पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक भूस्थानिक आंतरराष्ट्रीय परिषदेला संबोधित केले
"संकटाच्या काळात एकमेकांना मदत करण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाने संस्थात्मक दृष्टीकोन अवलंबणे आवश्यक आहे"
"कुणीही मागे राहणार नाही याची भारत काळजी घेत आहे."
भारतात तंत्रज्ञान हे नागरिकांना वगळण्याचे माध्यम नाही तर समावेशाचे माध्यम आहे”
भारत हे युवा राष्ट्र आहे जिथे नवोन्मेषाची प्रबळ भावना आहे
प्रविष्टि तिथि:
11 OCT 2022 4:44PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 ऑक्टोबर 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक भू-स्थानिक आंतरराष्ट्रीय परिषदेला व्हिडिओ संदेशाद्वारे संबोधित केले. आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींचे स्वागत करताना पंतप्रधान म्हणाले की, "या ऐतिहासिक प्रसंगी तुमचे स्वागत करताना भारतातील लोकांना आनंद होत आहे कारण आपण सर्वजण एकत्रितपणे आपले भविष्य घडवत आहोत."हैदराबाद येथे होत असलेल्या या परिषदेबद्दल आनंद व्यक्त करताना पंतप्रधान म्हणाले की हे शहर तिथली संस्कृती आणि खाद्यपदार्थ , आदरातिथ्य आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानासाठी ओळखले जाते.
'जगाला भू-सक्षम बनवणे : कुणीही मागे राहता कामा नये' ही परिषदेची संकल्पना असून भारताने गेल्या काही वर्षांत जी पावले उचलली आहेत त्यात त्याचे प्रत्यंतर येते याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले. "आम्ही अंत्योदयाच्या कल्पनेवर काम करत आहोत ज्याचा अर्थ विकासाच्या बाबतीत शेवटच्या मैलावरील शेवटच्या व्यक्तीला मिशन मोडमध्ये सशक्त बनवणे हा आहे " असे ते म्हणाले. 450 दशलक्ष लोक, अमेरिकेच्या लोकसंख्येपेक्षा अधिक लोक, ज्यांच्याकडे बँकिंग सुविधा नव्हती, त्यांना बँकिंग व्यवस्थेशी जोडण्यात आले आणि 135 दशलक्ष लोक, म्हणजेच फ्रान्सच्या लोकसंख्येच्या दुप्पट लोकांना विमा देण्यात आला, असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले. "कोणीही मागे राहणार नाही हे भारत सुनिश्चित करत आहे." हे अधोरेखित करत ते म्हणाले की 110 दशलक्ष कुटुंबांपर्यंत स्वच्छता सुविधा पुरवण्यात आल्या आणि 60 दशलक्ष पेक्षा अधिक कुटुंबांना नळाद्वारे पाण्याची जोडणी देण्यात आली.
तंत्रज्ञान आणि प्रतिभा हे दोन स्तंभ भारताच्या विकासाच्या वाटचालीची गुरुकिल्ली आहेत. तंत्रज्ञानामुळे परिवर्तन घडते, असे सांगत पंतप्रधानांनी जेएएम त्रिसूत्रीचे उदाहरण दिले, ज्याने 800 दशलक्ष लोकांना अखंडपणे कल्याणकारी लाभ पोहचवले आहेत आणि जगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेला बळ देणार्या तंत्रज्ञान मंचाचेही उदाहरण दिले. भारतात तंत्रज्ञान हे बहिष्काराचे माध्यम नाही. तर ते समावेशाचे माध्यम आहे,”असे मोदी म्हणाले.
पंतप्रधानांनी समावेश आणि प्रगतीला चालना देण्यात भौगोलिक तंत्रज्ञानाची भूमिका अधोरेखित केली. स्वामित्त्व आणि गृहनिर्माण यांसारख्या योजनांमध्ये तंत्रज्ञानाची भूमिका तसेच मालमत्तेची मालकी आणि महिला सक्षमीकरणाच्या परिणामांचा संयुक्त राष्ट्रांच्या गरीबी आणि लैंगिक समानतेबाबतच्या शाश्वत विकास उद्दिष्टांवर थेट प्रभाव पडतो यावर पंतप्रधानांनी भर दिला. पंतप्रधान पुढे म्हणाले की पंतप्रधान गतिशक्ती महायोजना हा डिजिटल महासागरी मंच असल्यामुळे या योजनेला भू-अवकाशीय तंत्रज्ञानाचे पाठबळ मिळाले आहे. भारताच्या शेजारी देशांमध्ये संपर्क सुविधा पुरविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या दक्षिण आशियाई उपग्रहाचे उदाहरण देत पंतप्रधान म्हणाले की भारताने यापूर्वीच भू-अवकाशीय तंत्रज्ञानाचा सामायिक पद्धतीने वापर कसा करावा याचे उदाहरण सर्वांसमोर ठेवले आहे.
