पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी अहमदाबाद मधील आसरवा नागरी रुग्णालयात सुमारे 1275 कोटी रुपये खर्चाच्या विविध आरोग्य सुविधांची पायाभरणी आणि लोकार्पण केले
"जनतेच्या समस्यांबाबत सरकारच्या मनात आणि हेतूमध्ये चिंता नसेल तर आरोग्यविषयक योग्य पायाभूत सुविधांची निर्मिती शक्य नाही"
"गुजरातमध्ये काम आणि कामगिरी एवढी आहे की अनेकदा त्यांची मोजदाद करणेही कठीण होते"
"आज सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास सरकार गुजरातसाठी अविरत काम करत आहे"
"जेव्हा सरकार संवेदनशील असते, तेव्हा दुर्बल घटक आणि समाजातील माता-भगिनींसह संपूर्ण समाजालाच सर्वात जास्त लाभ होतो "
प्रविष्टि तिथि:
11 OCT 2022 6:41PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 ऑक्टोबर 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबाद मधील आसरवा नागरी रुग्णालयात सुमारे 1275 कोटी रुपये खर्चाच्या विविध आरोग्य सुविधांची पायाभरणी आणि लोकार्पण केले.
कार्यक्रमस्थळी आगमन झाल्यानंतर पंतप्रधानांनी आरोग्य विषयक पायाभूत सुविधा प्रकल्पांची माहिती घेतली. यानंतर पंतप्रधानांचे व्यासपीठावर आगमन झाले जिथे त्यांचा सत्कार करण्यात आला.
पंतप्रधानांनी फलकाचे अनावरण केले आणि (i) मंजुश्री मिल संकुलातील इन्स्टिट्यूट ऑफ किडनी डिसीजेस रिसर्च सेंटर (IKDRC) (ii) आसरवा नागरी रुग्णालय परिसरातील गुजरात कर्करोग संशोधन संस्थेची रुग्णालय इमारत 1C, (iii) यूएन मेहता रुग्णालय येथे वसतिगृह (iv) गुजरात डायलिसिस कार्यक्रमाचा विस्तार एक राज्य एक डायलिसिस (v) गुजरात राज्यासाठी केमो कार्यक्रम इत्यादींचे लोकार्पण केले.
त्यानंतर पंतप्रधानांनी (i) न्यू मेडिकल कॉलेज, गोध्रा (ii) सोला येथील जीएमईआरएस मेडिकल कॉलेजचे नवीन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, (iii) आसरवा नागरी रुग्णालय येथे मेडिकल गर्ल्स कॉलेज (iv) आसरवा नागरी रुग्णालय येथे रुग्णांसोबत येणाऱ्या कुटुंबियांसाठी रेन बसेरा सुविधा , भिलोडा येथे 125 खाटांचे जिल्हा रुग्णालय, (vi) अंजार येथे 100 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाची पायाभरणी केली.
पंतप्रधानांनी मोरवा हडफ, जीएमएलआरएस जुनागढ आणि सीएचसी वाघई येथील समाज आरोग्य केंद्रातील रुग्णांशी संवाद साधला.
उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की गुजरातमध्ये आरोग्यासाठी आज मोठा दिवस आहे आणि हे प्रकल्प वेळेत पूर्ण केल्याबद्दल या प्रकल्पांशी संबंधित प्रत्येकाचे त्यांनी अभिनंदन केले. जगातील सर्वात प्रगत वैद्यकीय तंत्रज्ञान, सुधारित लाभ आणि वैद्यकीय पायाभूत सुविधा गुजरातच्या जनतेला उपलब्ध करून दिल्या जातील आणि त्यातून समाजाला फायदा होईल, असे मोदींनी नमूद केले. पंतप्रधान म्हणाले की या वैद्यकीय लाभांच्या उपलब्धतेमुळे,ज्यांना खाजगी रुग्णालये परवडत नाहीत ते आता या सरकारी रुग्णालयांमध्ये जाऊ शकतात जिथे तातडीने सेवा देण्यासाठी वैद्यकीय पथके तैनात केली जातील. सुमारे साडेतीन वर्षांपूर्वी 1200 खाटांच्या सुविधेसह माता आणि बाल आरोग्य संबंधी सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे उद्घाटन करण्याची संधी मिळाली होती अशी आठवण पंतप्रधानांनी सांगितली. इन्स्टिट्यूट ऑफ किडनी डिसीज आणि यू एन मेहता इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओलॉजीची क्षमता आणि सेवा देखील वाढवण्यात येत असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. गुजरात कर्करोग संशोधन संस्थेच्या नवीन इमारतीत अत्याधुनिक बोन मॅरो प्रत्यारोपणासारख्या सुविधाही सुरू होत आहेत. "हे देशातील पहिले सरकारी रुग्णालय असेल जेथे सायबर-शस्त्रक्रिया सारखे अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध असेल", असे ते म्हणाले. गुजरात वेगाने विकासाची नवी उंची गाठत असल्याचे पंतप्रधान म्हणाले. विकासाचा वेग गुजरातसारखा आहे, काम आणि कामगिरी इतकी आहे की त्यांची मोजदाद करणेही कठीण होते, असे त्यांनी नमूद केले.
