संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

हिमाचल प्रदेशात बडोली येथे आयोजित कार्यक्रमात, सशस्त्र दलातील हुतात्मा झालेल्या योद्ध्यांच्या कुटुंबियांचा संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते सत्कार, देश त्यांचा कायम ऋणी राहील अशी भावना व्यक्त


शांतताप्रिय भारत युद्धाला घाबरतो, असा गैरसमज करून घेऊ नका - राजनाथ सिंह

Posted On: 26 SEP 2022 5:00PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 26 सप्‍टेंबर 2022 

 

सशस्त्र दलात कार्यरत राहून देशाची सेवा करताना वीरमरण पत्करणाऱ्या, मूळच्या हिमाचल प्रदेशमधील शूर सैनिकांच्या कुटुंबियांचा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज, 26 सप्टेंबर 2022 रोजी, सत्कार केला. हिमाचल प्रदेशमध्ये कांगडा जिल्ह्यात बडोली येथे हा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. परमवीर चक्राचे पहिले मानकरी मेजर सोमनाथ शर्मा (1947), महावीर चक्र विजेते ब्रिगेडियर शेर जंग थापा (1948), परमवीर चक्र विजेते लेफ्टनंट कर्नल धनसिंग थापा, (1962), परमवीर चक्र विजेते कॅप्टन विक्रम बत्रा (1999) आणि परमवीर चक्र विजेते सुभेदार मेजर संजय कुमार (1999) या योद्ध्यांना, संरक्षण मंत्र्यांनी आदरांजली अर्पण केली. अतुलनीय शौर्य आणि बलिदान करणाऱ्या या सर्व वीरांची नावे प्रत्येक भारतीयाच्या हृदयात कोरलेली आहेत.

या शूर सैनिकांनी केलेल्या बलिदानाबद्दल देश त्यांचा सदैव ऋणी राहील, अशा शब्दांत, राजनाथ सिंह यांनी या वीरांच्या कुटुंबियांप्रति आदराची भावना व्यक्त केली. शिस्त, कर्तव्यनिष्ठा, देशभक्ती आणि त्याग ही सशस्त्र दलाची वैशिष्ट्ये आहेत आणि सशस्त्र दल हे राष्ट्राभिमान आणि विश्वासाचे प्रतीक आहे, त्यामुळे लोकांना, विशेषत: तरुणांना सशस्त्र दल हे नेहमीच प्रेरणा देत राहील, असे ते म्हणाले. पार्श्वभूमी, धर्म आणि पंथ अशा गोष्टींनी फरक पडत नाही, आपला प्रिय तिरंगा उंच फडकत राहिला पाहिजे, ही भावना सर्वात जास्त महत्वाची आहे, असे त्यांनी सांगितले.

भारत हा एकमेव देश आहे, ज्याने संपूर्ण जगाला शांततेचा संदेश दिला आहे आणि आपल्या शौर्यामुळे भारतीय सैन्य जगभरात आदरास पात्र ठरले आहे, असे संरक्षण मंत्र्यांनी सांगितले. भारताने कधीही कोणत्याही देशावर हल्ला केला नाही किंवा इंचभर परकीय भूमी काबीज केलेली नाही, मात्र आपल्या देशातील सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करण्यात आला तर त्याला चोख प्रत्युत्तर दिले जाईल, असे संरक्षण मंत्र्यांनी बजावले. “भारत हा शांतताप्रिय देश आहे, पण तो भ्याड आहे किंवा युद्धाला घाबरला आहे, असा गैरसमज कोणी करून घेऊ नये. संपूर्ण जगासह आपणही कोविड-19 साथरोगाचा मुकाबला करत होतो, त्याच वेळी आपल्याला देशाच्या उत्तर सीमेवर चीनमुळे तणावाचा सामना करावा लागला. कितीही मोठी सत्ता असली तरी भारत झुकणार नाही, हे गलवान प्रसंगाच्या वेळी आपल्या जवानांच्या धैर्याने सिद्ध केले आहे, असेही ते म्हणाले.

 

* * *

S.Patil/M.Pange/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1862278) Visitor Counter : 223