वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
पीयूष गोयल यांचा सौदी अरेबिया दौरा फलदायी
भारत-सौदी अरेबिया धोरणात्मक भागीदारी परिषदेच्या अर्थव्यवस्था आणि गुंतवणुकीवरील समितीच्या मंत्रिस्तरीय बैठकीत सहभाग
भारत आणि सौदी अरेबिया यांच्यातील सहकार्यासाठी 40 हून अधिक संधी परिषदेकडून निश्चित
Posted On:
19 SEP 2022 8:35PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 सप्टेंबर 2022
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण व वस्त्रोद्योग मंत्री, पीयूष गोयल यांनी भारत-सौदी अरेबिया धोरणात्मक भागीदारी परिषदेच्या मंत्रिस्तरीय बैठकीला उपस्थित राहण्यासाठी 18 आणि 19 सप्टेंबर 2022 दरम्यान सौदी अरेबियाला भेट दिली. गोयल यांच्यासह सौदी अरेबियाचे ऊर्जा मंत्री, राजपुत्र अब्दुलाझीझ बिन सलमान अल-सौद यांनी भारत-सौदी अरेबिया धोरणात्मक भागीदारी परिषदेच्या अर्थव्यवस्था आणि गुंतवणूकीवरील समितीच्या मंत्रिस्तरीय बैठकीचे सह-अध्यक्षपद भूषवले.
भारताचे पंतप्रधान सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर गेले असताना ऑक्टोबर 2019 मध्ये या धोरणात्मक भागीदारी परिषदेची स्थापना करण्यात आली होती. ती पुढील स्तंभांवर उभारलेली होती, जसे की राजकीय, सुरक्षा, सामाजिक आणि सांस्कृतिक समिती व अर्थव्यवस्था आणि गुंतवणूक यावरील समिती.
मंत्रीस्तरीय बैठकीची उल्लेखनीय फलनिष्पत्ती पुढीलप्रमाणे :
- युवराज मोहम्मद बिन सलमान यांनी फेब्रुवारी 2019 मध्ये त्यांच्या भारत भेटीदरम्यान भारतात 100 अब्ज अमेरिकी डॉलर्स गुंतवणुकीची केलेली घोषणा प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न मार्गी लावणे
- कृषी आणि अन्न सुरक्षा, ऊर्जा, तंत्रज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान, उद्योग आणि पायाभूत सुविधा या 4 व्यापक क्षेत्रांतर्गत तांत्रिक संघांनी निश्चित केलेल्या सहकार्याच्या 41 क्षेत्रांना मान्यता
- प्राधान्य प्रकल्पांची कालबद्ध पद्धतीने अंमलबजावणी करण्यासाठी करार. सहकार्याच्या प्राधान्य क्षेत्रांमध्ये पुढील गोष्टींचा समावेश :
- सौदी अरेबियात यूपीआय आणि रुपे कार्ड कार्यान्वित करून डिजिटल फिनटेक क्षेत्रात सहकार्य.
- पश्चिम किनारपट्टीवरील रिफायनरी, एलएनजी पायाभूत सुविधा गुंतवणूक आणि भारतातील धोरणात्मक पेट्रोलियम साठवणूक सुविधांच्या विकासासह संयुक्त प्रकल्पांमध्ये सहकार्य सुरू ठेवण्याचा पुनरुच्चार
या दौऱ्यात गोयल यांनी सौदी अरेबियाचे वाणिज्य मंत्री डॉ. माजिद बिन अब्दुल्ला अल-कसाबी यांची भेट घेतली आणि द्विपक्षीय व्यापार, वाणिज्य आणि गुंतवणुकीतील संबंधांवर विस्तृत चर्चा केली.
वाणिज्य आणि व्यापार यात वैविध्य आणणे आणि विस्तार करणे, स्वच्छता आणि फायटोसॅनिटरी (आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या गरजा लक्षात घेऊन रोपांमधील रोगनियंत्रण) यासंबंधीचे प्रलंबित मुद्दे, स्वयंचलित नोंदणी आणि सौदी अरेबियामध्ये भारतीय फार्मा उत्पादनांची विपणन अधिकृतता, रुपया-रियाल व्यापार संस्थात्मक करण्यासाठीची व्यवहार्यता, यासह व्यापारातील अडथळे दूर करणे, सौदी अरेबियामध्ये यूपीआय आणि रुपे कार्डची सुरुवात; हे चर्चेतील प्रमुख मुद्दे होते.
गोयल यांनी सौदी अरेबियाचे ऊर्जा मंत्री राजपुत्र अब्दुला अझीझ बिन सलमान अल सौद, यांच्याशी देखील चर्चा केली. रियाधमध्ये भारतीय उत्पादनांना विशेषत: भरड धान्यांसारखी खाद्य उत्पादने आणि वस्त्र यांना चालना देण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून रियाधमधील भारतीय दूतावासाने आयोजित केलेल्या "द इंडिया वीक" चे उद्घाटनही गोयल यांनी केले.
* * *
R.Aghor/S.Kakade/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1860693)
Visitor Counter : 254