“भारत हा तरुण देश असून येथे अभिनव संशोधनाची प्रेरणा मोठ्या प्रमाणात दिसून येते,” भारताच्या प्रगतीच्या प्रवासातील बुद्धीमत्ता या दुसऱ्या आधारस्तंभाची भूमिका स्पष्ट करत पंतप्रधान म्हणाले. भारत हा जगातील आघाडीच्या स्टार्ट-अप कंपन्यांच्या केंद्रांपैकी एक आहे असे सांगून ते पुढे म्हणाले की वर्ष 2021 पासून आतापर्यंत देशातील युनिकॉर्न प्रकारच्या स्टार्ट-अप उद्योगांची संख्या दुप्पट झाली असून आणि ही प्रगती भारतातील युवा प्रतीभेचीच साक्ष देते.
आपल्याला मिळणाऱ्या अनेक सर्वात महत्त्वाच्या स्वातंत्र्याच्या प्रकारांपैकी नवोन्मेष करण्याचे स्वातंत्र्य हा एक प्रकार आहे असे पंतप्रधानांनी सांगितले आणि हे स्वातंत्र्य भू-अवकाशीय क्षेत्रासाठी सुनिश्चित करण्यात आले आहे. भू-अवकाशीय माहितीचे संकलन, उत्पादन तसेच डिजिटलीकरण या प्रक्रियांचे आता लोकशाहीकरण करण्यात आले आहे अशी माहिती त्यांनी पुढे दिली. ड्रोन क्षेत्राला दिलेली चालना तसेच खासगी क्षेत्राच्या सहभागासाठी अवकाश क्षेत्र खुले करणे यांसह भारतात 5 जी प्रणालीची सुरुवात होण्यासोबतच अशा प्रकारच्या सुधारणा संलग्न करण्यात आल्या आहेत.
पंतप्रधान मोदी यांच्या मतानुसार, कोविड-19 महामारी हा प्रत्येकालाच सहभागासह देण्यात आलेला सतर्कतेचा इशारा आहे. आपत्तीच्या काळात, एकमेकांना मदत करण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाने संस्थात्मक दृष्टीकोन स्वीकारण्याची गरज आहे यावर त्यांनी भर दिला. “प्रत्येक क्षेत्रात उपलब्ध साधनसंपत्ती समाजातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचविण्याच्या कार्याचे नेतृत्व संयुक्त राष्ट्रांसारख्या जागतिक संघटनांनी केले पाहिजे,” ते ठामपणे म्हणाले. भागीदारी आणि तंत्रज्ञान हस्तांतरण हे घटक देखील हवामान बदलाच्या दुष्परिणामांशी लढण्यात महत्त्वाचे आहेत असे सांगून पंतप्रधान पुढे म्हणाले की आपल्या वसुंधरेला वाचविण्यासाठी ज्या सर्वोत्तम पद्धती असतील त्यांची माहिती सामायिक केली पाहिजे.
भू-अवकाशीय तंत्रज्ञानामुळे निर्माण होणाऱ्या अगणित शक्यता पंतप्रधानांनी अधोरेखित केल्या. त्यामध्ये शाश्वत शहरी विकास, आपत्तीचे व्यवस्थापन आणि उपशमन, हवामान बदलाच्या दुष्परिणामांचा मागोवा घेणे, वन व्यवस्थापन, जल व्यवस्थापन, वाळवंटीकरण थांबविणे आणि अन्न सुरक्षा यांचा समावेश आहे. अशा महत्त्वाच्या क्षेत्रांमधील घडामोडींबाबत चर्चा होण्यासाठीचा मंच म्हणून या परिषदेने कार्य करावे अशी इच्छा पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या शेवटी, पंतप्रधानांनी त्यांच्या मनातील आशा व्यक्त केली. “जागतिक भू-अवकाशीय उद्योगातील सर्व भागधारकांनी एकत्र येण्यातून, धोरणकर्ते तसेच शिक्षण क्षेत्राने एकमेकांशी संवाद साधण्यातून, जागतिक स्वरूपातील गावाला नव्या भविष्यात पाऊल ठेवण्यासाठी ही परिषद मार्गदर्शन करेल असा मला विश्वास वाटतो,” ते पुढे म्हणाले.
S.Patil/Sushama/Sanjana/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1866829)
आगंतुक पटल : 229
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Bengali
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam