ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय

जगातील सर्वात मोठा साखर उत्पादक व  सर्वाधिक ग्राहक असलेला देश, म्हणून भारत उदयाला आला आहे,  साखर निर्यातीतही भारत बनला जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश


साखर हंगाम 2021-22 मध्ये  5000 एलएमटीपेक्षा जास्त ऊस उत्पादनाचा विक्रम; इथेनॉल उत्पादनासाठी 35 एलएमटी साखरेचा वापर, साखर कारखान्यांकडून  359 एलएमटी साखरेचे उत्पादन

आतापर्यंतची सर्वाधिक म्हणजे 109.8 एलएमटी साखरेची विक्रमी निर्यात

इथेनॉलच्या विक्रीतून साखर कारखाने/डिस्टिलरीजना  18,000 कोटी रुपयांचे उत्पन्न

Posted On: 05 OCT 2022 5:45PM by PIB Mumbai

 

साखर हंगाम (ऑक्टोबर -सप्टेंबर) 2021-22 मध्ये, देशात 5000 लाख मेट्रिक टन (एलएमटी) पेक्षा जास्त उसाचे विक्रमी उत्पादन झाले.  त्यापैकी सुमारे 3574 एलएमटी  उसाचे गाळप साखर कारखान्यांनी केले आणि सुमारे 394 एलएमटी सुक्रोजचे किंवा नैसर्गिक साखरेचे उत्पादन घेतले. यापैकी 35 एलएमटी साखर इथेनॉल उत्पादनासाठी वळवण्यात आली आणि साखर कारखान्यांकडून  359 एलएमटी साखर तयार करण्यात आली.  यामुळे  भारत हा जगातील सर्वात मोठा साखर उत्पादक आणि सर्वाधिक ग्राहक असलेला तसेच जगातील दुसऱ्या क्रमांकाचा साखर निर्यातदार देश ठरला आहे.

हंगामातील आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे कुठल्याही आर्थिक साहाय्याशिवाय आत्तापर्यंतची सर्वाधिक म्हणजे सुमारे 109.8 एलएमटी इतकी विक्रमी साखर निर्यात झाली.   आधारभूत आंतरराष्ट्रीय किमती आणि भारत सरकारच्या धोरणामुळे भारतीय साखर उद्योगाने हे यश साध्य केले. या निर्यातीतून देशासाठी 40,000 कोटी रुपयांचे परकीय चलन प्राप्त झाले.

साखर हंगाम  2021-22 दरम्यान, साखर कारखान्यांनी 1.18 लाख कोटींहून अधिक किमतीचा ऊस खरेदी केला आणि भारत सरकारकडून कोणतेही आर्थिक सहाय्य (अनुदान) न घेता  1.12 लाख कोटींहून अधिक पैसे चुकते  केले. अशा प्रकारे, साखर हंगामाच्या शेवटी उसाची थकबाकी 6,000 कोटी रुपयांपेक्षा  कमी राहिली जी असे सूचित करते की  उसाची 95% थकबाकी चुकती  झाली आहे. हे देखील उल्लेखनीय आहे की SS 2020-21 साठी, 99.9% पेक्षा जास्त उसाची थकबाकी मंजूर झाली आहे.

इथेनॉलच्या विक्रीतून 2021-22 मध्ये साखर कारखानदार/डिस्टिलरींनी सुमारे  18,000 कोटी रुपयांचा  महसूल कमावला. यामुळे  शेतकऱ्यांची उसाची थकबाकी लवकरात लवकर देण्यात मोठी मदत झाली आहे. उसाची मळी /साखर-आधारित डिस्टिलरीजची इथेनॉल उत्पादन क्षमता वर्षाला  605 कोटी लिटरपर्यंत वाढली आहे आणि पेट्रोलसोबत इथेनॉल मिश्रण  कार्यक्रमांतर्गत 2025 पर्यंत 20% मिश्रणाचे उद्दिष्ट पूर्ण होण्याच्या दिशेने  प्रगती  सुरू आहे.

***

S.Patil/S.Kakade/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1865376) Visitor Counter : 2228