पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी गुजरातमधील अहमदाबाद येथे मोदी शैक्षणिक संकुलाच्या पहिल्या टप्प्याचे केले उद्घाटन

Posted On: 10 OCT 2022 8:52PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 10 ऑक्‍टोबर 2022

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधील अहमदाबाद येथे मोदी शैक्षणिक संकुल या गरजू विद्यार्थ्यांसाठीच्या  शैक्षणिक संकुलाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले. हा प्रकल्प विद्यार्थ्यांसाठी  सर्वांगीण विकासाकरिता आवश्यक  सुविधा उपलब्ध करून देण्यास मदत करेल.

पंतप्रधानांनी फित  कापून भवनाचे उद्घाटन केले. दीपप्रज्वलन करून त्यांनी भवनाची पाहणीही केली.

यावेळी झालेल्या मेळाव्याला त्यांनी संबोधित केले. काल माता  मोढेश्वरीचे दर्शन आणि पूजा करण्याचे भाग्य मिळाले, असे पंतप्रधान म्हणाले.  जनरल करिअप्पा यांनी सांगितलेल्या एक रंजक गोष्टीची आठवण  पंतप्रधानांनी  करून दिली. ते म्हणाले की जनरल करिअप्पा कुठेही गेले, प्रत्येकजण त्यांना आदराने अभिवादन करत असे, परंतु  त्यांच्या गावातील लोकांनी एका समारंभात त्यांचा सत्कार केला तेव्हा  वेगळाच आनंद आणि समाधान त्यांना अनुभवायला मिळाले. या घटनेशी साधर्म्य साधत पंतप्रधानांनी त्यांच्या समाजाने त्यांना  दिलेल्या आशीर्वादाबद्दल सर्वांचे आभार मानले. हा प्रकल्प  प्रत्यक्षात आणल्याबद्दल आणि शिक्षणाला प्राधान्य दिल्याबद्दल पंतप्रधानांनी समाजाच्या सदस्यांचे अभिनंदन केले. “वेळ जुळून येत नाही  हे खरे, पण तुम्ही ध्येय सोडले नाही आणि सर्वांनी एकत्र येऊन या कामाला प्राधान्य दिले”, असेही ते म्हणाले.

त्यांच्या समाजातील लोकांना जेव्हा प्रगतीच्या अल्प संधी होत्या त्या दिवसांचे स्मरण करून पंतप्रधान म्हणाले, ''आज आपण समाजातील  लोक आपापल्या परीने पुढे येताना पाहू शकतो''. शिक्षणाची व्यवस्था उभारण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम केले आणि हा सामूहिक प्रयत्न समाजाची ताकद आहे, याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले. “मार्ग योग्य आहे आणि या मार्गानेच समाजाचे कल्याण होऊ शकते” असे प्रतिपादन त्यांनी केले.  “एक समाज म्हणून ते त्यांच्या समस्या सोडवतात, अपमानावर मात करतात, कोणाच्या आड येत नाहीत,ही खूप अभिमानाची गोष्ट आहे,'' असे ते म्हणाले.  कलियुगात समाजातील प्रत्येकजण संघटित होऊन आपल्या भविष्याचा विचार करत असल्याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला.

पंतप्रधानांनी आपल्या समाजाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि सांगितले की त्यांना समाजाचे ऋण फेडायचे आहेत.  या समाजाचा मुलगा प्रदीर्घ काळ गुजरातचा मुख्यमंत्री राहिला असेल, आणि आता दुसऱ्यांदा देशाचा पंतप्रधान झाला असेल, पण आपल्या जबाबदारीच्या प्रदीर्घ कार्यकाळात,  या समाजातील एकही व्यक्ती त्यांच्याकडे वैयक्तिक कामासाठी आला  नाही,असे त्यांनी सांगितले. त्यांनी  समाजाच्या संस्काराकडे लक्ष वेधले आणि त्यांना आदरपूर्वक अभिवादन केले.

सध्याच्या काळात अधिकाधिक तरुण वैद्यकीय, अभियांत्रिकी आणि अशाच इतर महत्त्वाच्या अभ्यासक्रमांवर लक्ष केंद्रित करत आहेत याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी आनंद व्यक्त केला. कौशल्य विकासाच्या मुद्द्यावर अधिक भर देत पंतप्रधानांनी अपत्याचे शिक्षण पूर्ण करताना पालकांना सोसाव्या लागणाऱ्या त्रासाबाबत चर्चा केली आणि पालकांनी मुलांना कौशल्य विकासासाठी तयार करावे असा सल्ला दिला. ते म्हणाले की कौशल्य विकास मुलांना अशा प्रकारे समर्थ बनवितो की  नंतर त्यांना आयुष्याच्या मार्गावर मागे वळून पाहावे लागत नाही. पंतप्रधान पुढे म्हणाले, “काळ बदलतो आहे, मित्रांनो, केवळ पदवी धारण करणाऱ्यांपेक्षा अधिक कौशल्य धारण करणाऱ्यांच्या सामर्थ्याला प्रोत्साहन देण्याची गरज आहे.”

सिंगापूरच्या अधिकृत भेटीदरम्यान त्या देशाच्या पंतप्रधानांशी झालेल्या चर्चेचे स्मरण करून पंतप्रधान मोदी म्हणाले की, सिंगापूरच्या पंतप्रधानांनी स्वतः उभारलेल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला भेट देण्याचा आग्रह त्यावेळी धरला होता. त्या संस्थेला भेट दिल्यानंतर तेथे दिसून आलेल्या आधुनिकतेची आठवण काढून पंतप्रधान मोदी म्हणाले की, या संस्थेची स्थापना झाल्यानंतर आता परिस्थिती अशी आहे की अनेक श्रीमंत लोकदेखील तेथे प्रवेश घेण्यासाठी रांगेत उभे असतात. पंतप्रधान पुढे म्हणाले की, समाजाने त्याचे महत्त्व जाणवून दिले आहे आणि आता आपली मुले देखील त्यात सहभागी होऊन त्याचा अभिमान बाळगतील.

श्रमाची ताकद अफाट असते आणि आपल्या समाजाचा फार मोठा भाग श्रमिक वर्गातील लोकांचा आहे अशी टिप्पणी भाषणाच्या शेवटी पंतप्रधान मोदी यांनी केली. “श्रमिकांबद्दल अभिमान बाळगा,” असे ते म्हणाले. आपल्या समाजातील सदस्यांनी समाजाला त्रास होईल अशी गोष्ट कधीही केली नाही तसेच दुसऱ्या समाजातील लोकांबाबत काही वाईट कृत्य  केले नाही याचा  अभिमान आहे असे ते म्हणाले. “मला खात्री आहे की येणारी पिढी अधिक अभिमानाने प्रगती करेल याबाबत आपण प्रयत्नशील राहू,” पंतप्रधान मोदी यांनी समारोप करताना  सांगितले.

गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, संसद सदस्य सी.आर.पाटील आणि नरहरी अमीन, गुजरात  सरकारमधील मंत्री जितुभाई वाघानी तसेच श्री मोढ वणिक मोदी समाज हितवर्धक विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष प्रवीणभाई चिमणलाल मोदी यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.

 

 

 

 

 

* * *

S.Kane/S.Kakade/S.Chitnis/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1866586) Visitor Counter : 297