पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय

पिस्टन इंजिन विमाने आणि मानवरहित विमानांसाठीचे एव्हीगॅस 100 एलएल या हवाई इंधनाच्या स्वदेशी उत्पादनाच्या वापराचा प्रारंभ- आत्मनिर्भर भारताच्या दिशेने नवे पाऊल


स्वदेशी एव्हीगॅस 100 एलएल इंधन वाचवणार देशाचे मौल्यवान परकीय चलन

इंडियन ऑइल ठरली एव्हीगॅस 100 एलएलचे उत्पादन आणि विपणन करणारी देशातील पहिली तेल विपणन कंपनी

Posted On: 26 SEP 2022 6:15PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 26 सप्‍टेंबर 2022

 

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू आणि गृहनिर्माण आणि नगर विकास मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी आज नागरी विमान वाहतूक आणि रस्ते वाहतूक आणि महामार्ग राज्य मंत्री जनरल (डॉ.) व्ही. के. सिंह (निवृत्त) यांच्या उपस्थितीत पिस्टन इंजिनची विमाने आणि मानवरहित विमानांसाठी बनवण्यात आलेल्या स्वदेशी बनावटीच्या एव्हीगॅस 100 एलएल (AVGAS 100 LL) या हवाई इंधनाच्या वापराचा प्रारंभ केला. भारतात सध्या या इंधनाची युरोपियन देशांमधून आयात होते. इंडियन ऑइलने भारतीय वायुसेनेच्या हिंडन हवाई तळावर आयोजित केलेल्या या उद्घाटन समारंभाला भारतीय हवाई दलाचे वरिष्ठ अधिकारी, एमओपीएनजी (MoPNG) आणि एमओसीए (MoCA) चे वरिष्ठ अधिकारी आणि वैमानिक प्रशिक्षण संस्थांचे (FTOs) अधिकारी सहभागी झाले होते.

स्वदेशी बनावटीच्या एव्हीगॅस 100 एलएलचा वापर सुरू होण्याचे महत्व सांगताना पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री म्हणाले की एव्हीगॅस 100 एलएल हे भविष्यात विमानतळांवरील वाढती गर्दी तसेच वैमानिक प्रशिक्षण आणि प्रशिक्षणार्थी विमानांसह वैमानिक प्रशिक्षण संस्थांची वाढती संख्या यासह भरभराटीला येत असलेल्या विमान वाहतूक उद्योगाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी महत्वाचे आहे. भारतातील विमान प्रवासाची मागणी भविष्यात अनेक पटींनी वाढण्याची शक्यता असल्यामुळे प्रशिक्षित वैमानिकांना देखील मोठ्या प्रमाणात मागणी राहणार आहे. आणि यासाठी, एफटीओ (FTOs) संख्येतही लक्षणीय वाढ अपेक्षित आहे, ते म्हणाले.  

 

आत्मनिर्भर भारताच्या दिशेने वाटचाल:

सध्या एव्हीगॅस 100 एलएल हे इंधन पूर्णपणे आयात केले जाणारे उत्पादन आहे. इंडियन ऑइलने गुजरात येथील तेल शुद्धीकरण केंद्रात उत्पादित केलेल्या  एव्हीगॅस 100 एलएल चे देशांतर्गत उत्पादन भारतात विमान उड्डाणाचे प्रशिक्षण अधिक परवडणारे बनवेल. एफटीओ आणि संरक्षण दलांद्वारे चालवल्या जाणार्‍या विमानांना इंधन पुरवणारे हे उत्पादन भारत अनेक दशकांपासून आयात करत आहे. इंडियन ऑइलच्या संशोधन आणि विकास (R&D), तेल शुद्धीकरण प्रकल्प आणि विपणन संघांनी स्वदेशी उत्पादनाची ही यशस्वी कामगिरी केली आहे आणि उद्योग क्षेत्राला कमी किमतीचा फायदा दिला आहे.

 

* * *

S.Patil/R.Agashe/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1862308) Visitor Counter : 234