20-25 वर्षांपूर्वी गुजरातमधील व्यवस्थेतील त्रुटींकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले. आरोग्य क्षेत्रातील मागासलेपणा, शिक्षण क्षेत्रातील ढिसाळपणा, विजेची टंचाई, प्रशासनातील अव्यवस्था आणि कायदा आणि सुव्यवस्थेच्या समस्यांची यादीच त्यांनी सांगितली. यात सर्वात मोठा आजार होता, मतपेढीचे राजकारण. गुजरात आज त्या सर्व आजारांना मागे टाकून पुढे जात आहे. हायटेक रुग्णालयाचा विचार केला तर गुजरात आज अव्वल स्थानावर आहे. शैक्षणिक संस्थांचा विचार केला तर आज गुजरातशी कोणीही बरोबरी करु शकत नाही. गुजरात पुढे जात आहे आणि विकासाचे नवे मार्ग विस्तारत आहे, असेही ते म्हणाले. त्याचप्रमाणे गुजरातमध्ये पाणी, वीज आणि कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती कमालीची सुधारली आहे. "आज सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास सरकार गुजरातसाठी अथक प्रयत्न करत आहे असे मोदी म्हणाले "
आज अनावरण करण्यात आलेल्या आरोग्य पायाभूत सुविधा प्रकल्पांनी गुजरातला एक नवीन ओळख दिली आहे आणि हे प्रकल्प गुजरातच्या लोकांच्या क्षमतांचे प्रतीक आहेत, असे पंतप्रधान म्हणाले. चांगल्या आरोग्य सुविधांसोबतच जगातील सर्वोच्च वैद्यकीय सुविधा आता आपल्या राज्यात सातत्याने वाढत आहेत यामुळे गुजरातमधील जनतेचा ऊर अभिमानाने भरुन येईल असे ते म्हणाले.
यामुळे गुजरातच्या वैद्यकीय पर्यटन क्षमतेलाही हातभार लागेल.
चांगल्या आरोग्याच्या पायाभूत सुविधांसाठी हेतू आणि धोरणे या दोन्हींमध्ये एकरूपता आवश्यक आहे यावर पंतप्रधानांनी भर दिला. "सरकारला लोकांबद्दल काळजी नसेल, तर आरोग्यासाठी योग्य पायाभूत सुविधा निर्माण करणे शक्य नाही", असे ते म्हणाले. समग्र दृष्टिकोनातून प्रयत्न केले जातात तेव्हा त्यांचे परिणाम तितकेच बहुआयामी असतात, याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले. "हा गुजरातचा यशाचा मंत्र आहे", ते म्हणाले. वैद्यकीय शास्त्रातील कृती साधर्म्यनामांचा संदर्भ देत , पंतप्रधानांनी सांगितले की, त्यांनी मुख्यमंत्री म्हणून 'शस्त्रक्रिया' केली म्हणजेच जाणीवपूर्वक आणि सामर्थ्याच्या माध्यमातून जुन्या अप्रासंगिक व्यवस्था संपुष्टात आणल्या . दुसरे 'औषध' म्हणजे प्रणाली बळकट करण्यासाठी सतत नवीन शोध, तिसरा 'उपचार ' म्हणजेच आरोग्य व्यवस्थेच्या विकासासाठी संवेदनशीलतेने काम करणे.जनावरांचीही काळजी घेणारे गुजरात हे पहिले राज्य असल्याचे त्यांनी सांगितले. आजार आणि महामारीचे स्वरूप पाहता एक पृथ्वी एक आरोग्य अभियानाला बळकटी देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. सरकारने काळजीपूर्वक काम केले याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले."आम्ही लोकांमध्ये गेलो, त्यांची स्थिती जाणून घेतली", असे त्यांनी सांगितले. जेव्हा व्यवस्था सुदृढ झाली तेव्हा गुजरातचे आरोग्य क्षेत्रही निकोप झाले आणि देशात गुजरातचे उदाहरण दिले जाऊ लागले, असे पंतप्रधानांनी लोकसहभागातून लोकांना एकत्र जोडून करण्यात आलेल्या प्रयत्नांची माहिती देताना सांगितले.
गुजरातकडून शिकलेल्या गोष्टी केंद्र सरकारमध्ये लागू केल्याचा पुनरुच्चार पंतप्रधानांनी केला. गेल्या 8 वर्षात केंद्र सरकारने देशाच्या विविध भागात 22 नवीन एम्स सुरु केले असून गुजरातलाही याचा फायदा झाला असल्याची माहिती त्यांनी दिली."गुजरातला राजकोटमध्ये पहिले एम्स मिळाले", असे मोदी यांनी सांगितले. गुजरातमध्ये आरोग्य क्षेत्रात केलेल्या कामाचा आढावा घेत, जेव्हा गुजरात वैद्यकीय संशोधन, जैव तंत्रज्ञान संशोधन आणि औषधांसंबंधी संशोधनात उत्कृष्ट कामगिरी करेल आणि जागतिक स्तरावर स्वतःचे नाव कमवेल, तो दिवस दूर नाही याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले.
