रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

मालवाहतूक क्षेत्राशी संबंधित सर्व भागधारकांमधील सहकार्य, समन्वय आणि परस्पर संवाद यांच्या माध्यमातून माल वाहतूक खर्च 14 ते 16 टक्क्यावरून 10 टक्क्यापर्यंत कमी करण्यावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिला भर

Posted On: 20 SEP 2022 7:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 20 सप्टेंबर 2022

 

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मालवाहतूक क्षेत्राशी संबंधित सर्व भागधारकांमधील सहकार्य, समन्वय आणि परस्पर संवाद यांच्या माध्यमातून माल वाहतूक खर्च 14 ते 16 टक्क्यावरून 10 टक्क्यापर्यंत कमी करण्यावर भर दिला आहे. ‘हवामानविषयक उद्दिष्टे: शून्य उत्सर्जनाकडे नेणारा तंत्रज्ञानाधारित आराखडा’ या कार्यक्रमात उपस्थितांशी संवाद साधताना ते म्हणाले की, वाहतुकीचा खर्च कमी करून मोठी बचत करता येईल आणि त्यातून आपल्या अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या निर्यातीत 50% वाढ करता येईल.

प्रदूषणाच्या समस्येवर बोलताना ते म्हणाले की, आपण सध्या 16 लाख कोटी रुपये मूल्याचे जीवाश्म इंधन आयात करुन वापरत आहोत आणि त्यातून मोठ्या प्रमाणात प्रदूषण निर्माण होत आहे. जनतेचा प्रवासाचा वेळ कमी करण्यासाठी 27 हरित द्रुतगती महामार्ग उभारण्याचा निर्णय घेण्यात आला असून डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत दिल्ली ते चंदीगड हे अंतर अडीच तासांत, दिल्ली ते अमृतसर हे अंतर 4 तासांत, दिल्ली ते कटरा 6 हे अंतर तासांत,दिल्ली ते श्रीनगर 8 हे अंतर तासांत आणि दिल्ली ते मुंबई हे अंतर 12 तासांत तर दिल्ली ते जयपूर आणि चेन्नई ते बंगळूरू हे अंतर प्रत्येकी 2 तासांत पार करून देणारे नवे महामार्ग वापरासाठी तयार असतील असे गडकरी यांनी सांगितले. भारताला 5 ट्रिलीयन डॉलर्सची अर्थव्यवस्था असलेला देश बनविण्याचे पंतप्रधानांचे स्वप्न साकार करण्यासाठी तंत्रज्ञान, नवोन्मेष तसेच संशोधन या अत्यंत महत्त्वाच्या बाबी आहेत असे ते म्हणाले.

एआयएमए अर्थात अखिल भारतीय व्यवस्थापन संघटनेच्या 49व्या राष्ट्रीय व्यवस्थापन अधिवेशनामध्ये आज नवी दिल्ली – ‘भारताची प्रगती: जगाच्या नव्या रचनेत समृद्धी मिळविताना’ या विषयावर उपस्थितांशी संवाद साधताना केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले की, केंद्र सरकार आणि राज्य सरकारे यांनी एकत्र येऊन संघभावनेने सार्वजनिक वाहतूक सेवेला प्रोत्साहन देण्याची गरज आहे. ते म्हणाले की भारतातील तरुण आणि प्रतिभावान अभियांत्रिकी मनुष्यबळ, कुशल कामगारवर्ग आणि मजुरीवर होणारा  कमी खर्च यामुळे भारताचा देशांतर्गत बाजाराचा आवाका प्रचंड आहे. कृषी क्षेत्राचे काही घटक उर्जा आणि वीज निर्मिती क्षेत्राकडे वळविणे तसेच बायो इथेनॉल, एलएनजी आणि बायो सीएनजी सारख्या पर्यायी इंधनांचा वापर वाढविणे याबाबत प्रयत्न करण्यावर त्यांनी अधिक भर दिला. नैतिक मूल्ये, अर्थव्यवस्था, पर्यावरणशास्त्र आणि पर्यावरण हे समाजाचे तीन अत्यंत महत्त्वाचे आधारस्तंभ आहेत असे गडकरी यांनी सांगितले.

 

R.Aghor /S.Chitnis/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 

 


(Release ID: 1860947) Visitor Counter : 167