श्रम आणि रोजगार मंत्रालय
ईपीएफओ अर्थात कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी संघटनेचा वेतनपट अहवाल: जुलै 2022 महिन्यात योजनेच्या सदस्यसंख्येत 18.23 लाख सदस्यांची निव्वळ भर
Posted On:
20 SEP 2022 8:31PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 सप्टेंबर 2022
ईपीएफओ अर्थात कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी संघटनेने आज, 20 सप्टेंबर 2022 रोजी प्रसिद्ध केलेल्या तात्कालिक वेतनपटविषयक अहवालातून अशी माहिती मिळाली आहे की, जुलै 2022 मध्ये ईपीएफओ संघटनेमध्ये 18 लाख 23 हजार नव्या सदस्यांची निव्वळ भर पडली. गेल्या वर्षीच्या याच महिन्यातील आकडेवारीशी तुलना केल्यास असे दिसून येते की जुलै 2022 मध्ये वेतनपट सदस्य संख्येत सुमारे 24.48% ची निव्वळ भर पडली आहे.
जुलै 2022 मध्ये सदस्यसंख्येत जमा झालेल्या नव्या 18 लाख 23 हजार सदस्यांपैकी 10 लाख 58 हजार सदस्य प्रथमच ईपीएफओच्या सामाजिक सुरक्षा कवचाचा लाभ घेत आहेत. या योजनेत सहभागी होणाऱ्या सदस्यांच्या संख्येत एप्रिल 2022 पासून सतत वाढ दिसून आली आहे. या योजनेत प्रथमतः सहभागी होणाऱ्या 10 लाख 58 हजार नव्या सदस्यांपैकी सुमारे 57.69% सदस्य 18 ते 25 वर्षे या वयोगटातील आहेत. यावरून असे दिसून येते की नव्याने नोकरी मिळविणारे उमेदवार शिक्षण संपवून संघटीत क्षेत्रातील कर्मचारी वर्गाचा भाग बनत आहेत. तसेच संघटित क्षेत्रात निर्माण होणारे नवे रोजगार मोठ्या प्रमाणात देशातील युवा वर्गाला मिळत आहेत.
लिंगनिहाय विश्लेषण असे दर्शविते की वेतनपटात जुलै 2022 मध्ये 4 लाख 6 हजार महिला सदस्यांची भर पडली आहे. गेल्या वर्षी जुलै महिन्यात या योजनेत सहभागी होणाऱ्या महिलांच्या आकडेवारीशी तुलना करता या वर्षीच्या जुलै महिन्यात 34.84% अधिक महिला संघटीत क्षेत्रातील कामगारवर्गात सहभागी झाल्या आहेत. डिसेंबर 2021 मध्ये एकूण सदस्यांच्या वाढीमध्ये महिला नोंदणीचा वाटा अंदाजे 20.52% आहे.
जुलै महिन्यात ईपीएफओच्या योजनेत सहभागी होणाऱ्या नव्या सदस्यांच्या एकूण संख्येपैकी महिला सदस्यांची संख्या 27.54% असल्याचे आणि ही गेल्या 12 महिन्यातील सर्वोच्च महिला सदस्यसंख्या असल्याचे दिसून आले आहे. ईपीएफओच्या योजनेत सहभागी होणाऱ्या नव्या सदस्यांचा विचार करता, संघटीत क्षेत्रातील कर्मचारी वर्गात महिलांचा सहभाग सतत वाढत आहे हेच यावरून दिसून येते.
राज्यनिहाय वेतनपट अहवालातील आकडेवारी पाहता, तामिळनाडू, दिल्ली, तेलंगणा, आंध्रप्रदेश आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये नवे सदस्य या योजनेत सहभागी होण्याचे प्रमाण दर महिन्यात वाढताना दिसत आहे. जुलै 2022 मध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, हरियाणा, गुजरात आणि दिल्ली या राज्यांतील कर्मचारी ईपीएफओच्या योजनेत सहभागी होण्यात आघाडीवर असून एकूण नव्या सदस्यांच्या संख्येपैकी 12 लाख 46 हजार निव्वळ नवे सदस्य या राज्यांमधील आहेत. हे प्रमाण सर्व वयोगटाच्या सदस्य संख्येतील निव्वळ वाढीच्या 68.36% आहे.
R.Aghor /S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1860984)
Visitor Counter : 178