा कवच नसलेल्या 135 दशलक्ष लोकांचा, जी लोकसंख्या फ्रान्सच्या लोकसंख्येच्या जवळजवळ दुप्पट आहे, त्यांचा विमा काढणं, 110 दशलक्ष कुटुंबांपर्यंत स्वच्छता सुविधा पोहोचवणं आणि 60 दशलक्ष कुटुंबांना नळाच्या पाण्याची जोडणी देणं, यामधून भारत, कोणीही मागे राहणार नाही याची काळजी घेत आहे. 

 

मित्रहो,

भारताच्या विकासाच्या प्रवासात दोन स्तंभ महत्वाचे आहेत: तंत्रज्ञान आणि प्रतिभा. आपण तंत्रज्ञान, या पहिल्या स्तंभाकडे पाहूया. तंत्रज्ञान परिवर्तन आणतं. आपल्यापैकी काही जणांनी ऐकलं असेल की रिअल-टाइम डिजिटल पेमेंट करण्यामध्ये भारत जगात पहिल्या  स्थानावर आहे. आपण जर बाहेर पडलात, तर हे पहाल की लहानात लहान विक्रेते देखील डिजिटल पेमेंट स्वीकारतात, अगदी त्याला प्राधान्य देतात. त्याचप्रमाणे, तंत्रज्ञानाच्या माध्यमातूनच आम्ही कोविड-19 च्या काळात गरीबांना मदत केली. आमच्या तंत्रज्ञान-आधारित जेएएम (JAM) त्रिमूर्तीने 800 दशलक्ष लोकांपर्यंत अखंडपणे कल्याणकारी लाभ पोहोचवले! जगातल्या सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेला देखील तंत्रज्ञानाच्या व्यासपीठाने पाठबळ दिलं होतं. भारतात, तंत्रज्ञान हे  समावेशाचं माध्यम आहे. आपण सर्व भू-स्थानिक क्षेत्राशी संबंधित लोक आहात. आपल्याला हे जाणून घ्यायला खूप आनंद होईल, की भू-स्थानिक तंत्रज्ञान, समावेश आणि प्रगतीला चालना देत आहे. उदाहरण म्हणून आमची स्वामित्व योजना घ्या. आम्ही खेड्यांमधल्या मालमत्तेचा नकाशा तयार करण्यासाठी ड्रोनचा वापर करत आहोत. या डेटाचा वापर करून ग्रामस्थांना प्रॉपर्टी कार्ड मिळत आहेत. अनेक दशकांत प्रथमच, ग्रामीण भागातल्या लोकांकडे मालकी हक्काची स्पष्ट कागदपत्र आहेत. जेव्हा स्त्रिया मालकीच्या मुख्य लाभार्थी असतील तेव्हा ही समृद्धी अधिक गतिमान होऊ शकते.

 

हेच आम्ही भारतात करत आहोत. आमच्या सार्वजनिक गृहनिर्माण योजनेने जवळजवळ 24 दशलक्ष गरीब कुटुंबांना घरं दिली आहेत. यापैकी जवळजवळ 70% घरांच्या एकट्या अथवा संयुक्त मालक, महिला आहेत. या पावलांचा थेट परिणाम संयुक्त राष्ट्रांच्या, गरीबी आणि लैंगिक समानतेबाबतच्या शाश्वत विकास उद्दिष्टांवर होतो. आमचा महत्वाकांक्षी पीएम गती शक्ती मास्टरप्लॅन मल्टी-मॉडल पायाभूत सुविधा निर्माण करत आहे. त्याला भू-स्थानिक तंत्रज्ञानाने ऊर्जा दिली आहे. आमचं डिजिटल ओशन व्यासपीठ आमच्या महासागरांच्या व्यवस्थापनासाठी भू-स्थानिक तंत्रज्ञान वापरत आहे. आमचं पर्यावरण आणि सागरी परिसंस्थेसाठी हे अत्यंत महत्वाचं आहे. भू-स्थानीक तंत्रज्ञानाचे फायदे इतरांबरोबर वाटून घेण्यात भारताने यापूर्वीच सर्वांसमोर आपलं उदाहरण ठेवलं आहे. आमचा दक्षिण आशिया उपग्रह आमचा शेजाऱ्यांबरोबरचा संपर्क वाढवत आहे आणि दळणवळण सुलभ करत आहे.   

