इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
5G सेवेच्या शुभारंभाबरोबरच राज्यांच्या माहिती तंत्रज्ञान मंत्र्यांच्या डिजिटल इंडिया परिषदेचे आयोजन
12 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील माहिती तंत्रज्ञान मंत्र्यांची परिषदेला उपस्थिती, 5G सेवेचे स्वागत, डिजिटल इंडिया उपक्रमांची प्रगती तसेच सर्वोत्तम पद्धतींबाबत दिली माहिती
Posted On:
03 OCT 2022 4:39PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 ऑक्टोबर 2022
सहाव्या भारतीय मोबाईल परिषदेबरोबरच राज्यांच्या माहिती तंत्रज्ञान मंत्र्यांची डिजिटल इंडिया परिषदही 1 ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या दोन्ही परिषदांचे उद्घाटन झाले. रिलायन्स उद्योगाचे मुकेश अंबानी, भारती एंटरप्रायझेसचे सुनील भारती मित्तल, आदित्य बिर्ला समूहाचे कुमार मंगलम बिर्ला असे उद्योग क्षेत्रातील दिग्गज आणि इतर अनेक मान्यवरही या समारंभाला उपस्थित होते. यावेळी 5G सेवेच्या शुभारंभाबरोबरच, प्रदर्शने तसेच शिक्षण, आरोग्य, कामगार सुरक्षा, स्मार्ट शेती अशा विविध क्षेत्रातील 5G सेवेच्या वापरासंबंधी उपक्रमांचाही शुभारंभ करण्यात आला.
भारतीय मोबाईल परिषद 2022 च्या उद्घाटन सत्रानंतर, केंद्रीय रेल्वे, दळणवळण, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या अध्यक्षतेखाली इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान तसेच कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर आणि दळणवळण राज्यमंत्री देवुसिंह चौहान यांच्या उपस्थितीत, राज्यांच्या माहिती तंत्रज्ञान मंत्र्यांची डिजिटल इंडिया परिषद आयोजित करण्यात आली. या परिषदेत आंध्र प्रदेश, आसाम, बिहार, मध्य प्रदेश, गुजरात, गोवा, मणिपूर, उत्तराखंड, तेलंगणा या राज्यांचे तसेच मिझोराम, सिक्कीम आणि पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशांचे माहिती तंत्रज्ञान मंत्री सहभागी झाले. सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील माहिती तंत्रज्ञान सचिव, राज्यांमधील अधिकारी तसेच इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आणि तंत्रज्ञान विभागातील वरिष्ठ अधिकारीसुद्धा परिषदेला उपस्थित होते.
केंद्र आणि राज्य सरकारांचा समावेश असलेल्या डिजिटल इंडियाच्या चमुला देशातील युवकांच्या आणि 1.3 अब्ज लोकांच्या आकांक्षा पूर्ण करायच्या आहेत, असे अश्विनी वैष्णव यांनी आपल्या भाषणात सांगितले. 2026 सालापर्यंत 1 ट्रिलियन डॉलरची डिजिटल अर्थव्यवस्था आणि 1 कोटी डिजिटल नोकऱ्यांचे उद्दिष्ट गाठण्यासाठी रोजगार निर्मितीवर लक्ष केंद्रित केले जात असल्याची माहिती त्यांनी दिली. दूरसंचार विधेयक आणि डिजिटल माहिती सुरक्षा विधेयक आणले जाणार असून त्यासंदर्भातील आपल्या मौलिक सूचना राज्यांनी द्याव्यात, यासाठी त्यांना प्रोत्साहित केले जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
त्यानंतर, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या माहिती तंत्रज्ञान मंत्र्यांनी आपल्या संबंधित राज्यांमध्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांमध्ये डिजिटल इंडिया अंतर्गत संपर्क वाढीसाठी तसेच इलेक्ट्रॉनिक उत्पादन वाढीसाठी केलेले प्रयत्न आणि ई-प्रशासन संबंधी उपक्रमांच्या प्रगतीची माहिती दिली. या परिषदेत त्यांनी संपर्क वाढविण्याबरोबरच, एनआयईएलआयटी, सी-डॅक आणि एसटीपीआयची जास्त केंद्रे सुरू करणे, उदयोन्मुख क्षेत्रांमध्ये उत्कृष्टता केंद्रे सुरू करणे आणि धोरणात्मक बाबींशी संबंधित समस्या सुद्धा मांडल्या.
* * *
S.Tupe/M.Pange/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1864769)
Visitor Counter : 226