पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

मध्य प्रदेशातील उज्जैन येथील श्री महाकाल लोक येथे महाकाल लोक प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे पंतप्रधानांच्या हस्ते राष्ट्रार्पण


मंदिराच्या गाभाऱ्यात पंतप्रधानांनी केली पूजा अर्चना आणि आरती

वारसा वास्तूंचे संवर्धन आणि जीर्णोद्धार यावर विशेष भर देण्याचे प्रकल्पाचे उद्दिष्ट

एकूण सुमारे 850 कोटी रुपये खर्चाचा हा संपूर्ण प्रकल्प

सध्या दरवर्षी इथे येणाऱ्या 1.5 कोटी भाविकांची संख्या दुप्पट होणे अपेक्षित

Posted On: 11 OCT 2022 9:13PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 11  ऑक्टोबर  2022

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मध्य प्रदेशातील उज्जैन येथील श्री महाकाल लोक येथे महाकाल लोक प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे राष्ट्रार्पण केले.

नंदीद्वार येथून श्री महाकाल लोक येथे आगमन झाले तेव्हा पंतप्रधानांनी पारंपारिक धोतर परिधान केले होते. मंदिराच्या  गाभाऱ्यात आल्यानंतर पंतप्रधानांनी मंदिरातील  पुजाऱ्यांच्या उपस्थितीत पूजा अर्चना केली आणि  दर्शन घेतले तसेच  भगवान श्री महाकाल यांच्यापुढे हात जोडून प्रार्थना केली. आरती केल्यानंतर आणि पुष्पांजली अर्पण केल्यानंतर, पंतप्रधान  गाभाऱ्याच्या दक्षिण कोपऱ्यात बसले आणि मंत्रोच्चार करत ध्यानस्थ झाले. पंतप्रधानांनी  नंदीच्या पुतळ्याजवळ बसूनही  नमस्कार करून प्रार्थना केली.

पंतप्रधानांनी श्री महाकाल लोक प्रकल्पाच्या  राष्ट्रार्पणाच्या  फलकाचे अनावरण केले. पंतप्रधानांनी मंदिरातील संतांचीही भेट घेऊन त्यांच्याशी थोडक्यात संवाद साधला.त्यानंतर पंतप्रधानांनी महाकाल लोक मंदिर संकुलाला  भेट दिली आणि फेरफटका मारला तसेच  सप्तऋषी मंडळ, मंडपम, त्रिपुरासुर वध आणि नवगड यांची पाहणी केली. शिवपुराणातील सृष्टी निर्मिती , गणेशाचा जन्म, सती आणि दक्षाची कथा आणि इतर कथांवर आधारित या मार्गावर असणारी  भित्तीचित्रेही पंतप्रधानांनी पाहिली.  मोदी यांनी त्यानंतर यानिमिताने सादर करण्यात आलेला  सांस्कृतिक कार्यक्रम पाहिला आणि मानसरोवर  येथे सादर  मलखांब प्रात्यक्षिकांचे ते साक्षीदार झाले. यानंतर भारत माता मंदिरात त्यांनी दर्शन घेतले. मध्य प्रदेशचे राज्यपाल मंगुभाई पटेल, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान तसेच केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया हे देखील यावेळी पंतप्रधानांसोबत उपस्थित होते.

पार्श्वभूमी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशातील उज्जैन येथे श्री महाकाल लोक येथे महाकाल लोक प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण केले. पहिल्या टप्प्यातील महाकाल लोक प्रकल्प कार्यामुळे मंदिराला भेट देणाऱ्या यात्रेकरूंना जागतिक दर्जाच्या सुविधांचा पुरवठा करून त्यांना यात्रेचा अधिक समृध्द अनुभव देण्यात मदत होईल. मंदिराच्या संपूर्ण परिसरातील गर्दी कमी करणे तसेच या ठिकाणी असलेल्या ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाच्या वारसा संरचनांचे जतन तसेच जीर्णोद्धार करण्यावर विशेष भर देणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. या प्रकल्पाअंतर्गत मंदिराच्या सीमांचा सात पटीने विस्तार होणार आहे. या संपूर्ण प्रकल्पाच्या कामाला सुमारे 850 कोटी रुपये खर्च येणार आहे. सद्यस्थितीला या मंदिरात दर वर्षी सुमारे दीड कोटी भाविक भेट देतात. प्रकल्पांचे काम पूर्ण झाल्यावर ही संख्या दुप्पट होईल अशी अपेक्षा आहे. या प्रकल्पाचे विकासकार्य दोन टप्प्यांमध्ये नियोजित करण्यात आले आहे.

महाकाल पथ या ठिकाणी 108 स्तंभ असून त्यावर भगवान शिवाच्या आनंद तांडव स्वरूपातील नृत्यमुद्रा कोरलेल्या आहेत.महाकाल पथाच्या आजूबाजूला भगवान शंकर यांच्या जीवनाचे दर्शन घडविणाऱ्या विविध धार्मिक शिल्पांची उभारणी करण्यात आली आहे. या मार्गालगत उभारलेल्या भिंतीवर विश्वाची निर्मिती, गणेश जन्म, सती आणि दक्षा यांच्या कहाण्या इत्यादी शिव पुराणातील कथा सांगणारी भित्तीचित्रे आहेत. अडीच हेक्टरवर पसरलेल्या या संकुलाच्या चहुबाजूंना कमळे असलेले तलाव आहेत आणि त्या तलावात भगवान शंकराच्या शिल्पासह कारंजी देखील बसविण्यात आली आहेत. कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञान तसेच सर्व्हिलन्स कॅमेरांच्या मदतीने एकात्मिक आदेश तसेच नियंत्रण केंद्रांद्वारे या संपूर्ण परिसरावर अहोरात्र लक्ष ठेवण्यात येणार आहे.

 

  

S.Patil/Sonal C/Sanjana/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1866936) Visitor Counter : 300