कृषी मंत्रालय
वर्ष 2022-23 च्या रबी हंगामासाठी डाळी तसेच तेलबियांच्या बियाणांची मिनीकिट्स वितरीत करुन केंद्र सरकारने डाळी तसेच तेलबियांचे उत्पादन वाढविण्यासाठी योग्य वेळी केलेल्या उपाययोजना
Posted On:
22 SEP 2022 6:44PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 सप्टेंबर 2022
बियाणे म्हणजे एक संपूर्ण तंत्रज्ञान आहे आणि बियाणांमध्ये पिकांची उत्पादकता 20 ते 25%नी वाढविण्याची क्षमता असते.शेतीसाठी उत्तम प्रतीचे बियाणे उपलब्ध झाल्यामुळे उत्पादन आणि उत्पादकता दोन्हींमध्ये वाढ दिसून येते आणि त्यामुळे शेतकऱ्याचे उत्पन्न वाढण्यासोबत, एकंदरच कृषी व्यवस्थेला आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फायदा होतो. देशाच्या काही राज्यांमध्ये होणारा अनियमित तसेच कमी प्रमाणातील पाऊस लक्षात घेता, रबी हंगामातील पिके, विशेषतः डाळी आणि तेलबिया यांची पेरणी लवकर होण्याची गरज निर्माण झाली आहे.
वर्ष 2022-23 मधील रबी हंगामासाठी सरकारने देखील डाळी तसेच तेलबिया यांच्या मिनीकिट्सचा पुरवठा करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे, तसेच या प्रक्रियेत नियमित पुरवठ्यासोबतच राज्यांमधील कमी पावसाच्या प्रदेशांवर अधिक लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. राष्ट्रीय बियाणे महामंडळ तसेच नाफेड इत्यादी केंद्रीय संस्थांकडून मिनीकिट्सचे वितरण होत असून राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाच्या माध्यमातून केंद्र सरकारचे संपूर्ण अनुदान मिळालेल्या केंद्रीय संस्था देखील या कामी मदत करत आहेत.
केंद्र सरकारने खालील उद्दिष्टांसह उच्च उत्पादन क्षमता असणाऱ्या नव्या वाणांच्या बियाणांचे शेतकऱ्यांना वितरण करण्यासाठी व्यापक बियाणे मिनीकिट्स कार्यक्रमाला मंजुरी दिली आहे:
- उत्पादन आणि उत्पादकता वाढविण्याच्या हेतूने, शेतकऱ्यांमध्ये पिकांच्या अत्याधुनिक वाणांची लोकप्रियता वाढविणे.
- वर्ष 2022 च्या खरीप हंगामात, ज्या राज्यांमध्ये कमी किंवा अगदी तुरळक प्रमाणात पाउस झाला अशा उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड तसेच मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यांच्या काही भागात बियाणांच्या मिनीकिट्सचे वाटप करणे.
- महाराष्ट्राच्या विदर्भ भागात आर आणि एम म्हणजेच रॅपसीड आणि मोहरी यांच्या अपारंपरिक क्षेत्रावरील लागवडीसाठी प्रयत्न करणे.
- तमिळनाडू, आंध्रप्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटक यांसारख्या दक्षिणेकडील राज्यांमध्ये मुख्य रबी तेलबियांचे पिक म्हणून शेंगदाण्याचे बियाणे वितरीत करणे आणि उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार आणि राजस्थान या राज्यांमध्ये दुय्यम तेलबिया म्हणून जवसाचे बियाणे तर महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगाणा या राज्यांमध्ये दुय्यम पिक म्हणून करडईचे बियाणे वितरीत करणे.
डाळींच्या लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने मसूर आणि उडीद यांच्या बियाणांची 4.54 लाख मिनीकिट्स उपलब्ध करून दिली असून वर्ष 2022-23 मध्ये उत्तरप्रदेश, झारखंड आणि बिहार यांसारख्या कमी पावसाच्या राज्यांमध्ये रबी हंगामाची पेरणी वेळेआधी सुरु करण्याच्या उद्देशाने देशातील 11 राज्यांमध्ये त्यातील मसुरच्या बियाणांची 4.04 लाख मिनीकिट्स वितरीत केली आहेत. एकूण तरतुदीच्या 33.8% वितरण झाले असून हे प्रमाण गेल्या वर्षी या तीन कमी पावसाच्या राज्यांमध्ये केलेल्या बियाणांच्या वितरणापेक्षा 39.4%नी जास्त आहे.
वर्ष 2022-23 पासून केंद्र सरकार टीएमयू 370 अर्थात ‘तूर मसूर उडीद 370’या विशेष कार्यक्रमाची अंमलबजावणी करत आहे आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशातील 120 जिल्ह्यांमध्ये मसुरचे तर दीडशे जिल्ह्यांमध्ये उडीद पिकाचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहेत. या लक्ष्यीत जिल्ह्यांमध्ये अधिकाधिक शेतकऱ्यांनी या कडधान्यांच्या लागवडीकडे वळावे हे सुनिश्चित करुन तेथील उत्पादन तसेच उत्पादकता वाढविणे हे सरकारचे उद्दिष्ट आहे.
या उपक्रमाअंतर्गत सुमारे 39 कोटी 22 लाख रुपये किमतीच्या बियाणांच्या सुमारे 8.3 लाख मिनीकिट्सच्या वितरणाच्या माध्यमातून तेलबियांच्या लागवडीला प्रोत्साहन देण्यात येत आहे. यामध्ये मोहरीच्या बियाणांची 10.93 कोटी रुपयांची 575000 मिनीकिट्स, शेंगदाण्याच्या बियाणांची 16.07 कोटी रुपयांची 70500 मिनीकिट्स, सोयाबीनच्या बियाणांची 11.00 कोटी रुपयांची 125000 मिनीकिट्स,करडईच्या बियाणांची 65 लाख रुपयांची 32500 मिनीकिट्स आणि जवसाच्या बियाणांची 65 लाख रुपयांची 32500 मिनीकिट्स समाविष्ट आहेत. ही मिनीकिट्स थेट शेतकऱ्यांना मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
R.Aghor /S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1861564)
Visitor Counter : 282