 

मित्रहो,

मी आपल्याला सांगितलं आहे की भारताच्या प्रवासाला तंत्रज्ञान आणि प्रतिभेचं बळ मिळालं आहे. आता आपण प्रतिभा, या दुसर्‍या स्तंभाकडे वळूया. भारत हा नवोन्मेषाची मोठी ऊर्जा असलेला तरुण देश आहे. आम्ही जगातल्या शीर्षस्थानी असलेल्या स्टार्ट-अप हब पैकी एक आहोत. 2021 पासून, आम्ही युनिकॉर्न स्टार्टअप्सची संख्या जवळजवळ दुप्पट केली आहे. याला भारतातली युवा प्रतिभा कारणीभूत आहे. भारत वसाहतवादी राजवटीपासूनच्या स्वातंत्र्याची ७५ वर्ष साजरी करत आहे. सर्वात महत्त्वाच्या स्वातंत्र्यांपैकी एक म्हणजे, नवोन्मेषाचं स्वातंत्र्य. भारतातल्या भू-स्थानिक क्षेत्रासाठी हे सुनिश्चित करण्यात आलं आहे. आम्ही आमच्या उज्ज्वल, युवा प्रतिभावंतांसाठी हे क्षेत्र खुलं केलं आहे. दोन शतकांमध्ये गोळा केलेला सर्व डेटा अचानक विनामूल्य आणि सहज उपलब्ध झाला. भू-स्थानिक डेटाचं संकलन, निर्मिती आणि डिजिटायझेशन याचं आता लोकशाहीकरण झालं आहे. अशा सुधारणा बंदिस्त नाहीत. भू-स्थानिक क्षेत्रासह, आम्ही आमच्या ड्रोन क्षेत्राला देखील मोठी चालना दिली. आमचं अवकाश क्षेत्र देखील खासगी सहभागासाठी खुलं झालं आहे. भारतात 5G देखील सुरु होत आहे. विद्यमान डेटाची सहज उपलब्धता, नवीन डेटा मिळविण्यासाठी ड्रोन तंत्रज्ञान, अवकाश क्षमतांसाठी व्यासपीठ आणि जलद गती संपर्क सक्षमता तरुण भारत आणि जगासाठी परिवर्तन घडवून आणणारं (गेम चेंजर) ठरेल.       

 

मित्रहो,

‘कोणीही मागे राहू नये’, असं आपण जेव्हा म्हणतो, तेव्हा ते सगळीकडे लागू असतं. कोविड-19 महामारी ही सर्वांना बरोबर घेऊन जाण्यासाठी जगाला जागं करणारी सूचना होती. विकसनशील जगातल्या अब्जावधी लोकांना रोग-निदान, औषधं, वैद्यकीय उपकरणं, लसी आणि अन्य गोष्टींची गरज होती. तरीही, त्यांना त्यांच्या नशीबावर सोडलं गेलं. संकट काळात एकमेकांना मदत करण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायामध्ये संस्थात्मक दृष्टीकोनाची आवश्यकता आहे. संयुक्त राष्ट्रांसारख्या जागतिक संस्था, प्रत्येक प्रदेशातल्या वंचित घटकापर्यंत संसाधनं पोहोचवण्याच्या कामाचं नेतृत्व करू शकतील. हवामान बदलाचा सामना करताना देखील, एकमेकांचं सहाय्य आणि तंत्रज्ञानाचं हस्तांतरण महत्वाचं आहे. आपण एकाच ग्रहावर राहतो. मला खात्री आहे की आपण आपल्या ग्रहाचं रक्षण करण्यासाठी देखील सर्वोत्तम पद्धती शेअर करू शकतो. भू-स्थानिक तंत्रज्ञान आपल्याला देत असलेल्या शक्यता अनंत आहेत. शाश्वत शहरी विकास, आपत्तींचं व्यवस्थापन आणि त्या अगदी कमी करणे, हवामान बदलाच्या प्रभावाचा मागोवा घेणे, वन व्यवस्थापन, जल व्यवस्थापन, वाळवंटीकरण थांबवणे, अन्न सुरक्षा, आणि बरंच काही,  भू-स्थानिक तंत्रज्ञानाद्वारे आपण आपल्या ग्रहासाठी करू शकतो. अशा महत्वाच्या क्षेत्रांमधल्या घडामोडींवर चर्चा करण्यासाठी, ही परिषद एक व्यासपीठ ठरावी, अशी माझी इच्छा आहे.

मित्रहो,

दुसरी संयुक्त राष्ट्र जागतिक भू-स्थानिक आंतरराष्ट्रीय काँग्रेस मला आशावादी बनवते. जागतिक भू-स्थानिक उद्योगाचे भागधारक एकत्र आल्याने, धोरणकर्ते आणि शैक्षणिक जग एकमेकांशी संवाद साधत असल्याने, मला विश्वास आहे की ही परिषद जागतिक गावाला एका नवीन भविष्याकडे घेऊन जायला मदत करेल.   

धन्यवाद!  

***

Gopal C/R Agashe/CYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1867006) Visitor Counter : 207