जेव्हा सरकार संवेदनशील असते, तेव्हा त्याचा सर्वाधिक फायदा दुर्बल घटक आणि माता-भगिनींसह समाजाला होतो, असे पंतप्रधानांनी नमूद केले. बालमृत्यू दर आणि माता मृत्यू दर राज्यासाठी गंभीर चिंतेचा विषय होता आणि मागील सरकारांनी अशा दुर्दैवी घटनांसाठी नियतीला जबाबदार धरले होते, त्या काळाची आठवण करून देत, आमच्या सरकारनेच आमच्या माता आणि बालकांसाठी भूमिका घेतली, असा टोला पंतप्रधानांनी लगावला. “गेल्या वीस वर्षांत”, आम्ही आवश्यक धोरणे तयार केली आणि ती लागू केली त्यामुळे मृत्यूदरात मोठी घट झाली.”, असे मोदी यांनी सांगितले. ‘बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान’ अधोरेखित करत, आता नवजात मुलांच्या संख्येपेक्षा मुलींच्या जन्माची संख्या अधिक आहे,असे पंतप्रधानांनी नमूद केले. या यशाचे श्रेय पंतप्रधानांनी गुजरात सरकारच्या ‘चिरंजीवी’ आणि ‘खिलखिलाहट ’ या धोरणांना दिले.गुजरातचे यश आणि प्रयत्न केंद्र सरकारच्या ‘इंद्रधनुष’ आणि ‘मातृ वंदना’ यांसारख्या अभियानांना मार्ग दाखवत आहेत, असे मोदी यांनी सांगितले. आजच्या कार्यक्रमातील भाषण संपविताना पंतप्रधान मोदी यांनी गरीब तसेच गरजू नागरिकांच्या उपचारासाठी सुरु करण्यात आलेल्या आयुष्मान भारत सारख्या योजनांकडे निर्देश केला. दुहेरी इंजिन असलेल्या सरकारची ताकद विस्तृतपणे विषद करताना पंतप्रधान म्हणाले की, आयुष्मान भारत आणि मुख्यमंत्री अमृतम योजना यांच्या संयोजनाने गुजरातमध्ये गरिबांच्या आरोग्यविषयक गरजा पूर्ण करत आहे. “आरोग्य आणि शिक्षण ही फक्त दोनच क्षेत्रे अशी आहेत जी केवळ वर्तमानच नव्हे तर भविष्याची दिशा देखील ठरवितात.” वर्ष 2019 मध्ये सुरु केलेल्या 1200 खतांची सुविधा असलेल्या शहरी रुग्णालयाचे उदाहरण देऊन पंतप्रधान मोदी म्हणाले की, हेच रुग्णालय सर्वात मोठे आरोग्य केंद्र म्हणून उदयास आले आणि दोन वर्षांनी उद्भवलेल्या कोविड महामारीच्या आपत्तीदरम्यान या केंद्राने जनतेची मोठी सेवा केली. “त्या एका आरोग्यविषयक पायाभूत सुविधेने कोविड महामारीमध्ये हजारो रुग्णांचे प्राण वाचविले,” ते पुढे म्हणाले.आरोग्य क्षेत्राची सध्याची परिस्थिती सुधारण्यावर आणि उत्तम भविष्यकाळाची उभारणी करण्याच्या गरजेवर भर देत पंतप्रधानांनी त्यांचे भाषण संपविले. “तुम्ही सर्व जण आणि तुमचे कुटुंबीय सर्व प्रकारच्या आजारांपासून मुक्त राहावेत अशी सदिच्छा मी व्यक्त करतो,” पंतप्रधान मोदी म्हणाले.
गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, संसद सदस्य सीआर पाटील, नरहरी अमीन, किरीटभाई सोळंकी आणि हसमुखभाई पटेल यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.
पार्श्वभूमी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबाद जिल्ह्यातील आसरवा नागरी रुग्णालयात 1275 कोटी रुपये खर्चून उभारल्या जाणाऱ्या विविध आरोग्यसेवा सुविधांची कोनशिला रचली आणि या कामाचे लोकार्पण केले. उपचारासाठी येथे येणाऱ्या गरीब रुग्णांच्या कुटुंबियांसाठी बांधण्यात येणाऱ्या निवारा गृहांच्या बांधकामाची कोनशिला देखील त्यांनी रचली. पंतप्रधानांनी यावेळी,यूएनमेहता हृदयरोग संस्था आणि संशोधन केंद्रासाठी निर्माण केलेल्या नव्या आणि सुधारित हृदयरोग उपचार सुविधा, मूत्रपिंड रोगावरील उपचार संस्था आणि संशोधन केंद्राची नवी रुग्णालय इमारत आणि गुजरात कर्करोग उपचार आणि संशोधन संस्थेच्या नव्या इमारतीचे लोकार्पण देखील पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आले.
S.Patil/Sushama/Vinayak/Sonal C/Sanjana/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1866890)
आगंतुक पटल : 273
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam