सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय
खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने (केव्हीआयसी) नवी दिल्लीतील सीपी विक्री केंद्रात 1.34 कोटी रुपयांची आतापर्यंतची एका दिवसातली सर्वाधिक विक्री नोंदवली
Posted On:
06 OCT 2022 4:37PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 6 ऑक्टोबर 2022
यावर्षी 2 ऑक्टोबर रोजी खादी इंडियाच्या नवी दिल्लीतील सीपी विक्री केंद्राने पुन्हा एकदा एकाच दिवसातील खादी विक्रीचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मंचावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक वेळा खादी आणि ग्रामोद्योग उत्पादने खरेदी करण्याचे आवाहन केले आणि 2014 मध्ये स्थिर गतीने वाटचाल करणाऱ्या या क्षेत्राला चालना देण्याचा उल्लेख केला.
ऑक्टोबर 2016 पासून नवी दिल्लीतील कॅनॉट प्लेस इथल्या खादी इंडियाच्या पथदर्शी विक्री केंद्रातील दिवसातील विक्रीने अनेक वेळा 1.00 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे, हे इथे नमूद करणे देखील महत्वाचे आहे. याचा उल्लेख पंतप्रधानांनी त्यांच्या ‘मन की बात’ या आकाशवाणीवरील कार्यक्रमात सातत्याने केला आहे.
"मन की बात" या आकाशवाणीवरून प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून, खादीचा अवलंब करून सूतकताई करणाऱ्या गरीब कारागिरांना आणि विणकरांना आर्थिकदृष्ट्या बळकट करण्याचा पंतप्रधानांचा संदेश देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला आहे, याचा परिणाम या गांधी जयंतीला म्हणजेच 2 ऑक्टोबर 2022 रोजी झालेल्या विक्रीतून दिसून आला.
नवी दिल्लीतील कॅनॉट प्लेस इथल्या खादी इंडियाच्या प्रदर्शन आणि विक्री केंद्रात एका दिवसात 1.34 कोटी रुपयांची विक्री करण्यात आली आणि या विक्री केंद्राने 2 ऑक्टोबर 2021 रोजी केलेल्या 1.01 कोटी रुपयांच्या विक्रीचा स्वतःचाच विक्रम मोडीत काढला. यापूर्वी, खादीची एका दिवसातील सर्वाधिक विक्री 30 ऑक्टोबर 2021 रोजी 1.29 कोटी रुपये इतकी होती.
केवळ राजकीय नाही तर आर्थिक, सांस्कृतिक आणि सामाजिक कारणांसाठी गांधीजींनी खादी चळवळ उभारली होती. महात्मा गांधी यांचा हाच दृष्टीकोन पुढे नेत आपल्या पंतप्रधानांनी खादी आणि अन्य ग्रामोद्योग उत्पादनांचा जनतेमध्ये प्रचार करण्याचा प्रयत्न केला आहे.
ही आपल्या पंतप्रधानांची लोकप्रियता आणि त्यांच्याबद्दल असलेला लोकांचा आदरही आहे. त्यांच्या एका आवाहनावर भारतातील लोक खादीला पूर्ण पाठिंबा देत आहेत. दिवाळीत लावण्यात येणारे दिवे खरेदी करून गरीब कारागिरांना मदत करण्याच्या त्यांनी केलेल्याआवाहनाला प्रतिसाद मिळाल्यामुळे ते प्रत्यक्षात उतरले आहे.
2 ऑक्टोबरपूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच 25 सप्टेंबर 2022 रोजी, "मन की बात" मध्ये खादी खरेदी करण्याच्या केलेल्या आवाहनाने, ही विक्रमी विक्री साध्य करण्यात मोठी भूमिका बजावली आहे, असे खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या अध्यक्षांनी सांगितले.
यावर प्रतिक्रिया देताना केव्हीआयसीचे अध्यक्ष मनोज कुमार यांनी खादीच्या विक्रीत वाढ झाल्याचे श्रेय पंतप्रधानांकडून सतत मिळत असलेल्या पाठिंब्याला दिले. पंतप्रधानांच्या आवाहनामुळे खादी खरेदीकडे लोकांचा मोठ्या प्रमाणात विशेषत: तरुणांचा कल वाढला आहे, असे त्यांनी सांगितले.
* * *
S.Tupe/S.Chavan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1865623)
Visitor Counter : 243